राष्ट्र निमार्णात शिक्षकांचे योगदान महत्वाचे : उपराष्ट्रपती महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

शिक्षक हे राष्ट्राच्या निर्माणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात असे, प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यकय्या नायडू यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या सोहळयात केले. यावेळी महाराष्ट्रातील विक्रम अडसूळ या प्राथमिक शिक्षकास 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने' उपराष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०१७' राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपराष्ट्रपती, केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्य बळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव लीना रे उपस्थित होते.


याप्रसंगी उपराष्ट्रपती म्हणाले, चांगल्या शिक्षकांमुळेच शिक्षण क्षेत्रात भारत उत्कृष्टतेकडे वाटचाल करीत आहे. शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी शिक्षकांना आज पुरस्कृत केले जात आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बजावलेली भूमिका सर्वांना माहिती व्हावे यासाठी शासन उपक्रम राबवीत असल्याचेही सांगितले. एकेकाळी भारताची ओळख ही विश्व गुरू म्हणुन होती. भारताने जगाला अनेक बुध्दीवंत दिले आहेत. वर्तमानात विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकांसमोर असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.


सामाजिक मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले, नैतिकता आणि मूल्य हे शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्याचे महत्वपूर्ण काम शिक्षकांनी केले पाहिजे. मातृभाषेत प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही उपराष्ट्रपती यांनी यावेळी केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री. जावडेकर यांनी मंत्रालयाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे आहे.



अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणा-या बंडगरवस्ती या अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले श्री. विक्रम अडसूळ या एकमेव शिक्षकाची निवड यावर्षी महाराष्ट्रातून करण्यात आली आहे. श्री. अडसूळ तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहेत. आपल्या शिक्षकी जीवनात नवनवीन उपक्रम राबवून त्यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमाला नवी दिशा दिलेली आहे.


पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. अडसूळ यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, 'या वर्षीची राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अधिक पारदर्शक होती'. सहशिक्षकांच्या मदतीनेच शाळेत नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आणि त्यामुळेच आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशी प्रतिक्रीया श्री. अडसूळ यांनी दिली.


बंडगरवस्तीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा कायापालट


जिल्हा परिषद शाळेमध्ये केलेल्या बदलांविषयी सांगताना श्री. अडसूळ म्हणाले, शिक्षणाचे महत्व स्थानिकांना पटवून लोकसहभागातून शाळेला लॅपटॉप, संगणक उपलब्ध करून दिलेले आहे. मुलांना आंनदी वातावरणात शिकविले पाहिजे त्यासाठी शाळेमध्ये आनंदी शिक्षण असा उपक्रम राबविला याअतंर्गत नाटकाच्या माध्यमातून अभ्यास शिकविला जातो. मुलांनाच पात्र निवडायला सांगितले जाते, लिहायला प्रोत्साहीत केले जाते. यासोबतच व्हिडीओ तसेच ऑडीयोची निर्मिती करूनही विद्यार्थ्यांना शिकविले जाते. यु-टयूब, फेसबूकवर अभ्यासाला पूरक असणारे चांगले व्हिडीयो विद्यार्थ्यांना दाखविले जातात. राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय बांधणीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना घडविण्याच्या प्रयत्नांमध्ये शाळेत गणतंत्रदिन, स्वातंत्र्य दिनासोबतच, रक्षा बंधन, ईद, दिवाळी असे सर्वच सण साजरे केले जातात. नगरपंचायत, पोलीस स्थानके, न्यायालय येथे विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातात. सीमेवरच्या सैनिकांना बंडगरवस्तीतील जिल्हा परिषदेच्या शाळेने राख्याही पाठवलेल्या आहेत.