मेघदूत'...विरहात प्रेमाची उत्कटता आकंठ होता आपल्या प्रेयसीशी संवाद साधण्याचा कुठलाच मार्ग नाही अशा अगतिकतेत तिच्यापर्यंत आपला प्रेम-संदेश पोहोचवण्यासाठी पावसाळी मेघाला दूत मानण्याची तरल कल्पना जन्माला यावी हा भाषिक अलंकार कालिदासच करू जाणे! विरहात प्रेमाची कसोटी पाहिली जाते हे खरंच; पण विरहाच्या दाहक वणव्यातही प्रणयाचा गंध लेवून बकुळीचा गंध-मळा फुलावा हा या नश्वर जगापलिकडला प्रेमाचा आविष्कार म्हणावा लागेल. खरंच, या जगात जर कुठेही प्रेम या भावनेने जन्माला येणे असेल तर ते यक्षाच्याच हृदयी. केवळ आणि केवळ त्याच्या यक्षिणीसाठीच!
कालिदास हा राजकवी. पण राजकवी होण्याआधी तो ज्या एका लहानशा गावात रहात असे तिथे यामिनी नामक मुलीचं त्याच्यावर आणि त्याचही यामिनीवर निस्सीम प्रेम होतं. कालिदासाला त्याच्या काव्यप्रतिभेसाठी राजकवीची संधी चालून आल्यावर यामिनीनेच त्याला गाव सोडून जा आणि ही संधी सोडू नको असं सांगून अक्षरशः पिटाळलं.
मी आहेच तुझी, तू राजकवी हो आणि मीही येईन मग तुझ्याबरोबर. तू मला घ्यायला ये; मी तुझी वाट पाहेन.
किती भाबडा सौदा?!
कालिदास राजकवी झाला आणि सम्राटाच्या राजकारणाच्या चक्रव्युहात असा काही अडकला की यामिनीच्या प्रेमापासून दुरावला. अद्वितीय काव्यप्रतिभेचं बक्षिस म्हणून त्याला काश्मिरचा राजा करण्यात आलं; पुढे फसवणूकीतून सम्राटाने आपली बहिण प्रियदर्शिनी हिचा विवाह कालिदासाशी लावला. पण या सगळ्यातही कालिदासाच्या मनातलं यामिनीचं प्रेम त्याला कायम अस्वस्थ करत राहिलं. कालांतराने एका युद्धात (की अंतर्गत बंडात?) कालिदास त्याचा प्रांत हरला आणि या पराजयाने खचलेला कालिदास सम्राटाला आता तोंड कसं दाखवू या पराभूत मानसिकतेने परागंदा झाला.
परागंदा झाल्यावर हा थोर कवी गावोगाव भटकत राहिला. त्या अवस्थेतही त्याला जीवंत ठेवणारी चेतना होती ती म्हणजे त्याचं यामिनीवरचं प्रेम.पुन्हा एकदा त्याला ते निखळ प्रेम हवं होतं.शेवटी त्याने ठरवलंच आणि तो वेशांतर करून त्याच्या मूळ गावी गेला.. यामिनीला भेटण्यासाठी. पण, तिथे पाहतो तर काय?! त्याला फक्त यामिनीची उध्वस्त झोपडीच दिसली. ही यामिनी गेली कुठे?! तिच्या झोपडीची ही अवस्था? वेशांतर केल्याने त्याच्याच गावची लोकही त्याला ओळखू शकले नाहीत. त्याने थोडं धाडस करून आजूबाजूला चौकशी केल्यावर त्याला लोकांकडून कळलं, यामिनी सतत, फक्त आणि फक्त कालिदासाच्या नावाचाच जप करत होती. तो कालिदास म्हणे युद्ध हरून परागंदा झालाय; आणि हे तिला कळलं होतं. एके दिवशी कुणालाही काहीही न सांगता, कळू देता, यामिनी इथून निघून गेली, कायमची. तिचा ठावठिकाणा कुणालाच माहित नाही.
