राजधानीत बालगंधर्वांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त 'असा बालगंधर्व' चे हिंदी प्रकाशन

'अभिराम भडकमकर यांच्या मूळ पुस्तकाच्या अनुवादाचे साहित्य अकादमीत प्रकाशन'


मराठी नाट्यसृष्टीतील मानाचे स्थान असणा-या बालगंधर्वांचे हिंदी चरित्र साहित्य अकादमीच्या रविंद्र भवन सभागृहात प्रकाशित झाले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते आणि नाट्य- पटकथालेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या 'असा बालगंधर्व' या कादंबरीचा हा अनुवाद असून तो राजकमल प्रकाशनाने राष्ट्रभाषेत आणला आहे.



नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्यावर अभिराम भडकमकर यांनी 'असा बालगंधर्व' ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. मराठीत ती राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली असून आतापर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हीच मूळ कादंबरी हिंदीमध्ये राजकमल प्रकाशनाने आणली असून त्याचा प्रा. गोरख थोरात यांनी अनुवाद केला आहे. राष्ट्रभाषेत बालगंधर्व यांचे समग्र चरित्र प्रथमच प्रकाशित झाले आहे. यानिमित्ताने हिंदी भाषिकांना बालगंधर्वांची नेमकी ओळख होणार आहे.राजधानी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा पद्मश्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री रामगोपाल बजाज होते तर अध्यक्षपदी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे होते. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते व लेखक आणि नॅशनल मिशन फॉर कल्चरल मॅपिंगचे अध्यक्ष दीपक करंजीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्यावतीने प्रमुख अतिथिंचे स्वागत करण्यात आले.