अगदी सोपे नश्वर आहे
पवार किंवा मोदी होणे!
त्याहून कितीतरी उदात्त आहे,
होणे मेजर कौस्तुभ राणे
किती कमांडो यांच्याभवती,
त्याच्याभवती केवळ मृत्यू!
कोणी छळती देशाला तर
संरक्षण दुस-याचा हेतू!
एकोणतीस वर्षाचे जगणे,
दरवळले रक्ताचे अत्तर!
रोज औषधे योगा करूनी,
कशास सत्तर वा पंच्याहत्तर?
चार मारता चारही गेले,
प्रमाण नाही कधीच योग्य!
झेड सुरक्षा असते त्यांचे,
चिरंजीव होते सौभाग्य!
चंद्र सूर्य हे असेतोवरी,
वीरपत्नी, 'तू नाही विधवा!'
'यदायदाय' आठव आणि
तिच्या पाठीशी रहा माधवा!
कौस्तुभ राणे नाही दिवंगत,
हरेक हृदयी फक्त चिरंजीव
हरेक सैनिक प्रिय प्राणाहून,
हरेक भारतीयाची जाणिव!
साठीशांती वा चंद्रदर्शने,
त्याहूनी भारी ही तरुणाई!
खूर्चीवरती किती बढाई,
सीमेवरती फक्त लढाई!
किती भव्यता या मरणाला,
घुसली गोळी रडते आहे
तेजाचे ते प्राणपाखरू,
दिगंताकडे उडते आहे!
सुपुत्र शब्दा येते किंमत,
सीमेवरती लढणा-यांना!
तरीही किंमत येते कोठून,
निवडणुकीतुन पडणा-यांना!
समुद्रमंथनी कौस्तुभ येतो,
सिद्ध आजही झाले रत्न !
टोप्यांनो, नुकसान टाळण्या,
करा जरासे 'खरे' प्रयत्न!