लाभले भाग्य मला... 'कुसुमाग्रज यांचा सहवास!'

एका ऋषीतुल्य कवीश्रेष्ठाचा भूलोकीचा सहवास संपून आता दोन दशके उलटली आहेत. होय कुसुमाग्रजांना आपल्यातून जाण्याला विस वर्षे झाली. काळ वेगाने पुढे जातच असतो पण का कुणास ठाऊक आपल्याला सतत वाटत राहतं की काळाचा वेग झपाटयाने वाढतो आहे. कुसुमाग्रज, वि.वा. शिरवाडकर ह्याचं साहित्य, कविता, सामाजिक काम आणि त्यांची व्रतस्थ वृत्ती हे सर्व काही अलौकिक होते. त्यांच्या लेखनात आणि समाजकार्यात सदैव केंद्रस्थानी माणूसच राहिला. तसं बघायला गेलं तर तुमच्या आमच्या सारखच आयुष्य त्यांच्याही वाटयाला आल होते. अगदी लहानपणापासून जे छंद, दंगामस्ती आपण केलेली असते ती त्यांनीही केलेली असते. शिक्षण पूर्ण करतांना शिक्षणाशिवाय इतर अनेक विषयामध्ये धडपड करत राहणं हे ही आपल्यासारखच. नोकरी नसतानाही नोकरीतील अवस्था, आयुष्यात स्थिर होण्यासाठी करावी लागणारी कसरत हे सर्व चारचौसारखेच होते. पण अगदी वयाच्या विशी पंचविशीत कवितेने सोबत करायला सुरुवात केली आणि मग पुढे कविता आयुष्यभराची सहचारिणी झाली. उमलत्या तारुण्यातील सहज सुलभ प्रेम भावनाही कवितेतून प्रकट होऊ लागल्या. निसगार्शी नाते जोडले जाऊ लागले. मानवी स्वभावाचे कंगोरे त्यांच्या समोर येऊ लागले. साहित्यातील त्यांच्या आधीच्या पिढीतल्या ज्येष्ठांचे संस्कार त्यांच्या समोर येऊ लागले. साहित्यातील त्यांच्या आधीच्या पिढीतल्या ज्येष्ठांचे संस्कार त्यांच्या साहित्यावर, कवितेवर कळत नकळत होत राहिले. कवी कुसुमाग्रज, साहित्यिक वि.वा. शिरवाडकर आणि तात्यासाहेब अशी एक वेगळी ओळख तयार झाली. सार्वजनिक जीवनात संस्थांची उभारणी करताना यातल्या निखळ कार्यकर्ता असल्याने छोटया-छोटया उपक्रमातून समाजासाठी काम करत राहणे हा त्यांनी जोपासलेला विलक्षण छंद होता. त्यासाठी फार मोठी प्रसिद्धी मिळावी, गवगवा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी कधीच ठेवली नाही. एक मात्र नक्की त्यांनी हाती घेतलेली सामाजिक कामे इतरांनीही पुढे येऊन करावीत आणि मग सतत गुणाकार होत राहावा हे त्यांना अपेक्षित होते. एवढा मोठा कवी, नाटककार साहित्यातील सर्वश्रेष्ठ 'ज्ञानपीठ' पुरस्काराने गौरवलेला माणूस हे सगळं असूनही स्वतःच घर नसलेला होता. कारण स्वतःसाठी मालकीचे घर असावे असा विचारही त्यांच्या मनात आला नसावा पण त्यांच्या व्यक्तीमत्वाने आणि सहवासाने भारावलेल्या गावक-यांनी ह्या साधुपुरुषासाठी 'अपना घर' तयार केले. केवळ साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज राहिले असते तर त्या क्षेत्रातील त्यांचे अढळ स्थान कायम राहिलेच असते परंतु साहित्यापलीकडचे बरेच काही तात्यांनी साध्य केले होते. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर प्रवेशापर्यंत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर अगदी समाजात दुही निर्माण करणा-या जातीय दंगलीपर्यंतच्या विषयात व्यस्त असलेले यातल्या नेहमीच भरकटलेल्या समाजाला दिशा दाखविण्याचे काम करत असत.



