विमानाने 'टेक ऑफ' केलं आणि हळुहळू चेन्नई दृष्टिपथातून ओझर होत गेलं. मनाच्या काचेवर भरघोस पाऊस पडू लागला.. आठवणींचा...अनुभवांचा! का मन गहिवरलं, अस्वस्थ झालं हा प्रांत सोडताना आज?
तेरा वर्षांपूर्वीचा 'तो दिवस' आठवला जेव्हा विजयने फोनवरून तामिळनाडू काडर मिळाल्याचं सांगितलं होतं. पायाखालची जमीन एका झटक्यासरशी कुणी ओढून घेतली असं वाटलं. गलितगात्र झाले. नकाशा बघून चढया आवाजात 'भारत माझा देश आहे' म्हणणं वेगळं आणि सक्तीने त्या प्रतिज्ञेची अंमलबजावणी करायला भाग पडणं वेगळं. शाळा ते कॉलेज... निरागस बालपण ते स्वप्नाळू तारुण्यापर्यंतचा प्रवास महाराष्ट्रातल्या 'प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंट' मध्ये केलेली मी आता पुढचं आयुष्य अशा राज्यात घालवणार होते ज्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. तिथली भाषा, तिथले लोक, तिथली गावं-शहरं... कशी पॅक्टिस करेन मी तिथे? पेशंटशी संवाद कसा साधेन? आभाळभर प्रश्नांची कणभर मनात दाटी झाली!
स्वतःला सावरत नियतीवर विश्वास ठेवून शेवटी विजयच्या पहिल्या पोस्टिंगच्या ठिकाणी, कोइंबतूर जिल्ह्यात पोल्लाचीला अवतरले. अॅनेस्थेशिया मधल्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने मनापासून भावली होती गजबजलेली आमची मुंबई! त्या विरोधाभासावर पोल्लाचीच्या नवख्या पण शांत, हिरव्या वातावरणाने लगेच लक्ष वेधून घेतलं. नजर जाईल तिकडे नारळाच्या बागा, भाताची शेतं. आणि या हिरवळीच्या मधोमध सब-कलेक्टरचा महालवजा ब्रिटिशकालीन बंगला!
ते सारं अनपेक्षित निसर्ग सौंदर्य बघण्यात दंग असताना अचानक एक वयस्कर इसम हात जोडून 'वणक्कमअम्मा' म्हणत अक्षरशः पाया पडला. मी दचकून आजुबाजुला बघितलं तर 'अम्मा' या संबोधनाला साजेशी कुणीही व्यक्ती आसपास नव्हती. पन्नाशीतला तो विशीतल्या मला अम्मा म्हणत होता. हसूही आलं आणि आश्चर्यही वाटलं. पण हे सारं मनाला भावलं. पहिल्याच दिवशी तामिळनाडू आणि तिथल्या लोकांबद्दलचा परकेपणा विरघळायला सुरुवात झाली होती.
या तंगराजशी संवाद साधायचा एकच मार्ग होता तो म्हणजे हातवारे. मला माहीत असलेली मराठी, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच यापैकी एकही भाषा त्याला येत नव्हती आणि त्याला येणारी एकमेव तामिळ मला उमगत नव्हती. पर्याय नव्हता. पेन आणि वही घेऊन विजयने शिकवलेल्या 'इदु एन्न?' अर्थात 'हे काय?' या दोन शब्दांच्या आधारे माझ्या तामिळ शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. स्वयंपाकघर तामिळची तालीम बनलं. दोन शब्दांचा दोर पकडून मी शब्दामागून शब्द आणि वाक्यामागून वाक्ये सर करू लागले. मसुरीत शिकलेली लेखी आणि बोली अशी दोन्ही प्रकारची तामिळ विजय रोज सकाळी मला शिकवायचा. एकूणच कोइंबतूर भागातले लोक फार अदबीने बोलतात. लहान बाळांनासुद्धा आदरार्थी संबोधतात. ओघाने मीही तीच भाषा उचलली. माझी तामिळ विजयच्या तामिळपेक्षा ऐकायला चांगली आणि गोड वाटते, अशी प्रतिक्रियाही मिळू लागली.
भाषेचा गड सर होऊ लागला तसे दैनंदिन घरगुती प्रश्न सुटत गेले. करिअरच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरूवात केली. एका सीनिअर अॅनेस्थेशिऑलॉजिस्टना गाठून त्यांच्यासोबत ऑपरेशन्सला जाऊ लागले. तिथल्या लोकल पॅक्टिसेस, पेशंटशी बोलताना आवश्यक असलेले तामिळ शब्द, वाक्प्रचार लिहून पाठ करू लागले. एक गोष्ट लक्षात आली. तामिळनाडूच काय, कुठल्याही प्रांती गेलं तरी एकदा का तुम्ही तिथली भाषा शिकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता आहात, हे लोकांना कळलं, तर तेही तुम्हाला स्वीकारतात.
