सुजाण पालकत्व!

टीचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला.


एकच लक्ष.



पलिकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं.


पहिल्या तिघांना बक्षिस.


पहिल्या तीनसाठी सगळयांची चढाओढ. बघायला सगळयांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा जास्तच होता.


पावले परत फिरली.


गर्दीतुन बघ्यांचे 'पळ पळ' म्हणून आवाज वाढू लागले.


पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं.


चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले. 


आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले.


त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच.


५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.


बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन । तिला उचलून घेतले आणि म्हणाला,


'वेल डन बच्चा.चल कुठले आइस्क्रिम खाणार?'


'पण बाबा माझा नंबर कुठे आलाय?' मुलीनं आश्चर्याने विचारलं.


'आलाय की.पहिला नंबर आलाय तुझा बेटा.'


'कसा काय बाबा. ५वा आला ना?' मुलगी गोंधळलेली.


'अगं, तुझ्या मागे कितीजण होते?' थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली, ४५ 'जण'


'म्हणजे उरलेल्या ४५ जणात तू पहिली आलीस.म्हणून तुला आइस्क्रीम


'आणि पुढचे चार जण?'


गोंधळ वाढला तिचा.


'त्यांच्याशी आपली शर्यत नव्हतीच यावेळी'.


'का?'.


'कारण त्यांनी जास्त तयारी केलेली.आता आपण परत चांगली तयारी करायची.


मग पुढल्यावेळी तु ४८.


जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात


'असं असतंय बाबा?'.


'होय बेटा असंच असतंय'.


'मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की?' आता मुलीला उत्साह आलेला.


'एवढी घाई कशाला बेटा? पाय मजबूत होऊदेत की.आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही'.


तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, "तुम्ही म्हणाल तसं'.


 "आता आइस्क्रिम सांगा की हो". - बाबा.


मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खांद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,


'मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे'.


पालकांनी मुलांना प्रोत्साहन देतांना कशी मानसिकता हवी हे सांगणारी ही पोस्ट.


।। जगी ऐसा बाप व्हावा...।।


(सुजाण पालकत्वासाठी...)


समृद्ध पालक अभियान.