कवी म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली श्रेष्ठ साहित्यिक वि.सखांडेकरांनी पुढाकार घेऊन प्रकाशित केलेल्या 'विशाखा', ह्या काव्यसंग्रहामुळे खरं तर त्या अगोदर तात्यांनी १९३३ साली 'जीवन लहरी' हा तळहाताच्या आकाराइतका कविता संग्रह प्रकाशित केला. सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक 'कोलरीज' चे एक अवतरण तात्यांनी पहिल्या पानावर दिले आहे. हे अवतरण म्हणजे कुसुमाग्रजांच्या सर्व काव्यनिर्मितीवर प्रकाश टाकणारे आहे. माझ्या लिखाणातून मी संपत्तीची वा सार्वजनिक कीर्तीची अपेक्षा करीत नाही त्या शिवाय ही मला भरपूर लाभ झाला आहे. असे मी मानतो. मला काव्य हे स्वयमेव अतिशय मोठे परीतोषक वाटत आहे. त्याने माझे दुःख हलके झाले आहे. माझा आनंद बहुगुणित आणि विशुद्ध झाला आहे. त्यामुळे मला एकांत प्रिय वाटतो आणि जे जे मला भेटते किंवा माझ्या भोवती असते त्यात शिव आणि सुंदर शोधण्याची इच्छा करावी अशी त्याने मला सवय लावली आहे.


'क्रांतीचा जय जयकार' पासून 'स्वतंत्रदेवीच्या विनवणी' पर्यंत प्रेम कसं करावं, कुणावर करावं सांगणारी, प्रेम कुणावरही कराव हा मानवी कल्याणाचा संदेश देणारी प्रेमयोग कविता किंवा अखेरीला मारवा संग्रहातील संधी प्रकाशातील पैलतीर समाधानाने गाठण्यासाठीच्या तयारीत असलेला केंव्हातरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो, असे वैश्विक चिंतन हे सर्व विलक्षण, नितांत सुंदर व नतमस्तक करणारे अनुभव आपल्याला कायम समृद्ध करत राहतात.



'नटसम्राट' ने तर नाटयसृष्टीत नवा विक्रम निर्माण केला. प्रत्येक दिग्गज कलावंताला 'गणपतराव बेलवलकर' आव्हानात्मक वाटले. प्रत्यक्ष नाटय रसिकांच्या मनामध्ये ते खोलवर रुजले. अनेक आख्यायिका तयार झाल्या नाटक बघून अनेकांनी वृद्धत्वात आपले मृत्युपत्र बदलण्याच्या कहाण्याही कानी येत राहिल्या स्वतः तात्या तर नटसम्राट बद्दल म्हणतात हे नाटक वृद्धाचे की नटाचे असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. पण तो खरा नाही हे सहज लक्षात येईल. नाटक केवळ वृद्धाचे नाही, नटाचे नाही ते वृद्ध झालेल्या नटाचे आहे. कलावंताचे आहे. ते वार्धक्य आहे. मूल्याच्या जगात वावरलेल्या आणि वास्तवापासून दूर राहिलेल्या एका नटाचे एक विलक्षण मनस्वी माणूस भोवतालच्या रोख ठोक व्यवहारी जगाशी तडजोड करून राहण्याच्या प्रयत्नात शेवटी कसा उध्वस्त होतो याची नटसम्राट ही कहाणी आहे.


अशा ह्या संत परंपरेतल्या कवी नाटककारासमवेत खूप सहवास लाभलेले माझ्या सारखे असंख्य साहित्यप्रेमी आहेत. आम्हाला तात्यांनी जगायला शिकवले. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टींचा संग्रह असतो, आपण विनाकारण शत्रूत्व घेतो, मैत्री विसरतो, माणुसकी विसरतो, स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचे मार्ग निवडतो हया सर्वांवर मात करण्यासाठी साथीला भक्कम उभे राहतात ते कवितेतून, नाटकातून, विविध लेखनातून सोबत करणारे तात्या शेवटीची प्रसन्न कविता रूणझुणत राहतात.


असे हे कुसुमाग्रज चिरंतन स्मृतीच्या कुपीत जपून ठेवले आहेत.