निसर्ग, माणूस आणि मनाली

'व्यास' नदीचा खळाळ, बदललेली थंडगार हवा, मनाली जवळ येत आहे याची ग्वाही देते, प्रवासाचा शीण दूर पळून जातो, आणि मनाली येतं.निसगार्ने या भागात मुक्त हस्ते रंग भरले आहेत. यासाठी मला व्यास नदीच्या पैलतीरावरील नग्गर' भाग जास्त प्रिय आहे. ऐलतीरावरील मनालीम्हणजे पर्यटकांना ठावूक असलेल्या जागा;हिडिंबा आणि घटोत्कच यांचे मंदिर, पहाडात माता हिडिंबा ही देवी म्हणून पूजली जाते, ज्याची पूजा करतात ते पदचिन्ह दगडी आणि मोठे आहे त्यावरून मूळ स्वरूपाची कल्पना करता येते.



देवभूमी हिमाचल, समुद्रसपाटीपासून २०५० मीटर उंचीवर मनाली हे थंड हवेचे निसर्गसुंदर ठिकाण. महर्षी मनुचे आलय, या अर्थाने, मनाली. 'व्यास(ब्यास) नदी चा उगम 'रोहतांग' जवळ 'व्यासतीर्थ' येथे आहे, ही खळाळून वाहणारी हिम-धवल नदी मनाली चे मुख्य आकर्षण. या नदीत रिव्हर क्रॉसिंग किंवा राफ्टिंग सारख्या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. मनाली हिरव्या कंच डोंगरांनी वेढलेले आहे; येथून 'रोहतांग पास' मार्गे 'लेह' ला जाता येते, त्यामुळे बायकर्सना हा रस्ता आव्हानात्मक वाटतो; तसेच 'सोलांग' मार्गे 'कारगिल' ला जाता येते म्हणून या मार्गाला विशेष सामरिक महत्व आहे; पर्वतराजींमुळे पॅरा-ग्लाईडींग, हॉटबलूनींग, झॉबिंगकिंवा झिपलाइनिंग सारखे खेळ पर्यटकांना साद घालत राहतात. 'रोहतांग' मध्ये बर्फ पाहणा-यांची आणि खेळणा-यांची संख्या जून ते ऑक्टोबर पर्यंत वाढत जाते. शिमला - कुल्लू - मनाली फिरणा-या खूप मराठी माणसांशी आपण या भागात भेटतो. मराठी पर्यटक हौशी आहे, या दुर्गम भागात पोहोचण्यासाठी साधारणतः दिल्लीपासून १५-१९ तासांचा प्रवास करावा लागतो. दिल्ली, सोनिपत, पानिपत, कुरुक्षेत्र, अंबाला, चंदीगड, कीरतपूर, रुपनगर, बिलासपूर, मंडी, कुल्लू, मनाली असा हा प्रवास. विमान प्रवास कुल्लू पर्यंत करता येतो पण दर अव्वाच्या सव्वा असतात त्यामुळे ते सामान्यांना शक्य नसतेच. 'व्यास' नदीचा खळाळ, बदललेली थंडगार हवा, मनाली जवळ येत आहे याची ग्वाही देते, प्रवासाचा शीण दूर पळून जातो, आणि मनाली येतं. निसगार्ने या भागात मुक्त हस्ते रंग भरले आहेत. यासाठी मला 'व्यास' नदीच्या पैलतीरावरील 'नग्गर' भाग जास्त प्रिय आहे. ऐलतीरावरील ठिकाणं सहसा टूर ऑपरेटर्स दाखवतात, पण 'नग्गर' भागाविषयी फारसे कोणी सांगत नाही, त्यासाठी एखादा हिमाचली मनुष्य गाठावा लागतो. बाजारू होण्यापासून अजून जरा दूर असलेला हा भाग फार निवांत आहे. लाकूड, दगड आणि माती याचा वापर करून बांधलेल्या परंपरागत 'काष्ठकुणी' स्थापत्य शैलीतील इमारती इथे पाहण्यास मिळतात, 'नग्गर कॅसल' हा त्यातलाच, आता त्याचे हॉटेल झाले आहे पण अजून जे आहे ते त्याच्या मूळ सौंन्दर्याची साक्ष देतं. इथूनच १२ किमी अंतरावर 'चामुंडा' आणि 'जाणा' नावाचे धबधबे आहेत, 'चामुंडा' ला विशेष पाणी नाही, पण 'जाणा' ही जागा छान आहे, तिथे धबधब्याखाली पाण्यात खूर्ध्या घालून कुल्लू चे स्थानिक पदार्थ चाखता येतात, जसे; तांबडा भात, खीर, लंगरूसुझी, सिद, मक्के की रोटी वगैरे. आजकाल हा तांबडा भात एक्स्पोर्ट केला जातो.



ऐलतीरावरील मनाली म्हणजे पर्यटकांना ठावूक असलेल्या जागा; हिडिंबा आणि घटोत्कच यांचे मंदिर, पहाडात माता  हिडिंबा ही देवी म्हणून पूजली जाते, ज्याची पूजा करतात ते पदचिन्ह दगडी आणि मोठे आहे त्यावरून मूळ स्वरूपाची कल्पना करता येते. जवळच एक क्लब हाऊस, तिथे कृत्रिम तळ्यात बोटिंग करता येते, काही प्लास्टिक च्या खेळणी बागेत असतात, अगदीच वेळ घालवायचा काही मार्ग न सापडला तर जायची जागा. एक रम्य ठिकाण, 'सोलांग व्हॅली', तिथे जाणारा रस्ता आता रुंद करण्यात आला आहे पण त्यावर एका मागे एक गाडयांच्या ओघ असल्यामुळे तिथे पोचण्यास मॉल रॉड वरून तासभर लागतो. 'सोलांग' ला उंच पहाडावर 'अंजनी महादेव' मंदिर आहे, साधारणतः ४००-५०० रुपयात घोडयावरून तिथे पोचता येते, तीन चाकी स्कूटर्स पण घेता येतात, साधारणतः २. किमी वर अलीकडेच खळाळणारे नदीपात्र लागते, ते ओलांडून १००-१५० पाय-या चढताच उंचावरून कोसळणारा झरा खाली बांधलेल्या शिव-पिंडीवर अविरत अभिषेक करताना दिसतो. नदीपात्रात बर्फासारखे थंड पाणी एकमेकांवर उडवत एखादा तास सहज निघून जातो, पहाडात मॅगी खाणे प्रचलित आहे, किंवा पकोडे, त्यापेक्षा वेगळे फारसे काही मिळत नाही, जागेच्या दुर्गमतेमुळे असेल कदाचित, करण्यास सोपे पदार्थ मिळतात. इथे ही धुळीचे साम्राज्य अबाधित आहे, कारण सगळ्या रस्त्यांच्या कामाचा मलबा या ठिकाणी ओतला जात आहे; घोडयांना, माणसांना चालत जाण्यासाठी साधी २ किमी लांबीची पायवाट नाही, स्कूटर साठी रस्ता नाही, कित्येक हजार रुपये खर्चुन मनाली पाहण्यासाठी आलेल्या परिवारांना अजून एक साहसी ट्रीट! शिव पिंडी जवळ अर्धा तास जातो, आणि परत खाली उतरून पॅरा-ग्लाईडींग च्या ठिकाणी जाता येते, तिथे लहान मुलांसाठी ५००-१००० रुपये आणि मोठ्यांसाठी ३२०० रुपयांपर्यंत ऑप्शन्स असतात. ३२०० रुपयांच्या ग्लाईडींगसाठी पहाडावर चढायला इलेक्ट्रिक पाळणा आहे. हा अनुभव छान आहे. पण या मध्ये काही दुखापत झाल्यास कोणी जबाबदारी घेण्यास तयार होत नाही असे स्थानिक डॉक्टर्स सांगतात कारण पर्यटकाने न वाचताचा फॉर्स वर सह्या केलेल्या असतात, त्याला पर्याय नाही.



त्यापुढे मॉल रोड, गजबज, खाण्याचे विविध पदार्थ, माणसांची, व्यापा-यांची, टॅक्सी-वाल्यांची, बस-वाल्यांची एकच गर्दी, जवळच- बस-स्टॅन्ड. 'रोहतांग' विषयी आणि किती वेळ लागेल, पैसे लागतील, किती लवकर निघावे लागेल, 'रोहतांग खुल गया, बर्फ है' वगैरे अविरत बोलणारे लोक आणि गर्दी पाहून, 'नको ते रोहतांग, नको तो बर्फ' असेच म्हणायची वेळ येते, लहान मुलांना १२ तास प्रवासात ताटकळत ठेवून बर्फ दाखवायला न्यायचे, जन-सुविधांचा पूर्ण अभाव, असे ठिकाण जगाच्या पाठीवर दुसरे असू शकणार नाही असे मला वाटते, ७-१६ हजार (गाडीप्रमाणे, हा दर सिझन नसताना ३-५ हजार असतो) खर्च करून परिवाराला गाडी करावी लागते, आपली गाडी तिथे चालत नाही, हिमाचलची हवी, पण यासाठी खेटे किती? मान्य आहे, हा सिझन अधिक काळ नसतो पण म्हणून पर्यटकाने 'रोहतांग' च्या नावाने घाम गाळावा अशी अव्यवस्था आपण का करतो ते कळत नाही, निश्चित भलं मोठं देणं-घेणं या मागे असलं पाहिजे म्हूणन माहित असूनही काही उपाय केले जात नाहीत. आता सरकारने बॅटरी ऑपरेटेड बसेस ठेवल्या आहेत ही टिमकी वाजते पण त्याचे तिकिट ६०० रुपये प्रत्येकी आहे आणि काही लिमिटेड सीट्स आहेत म्हणून त्या घेण्याकरता सकाळी ३ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत लोक रांगा धरतात आणि ११ वाजता ऑफिस सुरु होते, दुस-या दिवशीचे तिकीट हुकले की पुन्हा रांग धरायची, तोपर्यंत हॉटेलचा खर्च करत राहायचं, हे प्रशासनास ठावूक नसावे, असे कसे म्हणावे? सामान्य जनांचे हाल कमी करण्यासाठी प्रशासनाकडे संवेदनशीलता असावी लागते, ती नसली की असे होते, आणि इथे येण्याचा, राहण्याचा खर्च कमी नाही, तेव्हा माझे प्रांजळ मत आहे, काही काळापुरते हे सगळे बदलल्याशिवाय अशा स्थळी शक्य असल्यास जाणे टाळावे; असा सल्ला, माझी ट्रॅव्हल कंपनी नसल्यामुळे मी देवू शकतो. शहराचा श्वास गुदमरवून टाकणारी खासगी वाहनं बंद होणे अतिशय गरजेचं आहे, युरोपात पर्यटकांचे असे हाल का होत नाहीत, का फसवाफसवी होत नाही, का पर्यटन आनंददायक होते, याचा 'इनक्रेडिबल इंडिया' हा जयघोष करण्या आधी सर्व बाजूंनी विचार व्हावा. बसस्थानकांचे असेच, दिवे नाहीत, रस्ते नाहीत, घाण आहे, कोणती बस कुठे थांबते याची माहिती नाही, पोलीस नाहीत, बुकिंग घेणारा नंतर फोन उचलत नाही, त्यांची ऑफिसेस बस सुटायच्या वेळी नेमकीबंद असतात, ड्रायव्हर व कंडक्टर प्रत्येक बॅगचे २० रुपये घेतात, याचा तिकिटात कुठेही उल्लेख नसतो, हवे त्या धाब्यावर गाडया थांबवतात, मुलांसाठी-महिलांसाठी प्रसाधन सोयी नाहीत, वर तक्रार करायला जागा नाही या सगळ्या कटकटीत आपण मात्र पर्यटन करत असतो, फिरत असतोकदाचित हे सगळे आपण गृहीत धरलेले असते, मला एकदा इंटरव्हयू मध्ये विचारण्यात आले- 'तुम्ही तणावाखाली काम करू शकता का', मी प्रांजळपणे म्हणालो- 'सर, मी भारतीय आहे, मी तणावग्रस्त जीवन जगतो, कामाचा ताण सहज पेलू शकतो', मुलाखतकार खळखळून हसले, त्यांचा थोडा ताण मी कमी केला होता. पराशर, भृगु आणि मणिकर्ण या तीन जागा अद्याप मी पाहिल्या नाहीत, कारण त्या तिन्ही म्हणजे एक-एक दिवसाचा फेरफटका आहे, म्हणजे साधारणतः २ तासांच्या दर्शनासाठी १० तासांचा प्रवास. एका उंच ठिकाणी शहरात महर्षी वशिष्ठ यांचा आश्रम आणि गरम पाण्याचे कुंड आहे, या पाण्याचा वापर अजून प्रशासनाला करता आलेला नाहीत्यामुळे ते वाहून जाते, खरं तर घराघरातून गरम पाण्याची पाईप लाइन जोडावी एवढी त्या गरम पाण्याच्या झ-याची क्षमता आहे. 'हिवाळ्यात पाणी गोठले, लोकांचे हाल' वगैरे मथळे दरवर्षी वाचायची सवय असणा-या मनाला त्याचे काही विशेष कौतुक असायचे कारण नाही. अजून एक सुंदर जागा म्हणजे इथून ३०-४५ मिनिटांच्या पायवाटेने गेल्यास 'जोगिनी' नावाचा धबधबा लागतो, पण सहसा पर्यटक तिकडे फिरकत नाहीत, त्यांच्या टूर ऑपरेटरना त्यांना मनाली गाडीतूनच दाखवायचे असते.


