सारडा कन्या विद्यामंदिराकडे जाणारा रस्ता... माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. रेखाताईंचे नृत्याचे क्लासेस शनिवार- रविवार असायचे. पण रेडक्रॉस सिग्नलपासून शालीमारपर्यंत, जेव्हाजेव्हा मी जाते, मला अजूनही घुगरांचे आवाज ऐकू येतात. कोणत्याही दिवशी! शाळा- नेहरू गार्डन जवळ आलं कि आवाज अधिक स्पष्ट होत जातो. ठाम... घुगरांचा आवाज. कधीकधी शनिवार-रविवार नसतानासुद्धा क्लास कसा, हा प्रश्न पडून मी आत जाते आणि आत कुणीच नाही हे पाहून बाहेर पडते. पण, मला आता लक्षात आलंय कि घुगरांचा आवाज मला बाहेरून कुठून ऐकू येत नाही... तो माझ्या आतच आहे... आणि सदैव राहील. इथल्या थंड वा-याला, झाडांच्या सळसळीला एक नाद आहे, लय आहे. पक्ष्यांच्या उडण्याला एक ग्रेस आहे.
मला अजूनही आठवतंय, मी सात वर्षांची होते तेव्हा बाबांनी मला रेखाताईंच्या क्लासला नेलं. बाबा आणि ताई बराच वेळ काय बोलले माहिती नाही, पण शेवटी जेव्हा ताई माझ्याकडे पाहून म्हणाली, तेव्हा मला एक वेगळाच आनंद झाला. पुढे काय होणार मला काहीच माहिती नव्हतं, पण मी खुश होते. माझ्या नृत्य प्रशिक्षणाला सुरुवात झाली. मी कीर्ती कलामंदिराची विद्यार्थिनी बनले. ही गोष्ट कदाचित खूप लहान जरी असली तरी
ख-या अर्थाने मी जग नव्या चष्यातून बघू लागले ते तेव्हापासून.
नृत्य हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे. प्रत्येक कलाकार व्यक्त होण्यासाठी धडपडत असतो. त्याच्या अंगभूत गुणांचा उपयोग तो व्यक्त होण्यासाठी करत असतो. पण, व्यक्त होण्याला एक सुरुवात लागते. अव्यक्त गोष्टी व्यक्त करण्याचा प्रवास माणसाच्या आतून बाहेर असा होत असतो. मी स्वतःला सुदैवी समजते कि, माझ्याबाबतीत तरी, ह्या व्यक्त होण्याचा प्रवास माज्या लहानपणीच कथ्थकच्या निमित्ताने सुरु झाला.
आनंदाच्या क्षणी आपण आपला आनंद नृत्यातून व्यक्त करत असतो. पण अगदीच दुर्दैव म्हणावं लागेल कि प्रत्येकाला आनंद होईल तेव्हा नाचता येत नाही. विशेषतः महाराष्ट्रात, लोकनृत्य कि कला काही ठराविक वर्गांना सोडल्यास बाकी समाजाला अवगत नाही. लोकनृत्य हे एकप्रकारे आपले जुने गेटटुगेदरच! पण प्रत्येकाला नाचता येतंच, असं काही नाही. अनेक जण आपापली प्रतिष्ठा, सामाजिक स्थान, नियम, बंधने ह्यात अडकलेली असतात. ते भिंतींना भेदून बाहेर पडू शकत नाहीत. व्यक्त होण्याच्या प्रक्रियेला इथे खिळ बसते. हे लोक मन आनंदाने नाचू लागले सारखी पुस्तकी व अवास्तव भाषा वापरतात. त्यांचा कल्पनेतला आनंद हा कल्पनेतच राहतो.आजही संगीत, नृत्य, गायन, वादन ह्या कलांचा अनेकांना स्पर्श नाही, ही गंभीर गोष्ट आहे.
कलाकार असो व अजून कोणीही.. प्रत्येक मानवप्राण्याची मुलभूत गरज असते व्यक्त होणे,व्यक्त होण्याचे समाधान मिळवणे. आणि संगीत, नृत्य, इ. कला माध्यम आहेत. जर माध्यमच नसेल तर व्यक्त कशातून होणार? म्हणून मला स्वतःला केवळ व्यक्त होण्यासाठी का होईना कला आत्मसात करणे खूप महत्वाचे वाटते.
गेल्या पंचवीस वर्षांपासून, म्हणजे, १९९४ पासून प्रत्येक वर्षी रेखाताई गोपीकृष्ण जयंती महोत्सव आयोजित करते. कीर्ती कला मंदिरातील विद्यार्थिनींच्या बरोबरीने भारतभरातील अनेक नावाजलेले नर्तक भाग घेतात. गायन आणि नृत्याचा मिलाफ असलेल्या ह्या महोत्सवात अनेक विचारप्रवाह असलेले कलाकार येतात, निरनिराळ्या नृत्यशैलींचे आदानप्रदान होते. नृत्यानुष्ठान म्हणजेच या वर्षीच्या रौप्य महोत्सवी वर्षात संपूर्ण वर्षभर एकल नृत्ये सादर होत आहेत. २५ गुरूंचे २५ शिष्य नृत्यानुष्ठानसाठी आमंत्रित केले गेले आहेत. एकल नृत्यशैलीचा अभ्यास व्हावा, अभ्यासातून कलाविष्कार झळकावा ह्या निर्मळ उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर गायन, वादन आणि नृत्य ह्यांच्या मैफिली सजणार आहेत.
