आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.ज्यांनी महाभारत, अष्टादशपुराणे लिहीली त्या व्यास महर्षांना वंदन करण्याचा दिवस. व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् असे व्यासांच्या बाबतीत म्हंटले जाते. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार व मूलाधार मानले जातात.ज्या ग्रंथात नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र इ. सर्व शास्त्र समाविष्ट आहेत असा महाभारत नावाचा ग्रंथ जगद्गुरु व्यासांनी लिहीला. संत ज्ञानेश्वरांनी सुदा ज्ञानेश्वरी लिहितांना 'व्यासांचा मागोवा घेतू' । असे म्हणुन सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ॐ नमोस्तुते व्यास विशाल बुध्दे' अशी प्रार्थना करुन, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे.आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु- शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो. त्याच विद्येच्या बळावर आपण यशस्वी जीवन जगत असतो. अशा गुरुंना मान-सन्मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्यच होय.
आपण कोणाचेतरी शिष्य आहोत ह्या भावनेत एक प्रकारची कृतज्ञता वाटते. भारतीय परंपरेतच नव्हेतर पाश्चात्य जगतात ही गुरु-शिष्य जोड्या प्रसिद्ध आहेत. अरिस्टॉटल प्लेटो सॉक्रेटिस ह्या गुरु-शिष्यांनी तत्त्वज्ञानांच्या क्षेत्रात क्रांती केली आहे.याज्ञवल्क्य- जनक, सांदिपनी-कृष्ण, परशुराम-कर्ण, गौडपादाचार्य- शंकराचार्य, धौम्य-अरुणी अशा गुरु-शिष्यांच्याअनेक जोड्या भारतात प्रसिद्ध आहेत.
व्यास समाजाचे खरे गुरु होते. म्हणुनच परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली जाते. व व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणुन साजरी होऊलागली.निर्जीव वस्तू वर फेकण्यासाठी जशी सजीव वस्तूची गरज असते तशीच साधारणतः जीवनहीन व पशुतुल्य बनलेल्या मानवाला देवत्वाकडे पाठवण्यासाठी जीवंत व्यक्तीचीआवश्यकता असते.ही व्यक्ती म्हणजे च गुरु.ही संयमाची प्रेरणा त्याला गुरुंच्या जीवनातुनच मिळत असते. गुरु व्यक्तीच्या अस्थिर मनाला स्थिरतेकडे घेऊन जातो. अज्ञानरुपी अंधकार दूर करून ज्ञानज्योती उजळवतात तेच गुरु होय. अज्ञानतिमिरानस्य ज्ञानाञ्जन शलाकया।
चक्षुरन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवेनमः ॥
शाहे गुरुंचे अनेक प्रकार आहेत. जसे-मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोषविसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, दर्पण गुरु, वैगरे. या प्रत्येक गुरुची विशेषता वेगवेगळी आहे.
वात्सल्य देणारी आई ही आपली पहिली गुरु.शाळेत गेल्यावर शिक्षक आपले गुरू, सोबत करणारे मित्र आपले गुरु, अनुभव आपला गुरू, ज्याच्यासोबत आपण सगळकाही शेअर करु शकतो ते आपले गुरु, प्राचीनकाळी हे सगळ एकाच छताखाली गुरुगृही विद्यार्थ्याला मिळत असत. आज मात्र विद्यार्थ्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरावे लागते त्यामुळे गुरु-शिष्यातील संबधातील भावपूर्ण ओलावा जाऊन त्यात व्यवसायिकता आली आहे. पाठ्यपुस्तकातील शिक्षणासोबतच व्यवसायिक कौशल्य ,जीवन जगण्याची कला जे शिकवतात ते गुरु वंदनीय ठरतात.त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा दिवस गुरुपौर्णिमा.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तवमस्यादिसक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