प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर, नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगणा संध्या पुरेचा आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष २०१७ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा- या संगीत नाटक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. अकादमीच्या इंफाळ (मनीपूर) येथे झालेल्या बैठकीत वर्ष २०१७ च्या नाटय अकादमी पुरस्कारा साठी देशभरातील ४२ कलाकारांची तर उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांची निवड करण्यात आल्याचे संगीत नाटक अकादमीच्या अधिकृत ट्वीटर हँडलहून सांगण्यात आले आहे.
संगीत, नृत्य, नाटय आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणान्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. यावर्षी २०१७ च्या नाटय अकादमी पुरस्कारासाठी संगीत, नृत्य, नाटय आणि लोककला या श्रेर्णीमध्ये देशातील एकूण ४२ कलाकारांची निवड करण्यात आली आहे. यात नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटयलेखक अभिराम भडकमकर व नाटय दिग्दर्शक सुनील शानभाग यांची निवड झाली आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द तबलावादक योगेश सामसी यांची तर लोककलेतील योगदानासाठी लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारसाठी निवड झाली आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशीप
नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना युवा पुरस्कार
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द गयिका सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना २०१७ चा उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरवर्षी एका शानदार सोहळयात राष्ट्रपती यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते.