सत्ता पालकत्वाची?

आपल्या चिमुकल्यांसाठी एवढी | पोस्ट नक्की वाचायलाच हवी. पालक सभेत असा एक प्रश्न विचारून बघावा - 'कोणाची मुलं हट्टी आहेत, त्यांनी हात वर करा.


सगळे हात वर होतात.


असं विचारलं की - 'कोणाची मुलं नीट जेवत नाहीत?'


तरी सगळे हात वर.


मी आणखी एक प्रश्न विचारते -


'इथे असे कोणी पालक आहेत का ज्यांनी आपल्या मुलांना कधी मारलं नाही?'


बहुतेक वेळेला एकही हात वर होत नाही. मग विचारावं की - ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारते -


'असे कोणी पालक आहेत का की ज्यांना आपल्या मुलांना मारून बरं वाटतं,


आनंद होतो? त्यांनी हात वर करा


हा. पुन्हा एकही हात वर होत नाही.


पालक सांगू लागतात, 'मुलांना मारलं की


मग आपल्यालाच वाईट वाटतं.


रडू येतं. मग रडून झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर आम्ही हात फिरवत बसतो. तो उठला की त्याच्या आवडीचं काही खायला करतो.


एकदा असं झालं की, पहिल्या प्रश्नाला एका पालकाने हात वर केला.


ते म्हणाले, 'मी माझ्या मुलांना कधीच मारलेलं नाही.


मला फार नवल वाटलं.


मी म्हटलं, 'तुम्ही पुढे येता का?


आम्हाला सांगा तरी तुम्ही असं कसं वागता ते?'


ते पुढे आले. हातात माईक घेतला आणि म्हणाले. 'ते डिपार्टमेंट त्याच्या आईकडे दिलंय'


...आणि हशा-टाळयांच्या गजरात जागेवर जाऊन बसले.


आणखी एका बाबांना स्फूर्ती आली. ते आले आणि म्हणाले, 'मी कामामुळे बाहेरगावी असतो.त्यामुळे मारायला मला मुलं भेटतच नाहीत.


पुन्हा मोठा हशा झाला.


क्वचित काही पालक भेटतात न मारणारे. आणि कुणी सांगतं, 'आम्हाला आमच्या


आईवडिलांनी कधीच मारलं नाही त्यामुळे आम्हाला पण मारावंसं वाटत नाही'


कुणी म्हणतात, 'लहानपणी भरपूर मार खाल्ला त्यामुळे ठरवलं की मुलांना आपण मारायचं नाही.


काही असं सांगतात की, 'मारायची गरज नाही.समजावून सांगितलं की मुलं ऐकतात.


मला असं विचारावंसं वाटतं, 'तुम्हाला मुलांना मारल्यावर जर वाईट वाटतं, रडू येतं, तरी का मारता मुलांना?'


पालक सांगतात, 'राग येतो त्यांचा. राग आवरता येत नाही.कधी इतर कुठलातरी राग मुलांवर निघतो. वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात तसं!'


असं आपण जेव्हा म्हणतो की, 'आम्हाला राग आवरत नाही.


तेव्हा आपण लबाड वागत असतो. काय लबाडी करतो आपण?


एकच चूक मुलांनी केली की त्याला मिळतो मार आणि वडिलांनी, आजी आजोबांनी, काकांनी केली तर?


तर लगेच आपण राग आवरतो.


मग एखाद्या छोट्या मुलीला मी माइकपाशी बोलावते.


तिला विचारते, 'अगदी सोपा प्रश्न आहे बरं का.घाबरू नको.छान उत्तर दे


ती 'हो' म्हणते, पण तिच्या चेह-यावर ताण दिसतो.


मग मी तिला म्हणते, 'समज ही एक भाजीची वाटी आहे.ती अशी खोलीच्या मधेच ठेवलीय. तिकडून तू धावत-धावत आलीस आणि तुझा पाय वाटीला लागला. बोटी उडाली आणि सगळी भाजी सांडून गेली तर तुझी आई काय करेल?'


अर्धा मिनिट ती विचार करते आणि म्हणते, “आई आधी एक धपाटा घालेल आणि म्हणेल, दिसत नाही तुला? आता भरून ठेव ती भाजी.'


सगळे पालक हसतात. तिला मी म्हणते, 'छान उत्तर दिलंस.


आता दुसरा सोपा प्रश्न.


'समज ती भाजीची वाटी तशीच आहे आणि तू धावत-धावत नाही आलीस. तुझे बाबा चालत आले. त्यांचा पाय वाटीला लागला. भाजी सांडली. आता आई काय करेल?'


मुलीला आता गंमत वाटते आणि उत्तर द्यायला उत्साह वाटतो.


ती म्हणते, 'बाबांना आई काहीच म्हणणार नाही.धपाटापण घालणार नाही.उलट म्हणेल, 'मी भरते ती भाजी.तुम्ही जा कामाला. माझंच चुकलं.वाटी उचलून नाही ठेवली.


