सध्याच्या काळात स्त्रिया सर्वच क्षेत्रामध्ये पुढे आहेत. संपूर्ण जगामध्येच आपण बघतो की स्त्रिया शिकत आहेत. त्यांना सध्याच्या बदलत्या परिस्थितीची जाण आहे. २० ते २१ शतकामध्ये जगातच एकूण प्रचंड प्रकाराचे बदल झाले आहेत. व त्याचे चांगले व वाईट परिणाम आपणा सर्वांवर होत आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल रोजच येत आहेत. मोबाईलचे नवीन नवीन मॉडेल्स, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम, प्रसारमाध्यमे, ट्विटर, टेलीव्हिजन, प्रचंड माहिती आपणास मिळत आहे. व आपल्या पुढे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सगळेजण स्पर्धेमध्ये आहेत घरा-घरातील प्रत्येक सदस्य घरा बाहेर काम करत आहे व घरातही सगळयांना अनेक काम असतातच खास करुन स्त्रीयांना घरातली कामे, स्वयंपाक, साफसफाई, घरातली अनेक कामे, बील भरणे, भाजी बाजार, किरणा भरणे, घरातील व्यक्तींची आजारपणे, त्यांची देखभाल, सासू सासरे, आई वडील सगळ्यांची काळजी घेणे, घरातील लग्न समारंभ व वाढदिवस, छोटे मोठे कार्यक्रम, व घराच्या बाहेरही अत्यंत चांगले असे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांनाही उपस्थित रहाणे हे असं करताना प्रचंड धावपळ, ओढाताण करावी लागते व त्यातच शारीरिक व मानसिक ताण तणाव निर्माण होतो, वेळेवर जेवण होत नाही, किंवा बाहेर व ऑफीसमध्ये निकृष्ठ प्रकारचे खाणे त्यामुळे अॅसीडीटी, पोट दुखणे, डोके दुखणे, अपचन, थकवा, उत्साही न वाटणे, संगणकाच्या अति वापरामुळे सतत डोळयांवर ताण, मान दुखणे इ. प्रकारचे आजार सुरु होतात, कामेच इतकी असतात की स्वतःला शांतपणे विचार करायलाही फुरसत नसते. चांगली झोप, स्वतःकरता वेळ काढणे, व्यायाम करणे, ध्यान करणे हया गोष्टी माहिती असून सुद्धा जमत नाही व म्हणूनच आजारी होण्याचे प्रमाण वाढंत आहे, त्यातच प्रदूषणामुळे होणारा आजार, वाढलेल्या वाहनामुळे गाडयांची गर्दी, त्यामुळे प्रवासात जास्त वेळ जाणे, हया सगळयामुळे स्वतःचा वेळ तर सहजपणे निघून जातो, पण स्वतःला स्वास्थ्य मिळत नाही, मग नेमके काय केले पाहिजे म्हणजे सर्वांना चांगले आरोग्य लाभेल, सुख व समाधान मिळेल, जगण्याचा आनंद मिळेल, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर सगळे यशस्वी होतील. व हे सगळच करायच असेल तर आपल्याला हुशार व स्मार्ट व्हावे लागेल.
१) वेळेचे नियोजन :- प्रत्येकालाच दिवसात फक्त २४ तास मिळतात, त्याच व्यवस्थित आपल्या आवडीप्रमाणे, कामाच्या प्राधान्या-प्रमाणे, गरजेप्रमाणे, नियोजन असणे आवश्यक आहे, म्हणजे आपले ध्येय पूर्ण होईल.
२) स्वतःला सुपरवुमन न समजणे मीच सगळं करणार आहे हा अट्टाहास स्त्रीयांनी सोडून द्यावा, सगळीच कामे केली तर, जे काम आपल्याला अधिक आवडीने करायचे आहे ते शक्य होणार नाही व ताणतणाव येईल.
३) स्वतःच्या दिनचर्येचे नियोजन करावे, म्हणजे गोंधळ होणार नाही. ताण वाढणार नाही.
४) संतुलित आहार :- आहार व्यवस्थित घ्यावा, कुठल्याही डायटच्या मागे न लागता, स्वतःला काय आवडतं, पचतं,
घरी ते बनवू शकतो व ज्यामूळे अधिक कॅलरीज मिळणार नाही हे बघावे. स्वतःच्या वजनावर नियंत्रण आहार घेतल्यास आपल्याला प्रचंड एनर्जी मिळते. त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते. चक्कर येत नाही, थकवा येत नाही, आजार होत नाही व प्रचंड उत्साह राहतो.
