पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाची पंढरीची सायकल वारी

आषाढ आला की उभ्या महाराष्ट्रात दोन गोष्टींचे वेध -लागतात. एक म्हणजे आकाशतील कृष्णमेघ आणि दुसरे म्हणजे कृष्ण सावळया विठोबाची पंढरीची वारीश्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी वारी म्हणजे उत्साह अपार.. वारी म्हणजे देहभान विसरणारा प्रवास. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय.



वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. 'पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे' या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.


अशीच एक आगळी वेगळी वारी नाशिकहून आयोजित केली जाते ती आहे पर्यावरण अणि आरोग्य रक्षणाची पंढरीची सायकलवारी. नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. नाशिकला सायकलिंग कॅपिटल बनविताना त्यास अध्यात्मिक जोड देत शिर्डी राईड, अष्टविनायक दर्शन राईड त्याचप्रमाणे नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन गेल्या सहा वर्षापासून करण्यात येत आहे.


'नाशिक सायक्लिस्ट' ही हौशीने सायकल चालवणा-या मंडळींची ऑर्गनायझेशन नाशिकमध्ये सक्रिय आहे नाशिक शहरात सायक्लिस्ट मंडळींची संख्या वाढत आहे. त्यातच महेंद्र व हितेंद्र महाजन या डॉक्टर बंधूंनी, डॉ.राजेंद्र नेहते यांनी 'रॅम रेस अॅक्रॉस अमेरिका' ही चार हजार आठशे किलोमीटरची स्पर्धा जिंकली आणि नाशिकचे नाव सायक्लिस्टांचे गाव म्हणून भारतभर झाले. पुणे शहराची ओळख सायकल चालवणारे शहर अशी एके काळी होती. स्वयंचलित टू व्हिलर आल्यावर त्यांनी प्रथम पुणे ताब्यात घेतले. आता, नाशिकसह सर्व जिल्ह्यांच्या शहरी स्कुटी, मोटार सायकली यांचेच राज्य दिसते. त्यामुळे सायकलला छंदिष्टांचे, व्यायामप्रेमींचे व पर्यावरणवाद्यांचे वाहन म्हणून प्रतिष्ठा मिळत आहे. नाशिकमध्ये सकाळ, सायंकाळ सायकल चालवणायांची संख्या लक्षणीय रीत्या वाढलेली दिसते. त्याचा परिणाम म्हणून यंदाच्या नाशिक-पंढरपूर सायकलवारीला मोठा प्रतिसाद मिळाला. या वारीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड, धुळे येथून सायक्लिस्ट सहभागी झाले आहेत.


नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष श्री. प्रविण खाबिया यांच्याशी याबाबत अधिक जाणून घेतले. नाशिक सायकलिस्टच्या विविध उपक्रमांमुळे नाशिककरांमध्ये सायकलीचा वापर वाढला असून सायकल वापरण्याने होणारे शारीरिक तसेच पर्यावरणीय फायदेही त्यांना अवगत झाले आहेत. नाशिक सायकलिस्टचे संस्थापक सदस्य हरिष बैजल यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त सायकलवरून नाशिक ते पंढरपूर अशी वारी करण्याचे ठरले.पहिल्या वर्षी अवघ्या आठ जणांनी या सायकल वारीत सहभाग घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी ही संख्या वाढतच गेली. मागील वर्षी ४५० पेक्षा अधिक वारकरी यामध्ये सहभागी झाले होते. यावर्षी ५०० हून अधिक वारकरी सहभागी झाले होते.


पंढरपूर सायकल वारी साधारणपणे तीन दिवसाची असते. पहिल्या दिवशी सकाळी नाशिक येथून या वारीस प्रारंभ होतो. तेथून पहिल्या टप्यात पहिल्या दिवशी वारी सिन्नर, नानाज, राहुरी करत अहमदनगर (१५० किमी) शहरात मुक्कामी थांबत असते. दुस-या टप्प्यात सायकल वारी रुई छत्तीसी, करमाळा करत टेंभूर्णी (१५० किमी) येथे मुक्कामी असते. त्यानंतर तिस-या दिवशी मजल दरमजल करत ही वारी पंढरपूरात दाखल होते. विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास संयोजकांनी सोय केलेल्या वाहनाने केला जातो.परतीच्या मार्गात सर्व सायकली ट्रकमधून परत आणण्यात येतात.


अर्थात या वारीच्या नियोजनाला अनेक दिवस आधीच प्रारंभ केला जातो. नाशिक सायकल असोसिएशनतर्फे काटेकोर आखणी केली जाते. रुग्णवाहिका, सायकल दुरुस्तीसाठी वाहने यासारख्या बारीकसारिक गोष्टीचे योग्य नियोजन केले जाते. चहा-नाष्टा, भोजन याची देखील काटेकोर आखणी केली जाते. मुक्कामाची सोय ही देखील बाब महत्वपूर्ण ठरणारी असते.


पंढरपूर सायकल वारीत सहभागी होणा-या वारक-यांसाठी विशेष सराव शिबिरे घेण्यात येतात.महिला व मुलांचीही संख्या लक्षणीय असते. १८ वर्षाखालील मुलामुलींना पंढरपूर सायकल वारीमध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांच्यासोबत त्यांचे एक पालक (आई किंवा वडील) असणे बंधनकारक आहे. यावर्षी प्लास्टिकमुक्त वारी ही संकल्पना अमलात आणली गेली. एकाही सायकलिस्टने या वारीमध्ये प्लास्टिकमध्ये असणारे खाद्यपदार्थ तसेच वस्तू वापरल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची बाटलीही प्लास्टिकची नव्हती. नाशिकमधून जवळपास पाचशे सायकलिस्ट पंढरपूरकडे रवाना झाले होते. यादरम्यान प्रत्येकाने एक झाड लावले असून त्या-त्या परिसरातील लोकांना ती झाडे दत्तक दिली आहेत. त्याचा खर्चही संस्थेमार्फत केला आहे. दरवर्षी नाशिक ते पंढरपूर रस्त्यावर पाचशे पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली आहेत अशी माहिती श्री. प्रविण खाबिया यांनी दिली.


नाशिकमधून सर्वप्रथम सुरु झालेली पंढरपूर सायकलवारी हायटेक झाली असून, त्यासाठी यंदा त्यासाठी तीनचाकी सौररथ तयार करण्यात आला आहे. या सायकलस्वारांसोबत विठु माऊलीची मूर्ती असलेला सौररथही धावणार आहे. नाशिक सायलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रविण खाबिया यांच्या संकल्पनेतून हा रथ तयार करण्यात आला आहे.सूर्यकिरणांनी उर्जा निर्माण होऊन हा रथ रस्त्याने चालणार आहे. या वारीत आठ वर्ष वयाच्या बालकापासून ते ७० वर्षापर्यंतचे वृध्द सायकलिस्ट सहभागी होतील.पोलीस अधिकारी, डॉक्टर, अभियंते, विधिज्ञ, शिक्षक, खेळाडू, अधिकारी महिला या वारीत सहभागी झाले होते. साहित्य, संस्कृती, आरोग्य, पर्यावरण आणि धार्मिक अधिष्ठान हे वारीचे मूल्य आहे.


हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सुदृढ आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करतांना पांडूरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. नाशिकची ही सायकलवारी एकात्मतेबरोबर आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचाही संदेश देत असते.