विठ्ठला तू वारकरी


मीच माझी पंढरी, अन विठ्ठला तू वारकरी..


पाऊले का शोधतो मी


आत माझ्या अंतरी;


सोडुनी जे भंगले ते,


शोध साधक पंढरी!


मीच माझ्या अंतरी मग निर्मिला हा श्रीहरी;


मीच माझी पंढरी, अन विठ्ठला तू वारकरी. ।।१।।


प्राक्तनांचे भोग जेव्हा..


जीवनाला वेढती;


रूध्द मौखिक सांत्वनांची..


त्यात पडते आहुती;


मी न जाणी धर्म कुठला, रिक्त ओंजळ मी धरी; ।


मीच माझी पंढरी, अन विठ्ठला तू वारकरी ।।२।।


दैव हे तव देणगी, अन..


श्वासही तव चेतना;


मुग्धतेचा शापही तव,


जाळते मज कामना;


रोज "जगणे अन जगवणे" हीच वारी मी करी;


मीच माझी पंढरी, अन विठ्ठला तू वारकरी! ।। ३॥


शब्द-शब्दा शब्द भिडला,


गीत उमगे ना मला..


मी न राजा, मी न याचक,


काय मी मागू तुला?


सत्य एकच "सत्व" माझे, का चढ़ तव पायरी?


मीच माझी पंढरी, अन विठ्ठला तू वारकरी! ॥४॥