शोधाबद्दल असे म्हणतात ना, एखादी गोष्ट ही तिथेच असते, आपल्याला फक्त ती सापडते. त्याचप्रकारे, ताल, लयीचा आणि आपला संबंध हा श्वास घ्यायला लागल्या पासूनच सुरु होत असतो. मला ह्या संबंधाची ओळख करून दिली रेखाताईंनी. एखादी गोष्ट मनापासून बघणे, तिचे रसग्रहण करणे, मनात तो अनुभव साठवून ठेवणे ही प्रक्रिया घडत असते. कलाकाराने स्वतः प्रगल्भ होता होता प्रेक्षकांना सुजाण बनवणेदेखील गरजेचे आहे ही बाब रेखाताईंना चांगलीच ठावूक आहे. केवळ त्यासाठीच नृत्यानुष्ठानासारखे उपक्रम त्या राबवत असतात.
कला सादर करणारा आणि कलेचा आस्वाद घेणारा ह्यांच्यात एकप्रकारचा बंध तयार व्हावा लागतो. सादर करणारा कलाकार प्रेक्षकाला स्वतःच्या कलेत गुंतवत असतो, भावूक करत असतो, हसवत-रडवत असतो, वेगवेगळ्या भावभावनांमधून फिरवून आणत असतो. प्रेक्षकदेखील कलाकारावर विश्वास टाकतो, आणि तो सांगेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवत कलेचा आस्वाद घेत असतो. ह्याला मानसशास्त्रीय लॉजिक हे आहे, कि मानवप्राण्याला स्वतःचा अनुभव वाटायला खूप आवडतं.
कोणत्याही कलाप्रसारात गुरु-शिष्य परंपरेचे खूप महत्वाचे योगदान असते. गुरु-शिष्य परंपरा म्हणजे गुरुने शिष्याला कला शिकवून बाजूला सरकणे नव्हे. शिकवून झाल्यावर देखील आयुष्यभर गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या सोबतच असतो. गुरु आणि शिष्य एकप्रकारे एकमेकांना ग्रुम करत असतात, समृद्ध बनवत असतात. शिष्यानेही शिकल्यानंतर आहे त्याच ठिकाणी राहणे अपेक्षित नसते. शिष्यानेही गुरु बनावे अशी जगातल्या प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते. त्यामुळे, कलाक्षेत्रातदेखील गुरु शिष्याला शेवटपर्यंत साथ देतो, सोडत नाही. शिष्याने गुरु बनून नवीन शिष्य तयार करणे हे चक्र सदैव सुरु असते. कदाचित यामुळेच याला गुरु-शिष्य परंपरा म्हणतात. कारण, हे अनित्य आहे.
कलाकार आपापली विचारधारा तयार करत असतो. यातूनच त्याची शैली तयार होते, मते तयार होतात. यात मार्गदर्शकाचा/गुरूचा वाटा खूप मोलाचा असतो. जेव्हा रेखाताईने मला माझ्या शरीराची ओळख करून मला माझ्या शरीराची ओळख करून दिली,स्वची ओळख करून दिली; मला स्वतःकडे असलेल्या प्रभुत्वाची जाणीव करून दिली. अशा असंख्य जाणीवा तयार व्हायला मला रेखाताईने मदत केली.
रेखाताईंनी गेल्या तीसेक वर्षांत हजारो मुलींना शिकवलंय, अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे. मी एक कलाकार म्हणून जेव्हा रेखाताईंच्या कामाकडे पाहते, तेव्हा मला स्वतःबद्दल अभिमान वाटतो कि मला रेखाताईंकडे शिकता आलं. व्यक्त होण्याची जबाबदारी कलाकार म्हणून आपल्यावर असते. त्यामुळे,आपण आपलं काम सदैव करत राहणं हे कर्तव्य आहे. हेच रेखाताईंच्या आणि कीर्ती कलामंदिरच्या फिलॉसॉफीचं सार आहे, असं मला वाटतं.
पक्ष्यांच्या चिवचिवाटात, झाडांच्या सळसळीत मला नाद आणि ताल अनुभवता येतो,ही रेखाताईंची देणगी अमूल्य आहे. पक्ष्यांच्या उडण्यातला ग्रेस पाहून मी केवळ अनुभव घेऊन थांबत नाही. मी देखील उडण्याचा प्रयत्न करते. उडू लागते. व्यक्त होते!