बाप रे! काय क्षण असेल तो कालिदासासाठी?! जिच्या प्रेमाची आशा त्याच्यासाठी त्याच्या पुढच्या आयुष्याचा आधार होती तीच नाहीये. कधी कुठे भेटेल माहित नाही; कधी भेटेल तरी का तेही माहित नाही. पराभूत मानसिकेत अपराधीपणाची आहूती पडली आणि कालिदास अशा उध्वस्त मनाने भटकत राहिला. त्याच्या यामिनीला शोधण्यासाठी.
काय वाटत असेल त्याला तेव्हा? इतका महान कवी, त्याच्या आयुष्याची अशी शोकांतिका?! कसा ढकलत असेल तो प्रत्येक दिवस?
यामिनीच्या विरहात व्याकूळ या ओजस्वी प्रतिभेच्या कवीश्रेष्ठाने एक पावसाळी मेघ पाहिला आणि यक्ष - यक्षिणीची प्रेमकथा रचत त्याच्या प्रेमाची उत्कटता शंभराहून अधिक संस्कृत श्लोकांमधून लिहिता झाला; जन्माला माला आली एक अभूतपूर्व साहित्यकलाकृती, मेघदूत.
या मेघदूतातल्या यक्षाला कुबेराने शाप दिलाय; त्या यक्षाचा गुन्हा तो काय? कुबेरासाठी महाकाल मंदिरात पुजेसाठी कमळे आणायला गेलेल्या यक्षाला त्याच्या प्रियतमेच्या, यक्षिणीच्या प्रेमळ बाहूपाशात आपल्या कामाचा विसर पडला. हे पाहून कुबेराला राग अनावर झाला आणि त्याने त्या यक्षाला त्याच्या कामचुकारपणाची शिक्षा म्हणून त्याच्या यक्षिणीपासून दूर रामगिरी पर्वतावर एक वर्ष विजनवासात राहण्याची शिक्षा ठोठावली. इतकंच नाही, तर यक्ष - यक्षिणी मायावी विद्येचा वापर करून एकमेकांना भेटू नयेत म्हणून त्यांचे यक्षमणीही काढून घेतले! एक वर्ष आपल्या प्रेमापासून दूर, इकडे यक्षिणी आणि तिकडे यक्ष!
प्रेयसीच्या विरहात व्याकूळ हा यक्ष, आषाढाच्या पहिल्या पाऊससरी घेऊन आलेल्या मेघाला पाहून त्याला त्याचा दूत होण्याची विनंती करतो. यक्ष मायावी, त्यामुळे तो आपल्या मेघाला फसवत तर नाहीये ना या काळजीने दामिनी, मेघाची पत्नी, त्याला सतत यक्षाच्या विनंतीला अमान्य करण्यासाठी विनवत राहते. पण यक्षाच्या प्रेमातला सच्चेपणा आणि अशा प्रेमी युगुलावर झालेला अन्याय पाहून प्रेमी युगुलावर झालेला अन्याय पाहून मेघाचं आणि दामिनीचं हृदय हेलावतं. मेघ त्याचा दूत बनून यक्षिणीकडे जायला तयार होतो.
प्रेमात झुरणारा यक्ष मेघाला सांगतो, जा आणि माझ्या प्रियेला माझा निरोप दे. हे सांगत असताना तो मेघाला जाण्याचा रस्ता सांगतो आणि रस्त्यात कुठे कुठे काय काय जागा लागतील त्यांची अक्षरशः शब्दचित्र रेखाटतो. इथे विशेष असं की ही वर्णनं करत असतानाही यक्ष त्याच्या मित्राला, मेघाला, रस्त्यात येणा-या विविध ठिकाणी राहणा-या लोकांच्या व्यथा दूर कर हेही सांगायला अजिबात विसरत नाही. गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।
सौदामन्या कनकनिकषस्निगया दर्शयोर्वीः
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूविक्लवास्ताः ॥
मेघदूत-पूर्वमेघ.
