अलिकडेच 2 दिवस मुंबई मध्ये ऊर्जा विषयक परिसंवाद होता, अनेक तज्ञ, मान्यवर, मंत्री आले होतेमाननीय मंत्री साहेबांचं भाषण झालं आणि चहापानासाठी आम्ही बाहेरच्या लबी मध्ये आलो, चहापान चालू असताना मंत्री मोहोदयांशी एक आजी चर्चा करत होत्या, त्यांचं वय साधारण ८० असेल, आपल्या आजीसारख्या दिसणा-या सध्या सुध्या या बाई मंत्र्यांशी उर्जे सारख्या किचकट विषयावर काय बोलत असतील या विचाराने मी जरा जवळ गेलो, जव्हार - मुखेडा भागातील ऊर्जा समस्या आणि त्यावर त्यांनी सौरऊर्जेचं केलेलं काम या बद्दल त्या अतिशय मुद्देसूद चर्चा करत होत्या,मी अक्षरशः भारावून गेलो ,नंतर आजींची वेगळी भेट घेऊन त्यांच्या कडून माहिती ऐकली तेंव्हा अक्षरशः स्तंभित झालो !
आजीचं नाव आहे श्रीमती सुनंदा पटवर्धन, प्रगती प्रतिष्ठान च्या सचिव, वय वर्ष ७९ आणि तरीही आजही १५ दिवस ठाणे आणि १५ दिवस जव्हार मुखेडा या भागात राहून फिल्ड वर्क करतात हे ऐकून स्वतःचीच स्वतःला शरम वाटली! गेली ३४ वर्ष पटवर्धन आजी हे काम करत आहेत, मूळच्या वाईच्या असलेल्या पटवर्धन आजी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनी, आजही त्या संस्थेसाठी भाऊबीज फंड गोळा करतात, संस्थेचा प्रतिष्ठेचा बाया कर्वे पुरस्कारही त्यांना मिळाला आहे , थोडक्यात आजींना हे बाळकडू संस्थेकडून मिळल्यासारखं आहे.
या दुर्गम आदिवासी भागात सिमेंट बंधारे बधाण्याचे काम, बालमृत्यू रोखण्यासाठी उन्हातान्हात केलेली भटकंती, त्या भागात दिव्यांगांसाठी निवासी शाळा, दुर्गम भगत सौरऊर्जा प्रकल्प, शुद्ध पाणी योजना, शेततळी, कृषी विकास आशा अनेक योजना प्रगती प्रतिष्ठान तर्फे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राबवल्या जात आहेत, आणि पटवर्धन आजी त्याच्या कणा आहेत!