सीमा नक्की केली की, प्रवास निर्धोक होतो...

दोन मुली एकमेकांच्या मैत्रीणी असतात, किंवा दोन मुल.हे जसं जगमान्य आहे, तसेच मलगा आणि मलगी सद्धा १००% मित्र मैत्रिणी असतात. ह्यात तीळमात्र ही शंका नसावी. पण ते चाणाक्ष पणे निवडावे कारण नातेवाईक निवडण्याचा हक्क नसतो आपल्याला,पण 'मित्र' निवडण्याचा मात्र असतो. आपली भावना किती आणि कशी गुंतवायची हे पहिलेच ठरवावं. मैत्री ही भावनेची गुंतवणूक ठरावी गुंता नक्कीच नको.



खूप वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता. 'दिल तो पागल है'!


होतं. आणि त्यातलं एक वाक्य फार गाजलं __


 एक लडका और एक लडकी कभी दोस्त नाही बन सकते. तो काळ वेगळा. त्या काळातली मैत्रीची व्याख्या पण वेगळी. खरंच आजपासून २५ /३० वर्षांपूर्वी एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांच्यात निखळ मैत्री असू शकते ह्यावर कोणी पटकन विश्वास नव्हतं ठेऊ शकत. नीदान दोघांपैकी एकाच्या तरी मनात मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळं असणारच हे गृहीत धरलं जायचं. आगीजवळ मेण ठेवलं तर ते वितळणारच! असा ठाम समज रुजलेला होता.


साधं मित्राच्या मागे स्कूटर वर बसून येणे म्हणजे मुलगी फार फॉरवर्ड असल्याचं लक्षण लोक मानायचे.


कॉलेजमध्ये मुलांशी कामाशिवाय जास्त बोलणा-या मुली तुरळक असायच्या.


साधारण पणे १२वी पर्यंत तर हेच चित्र. त्यात जर मुलगी फक्त मुलींच्या शाळेत शिकलेली असेल तर मग मुलांशी बोलणं तर अजूनच कठीण होऊन जायचं. डिग्री कॉलेजेस मध्ये आल्या नंतर हा प्रकार जरा कमी व्हायचा पण एक अंतर राखूनच.


आजची पिढी पाहिली की खूप मजा वाटते. मैत्री म्हणजे मैत्री करतात ते. त्यात मुलगा, मुलगी असा काही भेद त्यांच्या मनालाही शिवत नाही. त्याच्याकडे पाहून खरंच वाटतं हे निखळ नातं मागच्या पिढयांनी जगलंच नाही का? कित्येक स्त्रियांच्या आयुष्यात तर वडील आणि असल्यास भाऊ सोडून, तिसरा पुरुष म्हणजे थेट नवराच असायचा! जर तो नवरा मित्र नाही बनू शकला तर जवळ जवळ सगळं आयुष्यं त्या संकोचूनच जगतात!


खरंच मैत्रीमध्ये हा अडसर का यावा? जर एका मुलीला दुस-या मुलीशी मनमोकळ्या गप्पा माराव्याशा वाटल्या, तर त्याला कोणाचं काही घेणं, देणं नसतं. पण हेच जर तिथे मुलगा असेल, तर लोकांचे डोळे मोठे होतात.


कुठलही नातं जर मर्यादा ठरवून पुढे नेलं, तर कधीच फसत नाही. असं सुरुवातीलाच ठरवणं थोडं कठीण जातं खरं! पण पुढे त्रास कमी होतो.


कुठल्याही मैत्रीची सुरुवात झाली की, हे नातं कुठपर्यंत जाणार हे बहुधा मध्यावर येईपर्यंत कळलेलं असतं. तिथेच निर्णय घेण्याची परिपक्वता मात्र हवी.


माझी मैत्रीण, माझा मित्र हा माझा कंफर्ट झोन हवा. त्या नात्याचं ओझं वाटायला नको.


कित्येक विवाह-जोडपी नव-याची जुनी मैत्रीण संसारात खूप ढवळाढवळ करते म्हणून तुटलेली पाहिली. मैत्री जपताना नवरा, बायकोच्या नात्याच्या ठिक-या उडत असतील तर नक्कीच मैत्रीणीने हळूचं दूर जायला हवं. कारण, मैत्रीने काहीच तोडलं नाही पाहिजे. खरी सुदृढ मैत्री, केवळ एकमेकांना घडवणारी असते बुडवणारी नाही!


अगदीच गरज नसते, मैत्रीमध्ये रोज भेटण्याची.


मला कधीही गरज पडली तर कोणचं दार हक्काने ठोठावता येईल? हा प्रश्न ज्या दाराशी सुटतो.. ते तुमच्या मित्राचं/मैत्रीणीच दारं. ती खरी पावती त्या नात्याची!


बाकी मैत्री दिनाला ज्यांना गिफ्ट्स देतो, ते सगळेच काही आपले मित्र नसतात. नाही का?


दोन लोकं सतत बरोबर असतात, तर त्यांची घनिष्ट मैत्री आहे असं मुळीच नाही. तसं असतं तर मुंबईच्या लोकलचे डबे, 'मैत्री डबे' म्हणून प्रसिद्ध झाले असते. अगदी बाजूला बसणारं माणूस सुद्धा महीने महीने बदलत नाही तिथे.


सोबत आणि मैत्री ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.


जसं रोज भेटणं गरजेचं नाहीं तसंच एकमेकांच्या गळ्यात पडणंही का असावं? आपण आपल्या आवडीच्या माणसाच्या गळ्यात न पडताही आपली भावना व्यक्त करू शकतोच की.


म्हणजे प्रेमाने गळ्यात पडणं वाईट आहे, असं मुळीच नाही. पण आजकाल तो प्रोटोकॉल बनलाय जणू. भावनांची जागा, दिखाऊ पणाने घेतली आहे. किंवा ती एक मूलभूत गरज बनली आहे असं वाटतं.


दोन लोकांना आपल्या नात्यातल्या दृढतेची पक्की जाणीव असते. एक कृतज्ञता दिवस म्हणून तो वर्षातून एकदा साजराही व्हायला हवा. पण केवळ तो साजरा झाला की झालं असं नको.


आपण सगळ्या नात्यांना समान न्याय देतो आहोत की नाही? हे सतत तपासायला हवे.


मैत्रीमध्ये आपण शिडी सारखे वापरले तर जात नाही आहोत ना? ह्याची खात्री करून घ्यावी. मैत्रीसाठी आपली कुटुंब पणाला लावत नाहीना? हे मात्र जबाबदारीने बघायला हवं.


दोन मुली एकमेकांच्या मैत्रीणी असतात, किंवा दोन मुल. हे जसं जगमान्य आहे, तसेच मुलगा आणि मुलगी सुद्धा १००% मित्र मैत्रिणी असतात. ह्यात तीळमात्र ही शंका नसावी. पण ते चाणाक्ष पणे निवडावे कारण नातेवाईक निवडण्याचा हक्क नसतो आपल्याला,पण 'मित्र' निवडण्याचा मात्र असतो.


आपली भावना किती आणि कशी गुंतवायची हे पहिलेच ठरवावं.


मैत्री ही भावनेची गुंतवणूक ठरावी गुंता नक्कीच नको.


एकदा का सीमा नक्की केली, की कुठलाही प्रवास निर्धोक होतो.