काय तरल शब्दकळा आहे पहा. यक्ष मेघाला म्हणतोय, रात्रीच्या अतिशय गडद काळोख्या अंधारात, जेव्हा रस्तेही दिसेनासे झाले असतील, तेव्हा आपल्या प्रियकराच्या भेटी आतूर रमणी या अंधारात ठेचाळतील. अशावेळी तू विद्युल्लतेच्या तेजाने उजळलेल्या तुझ्या सोनेरी कडांनी त्यांचा मार्ग प्रकाशमान कर, त्यांना रस्ता दाखव. मात्र हे मेघा, उगीच पाऊस पाडून किंवा गडगडाटी गर्जना करून त्यांना विनाकारण घाबरवू नको, कारण या विलासिनी ललना अतिशय कातर मनाच्या असतात; अशाने उगीच घाबरतील रे त्या.
..आणि हे शब्द वाचता वाचता स्त्रीमनाच्या भावनोत्कटतेचा इतक्या तरल पातळीवर विचार करून लिहिणा-या कालिदासाच्या सुमधुर शब्दकळेच्या मृदगंधात आपणही भान हरपून बसतो; कालिदासाच्या प्रेमात पडतो.
रस्त्यात येणा-या. निव्वळ नद्यांची वर्णनंही काय सुरस आहेत. प्रत्येक नदी वेगळी. एक उत्श्रृंखल, तर दुसरी उदात्त आणि एक कृश पण तरीही नीलकान्ती कमनिय! एके ठिकाणी तर तो म्हणतो, हे मेघा, ती सिंधू तुझी वाट पाहतीये आणि तुझ्या विरहात आहे.एखाद्या युवतीने तिचा केशसंभार मोकळा सोडावा अशी जलधारा असलेली ती तुझी वाट पाहतीये. जा आणि तिला तुझ्या प्रेमवर्षावात न्हाऊघाल.
तो स्वतः प्रेमात झुरत असताना आणि आपल्या प्रेयसीच्या विरहाने व्याकूळ असतानाही त्याला असलेलं हे परदुःखाचं भान मेघदूतातल्या या निःस्वार्थ यक्षाला इतर वेगवेगळ्या साहित्याविष्कारातून समोर आलेल्या प्रियकरांपेक्षा खूपच थोर बनवतं.
आणि मेघाबरोबर प्रेयसीला धाडलेला निरोप तो काय?! मी कुशल आहे, तू मात्र स्वतःची काळजी घे. इथे आजूबाजूला असलेल्या निसर्गात, लता-वेलींमध्ये मला तू आणि फक्त तू दिसतेस.तुझ्या आठवणीत मी तुझे चित्र दगडावर रेखाटतो, पण दैवही कसले अघोरी की ते चित्रही माझ्याच अधूंनी भिजून पुसले जाते. बस्स, आता आणखी थोडेच दिवस. एकदा हा शाप संपला की कोणी शिक्षेला चिकटून राहतो का कधी?! माझ्या मनातल्या तुझ्याबद्दलच्या प्रेमावर जराही संशय घेऊ नको. मी तुझाच होतो, आहे आणि राहिन. कार्तिक मास येताच मी शापातून मुक्त होईन; मग आपण पुन्हा भेटू; पुन्हा एकदा प्रणयाच्या मुग्ध रात्री जागवू आणि एकमेकांच्या आलिंगनात विरघळून जाऊ आलोच मी.तू मात्र स्वतःची काळजी घे!!