डॉ. कंदस्वामींबरोबर पॅक्टिस करता करता सिनियर-ज्युनियर नात्याचं कधी 'बाप-लेक' नात्यात रुपांतर झालं कळलंच नाही. मी प्रेग्नंट असताना हा माणूस दर रविवारी फ्रिझमध्ये फळं ठेवून निघून जायचा. म्हणायचा तुला असं वाटायला नको की तुझे वडील इथे नाहीत. प्रेग्नन्सी मध्ये काहीही त्रास झाला तर अर्ध्या रात्री धावून येत माझे हे तामिळ वडील. पुढे सीझेरियनच्या वेळी मला अॅनेस्थेशिया देखील त्यांनीच दिला. मी अगदी हसत हसत सीझेरियनला गेले कारण ते हॉस्पिटल माझ्या पूर्ण परिचयाचं होतं. माझी आई मला ऑपरेशनसाठी इतकं प्रसन्नचित्त जाताना बघून थक्क झाली. कारण होतं, तामिळनाडूच्या लोकांशी, तिथल्या मातीशी घट्ट होत असलेलं नातं.
प्रेग्नन्सीमध्ये झालेले लाड तर स्वप्नवतच भासतात. सातव्या महिन्यात सात प्रकारच्या भातांचं जेवण, चुडा भरणं... एकदा नव्हे अनेकदा. आदिचा जन्म झाला तेव्हा 'आमचा राजकुमार' म्हणत अख्ख्या गावानं त्याला उचलून धरलं. त्याच्या नामकरण सोहळ्यात हेच नातेवाईक होते
..ट्रान्सफर होऊन कांचीपुरमला निघताना डोळे पाणावणं साहजिक होतं...आमचेही आणि गावाचेही.
सतत ट्रान्सफर्समुळे तामिळनाडूचा बराच भाग बघायला मिळाला. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी डोंगर द-यांत बांधलेली धरणं, कालवे, घनदाट जंगलं...तिथलं संगीत, कविता, सुंदर गाणी, सुरेख चित्रपट! मागे वळून बघताना वाटतं की मी आजन्म महाराष्ट्रातच राहिले असते तर या सगळ्याला मुकले असते.
अर्थात जिथे नवीन सुंदर अनुभव मिळाले, तिथे कष्ट आणि परिश्रमही भरपूर उपसावे लागले. नवीन भाषा शिकण्याचे, पेशंटला माझ्यावर विश्वास बसेल इतपत तामिळमध्ये संवाद साधण्याचे, स्वयंपाकिणींना आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवण्याचे, मातृभाषेबरोबर नाळ तुटू नये म्हणून मुलांना आवर्जून मराठी शिकवण्याचे, आजुबाजुच्या लोकांशी तामिळमध्ये बोलताना त्यांची उडणारी त्रेधातिरपट बघण्याचे आणि सुट्टीत माहेरी येताना पुन्हा इथले होण्याच्या धडपडीचे!
ब-याच मानसिक संघर्षांतून जावं लागलं. पण खरं सांगायचं तर तामिळनाडूनेच आम्हा दोघांना आमची अशी एक ओळख दिली. नुकतीच डिग्री घेऊन बाहेर पडलेली मी ख-या अर्थाने डॉक्टर बनले ती इथेच. महाराष्ट्र मायभूमी तर तामिळनाडू कर्मभूमी बनली. म्हणूनच होतेय दोन्ही सोडून दिल्ली सारख्या तिस-याच ठिकाणी निघताना मनाच्या काचांवर ही मुसळधार बरसात!
आणि कुठकुठल्या वळणांवर घेऊन जाणार आहे आयुष्य ठाऊक नाही. तसं ते कुणाला ठाऊक असतं? आपण आयुष्याचं बोट धरून भिरभिरत्या डोळ्यांनी वाटेवर ओळखीच्या खुणा शोधत ते नेईल तिकडे जात राहायचं. हट्टाने जुनं जपायचं. कुतूहलाने नवं टिपायचं. हुरहूर वाढली की बोटावरची पकड आणिक घट्ट करत किशोरदाचं गाणं गुणगुणायचं
मुसाफिर हूँ यारों
ना घर है ना ठिकाना
मुझे चलते जाना है
बस चलते जाना है! ...