'कामगार तू अन मी पण कामगार'

गमजा घेऊन खांद्यावर


राबतो तू रेल्वे फलाटावर


लॅपटॉप घेऊन हाती


राबतो मी दिवस न् रात्री


'तुझी कमाई ३० रुपये, मी कमवतो हजार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


तू फिरतो उन्हा तान्हात


कचरा-मैला ओढत


मी फिरतो एसी गाडीत


सिगारेटचा धूर सोडत


'तुझी पायपीट ठरलेली, मी हवेत थंडगार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


तू येतो बाजारात


भाजी डोक्यावर घेऊन


मी निघतो सुटाबुटात


महागडा मोबाईल घेऊन


'तझी राहणी साधी, माझा दिखावा फार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


तू जातो धान्य घेऊन


बाजार असो की आडत


मी फिरतो समाजात


भ्रष्ट चेह-यांचा बुरखा फाडत


'तू राहीला शेतकरी, जातीचा मी पत्रकार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


तू उतरतो अनवानी


दहा फूट नाल्यांमध्ये


मी शिकवतो आश्रमशाळेत


पाच-दहा मुलांमध्ये


'तू काढतो घाण, मी देशाची पिढी घडवणार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


देहविक्री करते तू


लेकारांच्या दोन घासांसाठी


लढते मी सत्तांधाशी


विस्थापीतांच्या हक्कांसाठी


ते लेकरांना, माझी जिद्द अपार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


उत्कृष्ट निर्मितीच्या धुंदीत


मारतो तू गडावर घाव


राम-रहीमच्या घोषणा देत निर्माण करतो मी भेदभाव


निर्माण करतो मी भेदभाव


'तू पक्षाचा कार्यकर्ता, मी तर एक मुर्तीकार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


तू फिरतो चौपाटीवर


हाती काठी घेऊन


माझ्या चकरा पोलिस ठाण्यात


चोरीची तक्रार घेऊन


'तू घालतो गस्त, मी खेटे झिजवतो वारंवार'


'कामगार तू अन् मी पण कामगार'


आदिवासी पाडा असो की सिलिकॉन व्हॅली


तरूणाई-महिला-पुरुष-वृद्ध


शिपाई-अधिकारी-मोलकरीण-शेतकरी


तू कोणीही असो,


'बदलत नाही कष्टाचं सार'


'कामगार तू अन् मी पण कामगार!'