रोजच्या जेवणाबरोबर भरपूर सॅलॅडस्, हिरव्या पालेभाज्या, उसळी, डाळी, दही व जे मांसाहार घेतात त्यांनी आवडीप्रमाणे अंडी, मटण, मासे, वगैरे यांचा समावेश करावा, भरपूर फळे, व सुका मेवा यांचाही आहारात समावेश करावा, पाणी भरपूर प्यावे आपला आहार चांगलाच असणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
५) सुयोग्य व्यायाम आणि ध्यान धारणा:- शरिरिक हालचाल, व्यायाम यासाठी वेळ ठेवणे महत्वाचे आहे, व्यायामामुळे आपले वजन नियंत्रित राहते, शरीर सुडौल होते, आपली नाही, शारीरिक क्षमता वाढते व 'फील गुड' नावाचे हार्मोनमुळे आपण आनंदित राहतो, आपला दिवस उत्साहाचा, आनंदाचा जातो, मग नैराश्य यायचा, काळजी वाटण्याचा काही प्रश्नच येत
व्यायाम कुठलेही करु शकता पण त्यांच्यात सातत्य, चिकाटी ठेवणे आवश्यक आहे योगा व ध्यान (मेडीटेशन) मुळेही आपले मानसिक स्वास्थ छान राहते.
६) पुरेशी झोप :- ही अतिशय महत्वाची आहे, कमीत कमी ६-७ तास झोप घेतलीच पाहिजे म्हणजे अंगदुखी होणार नाही, एकाग्रता वाढेल, निर्णय क्षमता वाढेल व पुरेशी झोप झाल्यामुळे स्वतःला ताजेतवाणे वाटेल.
७) स्वतःचा छंद जोपासणे :- त्यासाठी वेळ देणे हयामुळे आपली बॅटरी चार्ज होते, तसेच आपल्या विचारांची इतरांशी देवाण घेवाण करणे, शेअर करणे, मदत घेणे, हयामुळे आपल्याला नैराश्य येणार नाही.
८) आर्थिक नियोजन :- स्वतःचे आर्थिक नियोजन ही अतिशय महत्वाचे आहे, जगामध्ये सगळी माहिती ठेवताना, चांगली लाईफ स्टाईल ठेवायची असेल तर योग्य पैसा हा हवाच, तसेच इर्मजन्सीच्या वेळी, आजारपणासाठी, दवाखान्यात पैसा जमवून ठेवणे, पैशाची बचत व गुंतवणूक करणे हे सुद्धा महिलांना आले पाहिजे.
९) आरोग्याची काळजी :- स्वतःचे आरोग्य हे ही जपले पाहिजे Prevention is better than qure, रोग होण्यापूर्वीच तो टाळता आला पाहिजे, म्हणून स्वतःची काळजी घेणे, बाहेरचं उघडयावरचे न खाणे, चांगले पाणी पिणे, प्रदुषित भागामध्ये जाणे टाळणे, तसेच मधुमेह, अतिरक्तदाब होऊ देणे टाळावे, नियमित डॉक्टरकडे जावून स्वतःच्या आरोग्यविषयक तपासण्या करुन घ्याव्यात, डॉक्टरांचा सल्ला ऐकावा.
स्तनाचा कॅन्सर होऊ नये म्हणून, स्वतःची स्तनांची काळजी व तपासणी करावी, स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी, नियमितपणे मॅनोग्राफी पॅप स्मीअर, पोटाची सोनोग्रॉफी करावी, म्हणजे गर्भाशयाचे काही आजार आहे का? कॅन्सरच्या गाठी आहेत का हे कळेल व आजार वाढण्यापूर्वीच त्याचे निदान होईल, कारण आपण आजारी पडलो तर काहीच करु शकत नाही, व असाध्य आजार झाला तर आपल्याला मृत्यू लवकर येईल व आपली स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणूनच स्त्रीयांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण स्त्री ही निरोगी राहिली तरच ती घरातील इतरांची काळची काळजी घेऊ शकते. कुटूंबामध्ये प्रत्येक व्यक्तीस महत्व असतं व सर्वांना सांभाळून त्यांची काळजी घेणे, त्यांना घडवणं, मदत करणं हयामध्ये प्रत्येक घरातील स्त्रीचा महत्वाचा सहभाग असतो.