मनालीत जेवण असे विशेष रुचकर मिळत नाही, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता कमीच, त्यामुळे निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केलेली जागा माणसाने कशी विद्रुप केली याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही, हे विद्रुपीकरण कमी करण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नाही.


मनाली ची मूळ लोकसंख्या १०,००० पेक्षा कमी पण पर्यटकांची संख्या वर्षांकाठी ३५-४० लाख, साधारणतः दररोज २५,००० लोकांना सामावून घेणारी हॉटेल्स, त्यामुळे मुळातच नसलेल्या पायाभूत सुविधांवर अधिक ताण पडतो, असे म्हटल्यापेक्षा त्या कोलमडतातच असे म्हणणे सयुक्तिक.


आता एन एच २१ या महामार्गाचे काम चालू आहे त्यामुळे हा भाग पूर्ण धुळीने व्यापला आहे, रस्ता रुंद करण्यासाठी डोंगर पोखरले जात आहेत, मोठमोठ्या शीळा नदीपात्रात, रस्त्यांच्या कडेला पडलेल्या दिसतात, त्याभोवती तुटलेले रस्ते, वाहनांची न थांबणारी वाहतूक, एकंदर क्लेशकारी अनुभव आहे. एक वर्षापर्यंत मनाली ला न गेलो तर उत्तम असे म्हणायची वेळ आली आहे, हे मी माझ्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच्या अनुभवावरून सांगतो. २०२० नंतर हा महामार्ग पूर्ण होईल आणि मग मनाली ला जाणे थोडे सोईचे होईल. आता ह्या छोट्या शहराचा श्वासच गुदमरला आहे. गम्मत म्हणजे आपल्या देशात दुदैर्वाने अशी माहिती शासन पर्यटकांना देत नाही आणि त्यामुळे ते लुबाडले जातात;त्याचा कष्टाचा पैसा, वेळ, श्रम मातीमोल होतात.


मंडी पासून जवळ, आउट गावी वाहनांच्या सोयीसाठी २.८ कि. मी. लांबीचा बोगदा बांधला आहे, अजून त्याचे एन.एच.ए.आय. (NHAI) ला हस्तांतरण व्हायचे आहे, पण सध्या त्याची जबाबदारी राज्य महामार्ग मंडळाकडे असल्यामुळे तो अंधारमय आणि धोकादायक असाच ठेवला आहे, द्यायचेच आहे तर सांभाळा तरी कशाला? असो, सांभाळ हा आपल्या पिढीचा मोठ्ठा प्रॉब्लेम झाला आहे; मग ती आई-वडीलांची जबाबदारी असो, लहानांचे संगोपन असो, नाती असोत, सांस्कृतिक वारसा असो, मूल्याधारित शिक्षण असो, संस्कार असोत, सामाजिक भान असो, विनय असो, क्षमाशीलता असो, लोकशाहीचे हृद्य अंतरंग असो, सचोटीचा व्यवहार असो, जीवनदायिनी नद्या असोत, पर्यावरण संरक्षण असो का अतिथी देवो भव हा भाव! भारत-चीन सीमेवर सैन्याला रसद पुरवठा जलद व्हावा म्हणून सोलांग पासून जाणारा विकासाचा महामार्ग आणि रोहतांग जवळचा ८.९ कि. मी. लांबीचा होणारा नवा बोगदा, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल आहे, या सरकारने ते टाकले ही जमेची बाब आहेच पण पर्यटकांची सोय लक्षात ठेवून विकास करता येतो हे आपण ब-याच विकसित देशात पाहत असतो त्यामुळे अधिक अपेक्षा आहेत, आणि आपण अपेक्षा पण, जे पूर्ण करण्याची क्षमता बाळगतात त्यांच्यापासूनच ठेवतो, नाही का?