विघ्नहर्त्या गजाननाचा गणेशोत्सव तोंडावर आलाय. यंदा महाराष्ट्रावर पावसाची बरीच कृपा आहे. सरासरीइतका पाऊस झाल्याने बळीराजा समाधानी आहे. अर्थात आपल्याकडे पाऊस झाला की शहरवासीयांची ओरड आणि झाला नाही की शेतक-यांच्या डोळ्यात पाणी हे चित्र दिसते. जसजसा भारत विकसीत होत जाईल तसतसे ते चित्रही हद्दपार होईल.
गणेशाचा १० दिवसांचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून मराठी मातीला मिळलेली देणगीच आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना टिळकांनी मांडली ती स्वराज्यासाठी. आता तीच कल्पना सुराज्यासाठी वापरणे आवश्यक बनले आहे. लोकमान्य टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वप्न एका शतकानंतर ही अबाधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मन की बात' या लोकप्रिय कार्यक्रमातून दरवर्षी 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' साजरा करण्याचे आवाहन करतात. ते आपण मनावर घेतले पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सवात बदलत्याकाळाच्या पाऊलखूणानुसार थोडाफार बदल झाला असला तरी मूळ स्वरूप एकत्रित येणं भेटणं हेच आहे किंबहना तेच असते, नव्हे तर स्पर्धात्मक उत्साह, हर्ष जल्लोष व गणेशोत्वाचा परीघ वर्षागणिक वाढत असतो. गेली काही वर्षे राजधानी दिल्लीतही श्री गणेशोत्सवाची धामधूम वाढलेली आहे.
पुण्यात सुरु झालेली ही परंपरा सातासमुद्रापार पोहचली नसेल तर नवल! जशी ती थेट पुढच्या पिढीने परदेशात नेली तशी राज्याबाहेर राजधानी दिल्लीत ही वसवली, संवर्धन केली नव्हे तर समृद्ध ही करीत आहे, हे लक्षात येते दिल्ली आणि एन.सी.आर., गुरुग्राम, नोएडा या परिसरात विस्तारलेल्या महाराष्ट्रीयनच नव्हे तर काही मराठी भाषिक गणेश भक्तांच्या उत्साहावरुन काही महाराष्ट्रीयन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह मराठी भाषिकच नव्हेत तर हिंदी भाषिकही दणक्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. तर माझे वाचक बुद्धीउपासक गणेश भक्तांनो...
मध्यंतरी आपली भेट काहीशी लांबली होती. पण आता आम्ही पुन्हा एका सुसज्ज अंकासह आपल्या भेटीला आलो आहोत. या अंकात स्वातंत्र्यदिनापासून गणेशोत्सवापर्यंत आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या आणीबाणी पासून संसद अधिवेशनापर्यंतच्या सा-या विषयांना स्पर्श करणारे आहे. विविधांगी मजकराची मेजवानी 'दी कोर' च्या वाचकांना मिळावी हा त्यामागचा हेतू.
श्री गजाननाच्या कृपेने यापुढेही आपली भेट नियमितपणे होत राहील अशी प्रार्थना करून येथेच थांबते. पण हो, अंक कसा वाटाला हे जरूर कळवायचं हं!!!
आपली
कार्यकारी संपादिका