इथे कालिदास आणि यक्ष पुर्णतः एकरूप झालेले दिसतात आणि म्हणूनच प्रत्यक्षात आपल्या प्रेयसीपासून (कायमचाच?) दुरावलेला कालिदास आपल्या श्वासांचे वल्हे थंडावून नौका पैलतीराला लागण्याआधी आपल्या यामिनीला भेटण्याची सुप्त इच्छा त्याच्या काव्यातल्या यक्षाच्या भूमिकेतून जगण्याचा प्रयत्न करतो. आजही मेघदूतातला संदेश ऐकताना, वाचताना माझे डोळे पाणावतात.. त्या महान कवीसाठी, जो स्वतः युध्दात शस्त्रूच्या हाती राज्य हरल्याने राजाला तोंड कसं दाखवू? या पराभूत मानसिकतेने परागंदा अवस्थेत फिरतोय आणि मनात त्याच्या यामिनीसाठी प्रेमाची भावना यक्षाच्या भूमिकेतून कल्पनाविलासाने उभ्या केलेल्या प्रतिमांच्या विश्वात जगण्याचा प्रयत्न करतोय.एक अगतिक आत्मसांत्वना.
कालिदास हा खरोखर एक महान कवी; नव्हे, महाकवी हे बिरूद लावावे असा किमान माझ्या वाचनातला तरी एकमेव साहित्यकार! त्याचं प्रत्येक महाकाव्य केवळ अप्रतिम. मेघदूताप्रमाणेच कालिदासाने लिहिलेलं रघुवंशम ही महाकाव्यही अतिशय रसाळ आहे.भाषा तर अप्रतिमच; पण कालिदासाचा भूगोल इतका पक्का कसा होता ते काही कळत नाही!
पुण्याचे प्रसिद्ध सर्जन आणि स्वतः उत्तम पायलट असलेले डॉ.भावे यांनी सहा वर्ष स्वतः संस्कृतचा अभ्यास करून मेघदूतात सांगितलेल्या वर्णनांप्रमाणेच विमानप्रवास केला. सन १९९१ मध्ये नागपूरजवळच्या रामटेकपासून प्रवास सुरू करत विदिशा, उज्जैन, हरिद्वार, हृषिकेश, नितिपास (niti pass) करत कैलास पर्वतापर्यंतचा किलोमीटर्सचा प्रवास करताना त्यांना कालिदासाने मेघदूतात सांगितलेली सगळी वर्णनं अगदी जशीच्या तशी आढळली. इतकंच नाही तर कालिदासाच्या रघुवंशममध्ये त्याने वर्णन केलेला लंका ते अयोध्या हा किलोमीटर्सचा प्रवासही त्यांनी त्यांच्या बीचक्राफ्ट प्लेनमधून केला आणि कालिदासाने त्याच्या लेखनात वर्णन केलेल्या सगळया जागा त्यांना जशाच्या तशा आढळल्या.डॉ.भावेंचा अभ्यास आणि परीक्षणं पाहता कालिदासाला इतकं सुरेख भौगोलिक एरियल ओरिएण्टेशन कसं काय मिळालं होतं हे माझ्यासाठी खरोखर एक कोडंच आहे.
मेघदूत, त्यातले यक्ष आणि यक्षिणी, आणि त्यामागून बोलणारा कालिदास.सारंच जणू भारतीय साहित्याला पडलेलं एक गोड स्वप्नंच. वाटतं, कालिदासाला खरंच त्याचं प्रेम मिळायला हवं होतं. यामिनीच्या घट्ट आलिंगनात कालिदासाचं काव्य कदाचित आणखी बहरलं असतं.नियती कधी कधी इतकी क्रूर आणि निष्ठूर का वागते हे या नश्वर जगाला पडलेलं कोडं आज पावेतो कुणालाही उलगडलेलं नाही; पण कालिदासासारखा तरल भावपूर्ण अभिव्यक्ती असलेला शब्दप्रभू महाकवीही याला अपवाद नसावा ही बाब मात्र मनाला चटका लावून जाते..
धन्य ते मेघदूत आणि धन्य तो कालिदास.आदरपूर्वक अभिवादन!