पालक पुन्हा जोरदार हसतात.


मुलीला मी शाबासकी देते.


छोटं बक्षीस देते.


आपलं असं ठरलेलंच असतं की,


'चूक लहान मुलाच्या हातून झाली तर त्याला लगेच मारायचं आणि मोठ्या माणसांना मात्र माफ.


जो आपल्याला उलट मारू शकतो, त्याला आपण मारायला जात नाही! लहान मूल काय बिचारं करणार?


मुलं बालभवनात सांगतात ते पालकांनी ऐकावं.


'आज ना बाबांनी मला खूप मारलं.मला आज आत्महत्या करावीशी वाटते आहे.


'आज आईने मला उगाचच मारलं.मला घरातून पळून जावंसं वाटतंय.


आज दोघं मला खूप रागावले.


मला असं वाटतंय की, 'जगात माझं कुणीच नाही.


इतकं जर मुलांना वाईट वाटतं,


तर का मारायचं मुलांना?


'छडी लागे छम-छम' वर अनेक पालकांचा विश्वास असतो.


 'मारलं नाही तर मुलं बिघडतात' अशी त्यांच्या मनात भीती असते.


काही पालक तर हमखास असं सांगतात, 'मी लहानपणी फार वात्रट होतो. आमच्या एका सरांनी मला खूप बदडलं म्हणूनच मी सुधारलो.


 मुलं मात्र कितीदा सांगतात, 'मारू नका ना! समजावून सांगा.आम्हाला कळतं.


 पण आपल्ला मन :स्थितिचं काय करायचं?


कधी समजा सुट्टीचे दिवस आहेत. आवडते पाहुणे घरात आलेत. सर्वांच्या तब्बेती उत्तम आहेत.


पैशाचा काही प्रश्न नाही.


घरात काही भांडण नाही.


अशा आनंदाच्या वातावरणात मुलांनी काही दंगा केला, नासधूस केली, आगळीक केली तर आपण उदारपणे म्हणतो, 'जाऊदे, जाऊ दे. भरून टाका ते. आपल्याला आता बागेत जायचंय.


वर दहा बोलणी ऐकून घ्यावी लागतात.


हा आपला मूड म्हणजे एखाद्या ग्लासातल्या पाण्याच्या पातळीसारखा असतो. .


अप्रिय गोष्टी घडल्या की पातळी खाली जाते आणि आपली सहनशक्ती कमी कमी होते.


आवडीच्या गोष्टी घडल्या तर, पातळी वर जाते.आपली सहनशक्ती चांगली असते.


तेव्हा एक लक्षात ठेवायचं -


'मुलं जोवर - १४-१५ वर्षांची होत नाहीत,


तोपर्यंत ही पाण्याची पातळी निर्धारपूर्वक वर ठेवायची आणि मुलांना मारायला हात उठेल तेव्हा दुस-या हातानं हात धरायचा आणि स्वतःला विचारायचं, याची जरूर आहे का?'


९९ टक्के वेळा तुम्हाला उत्तर मिळेल - 'जरूर नाही.मारू नको.समजावून सांग तेव्हा प्रश्न संयमाचा आहे.


'मारणं' हा आपला शॉर्टकट असतो.


खरं तर,


कोण समजावून सांगत बसणार?


घाईच्या वेळी मुला हट्ट करतात.


वेळ नसतो.मग घाला दोन धपाटे.


आणि मुलं इतकी चिवट असतात की, ती आपला अंत पाहतात.


खरंच आहे.तुम्ही रस्सीखेच सुरू केलीत तर मुलं कधीच हरणार नाहीत.


तुम्हालाच आपल्या हातातला दोर सोडून देण्याचा शहाणपणा करावा लागतो.


मुलांशी संवाद वाढवण्यासाठी एक गोष्ट करता येईल.


रात्री मूल झोपत असेल तेव्हा वेळ काढून त्याच्याजवळ बसा.


त्याला गोष्ट सांगा. गप्पा मारा.


आणि त्याला हे सांगा की, 'आज दुपारी तू जो दुकानात हट्ट केलास,' 'मला अमूक पाहिजे म्हणून' आणि 'रडायला लागलास' ते मला आवडलं नाही.


किती खेळणी आहेत तुझ्याकडे !


तरी हट्ट करायचा का?


मूल पण सांगेल त्याला तेच खेळणं का हवं होतं ते.


तुम्हीही सांगा तुम्ही ते का नको म्हणालात ते आणि सारखं आपल्याला हवं ते त्या क्षणी मिळत नाही, धीर धरावा, वाट पहावी.


कधी नाही मिळालं तर हट्ट करू नये.


तमाशे तर नाहीच करायचे हे त्याला/तिला पटवून द्या.


हे संवादाचं कौशल्य, प्रामाणिकपणे


आई उगाचच 'नाही' म्हणत नाही.


त्यामागे कारणं असतात आणि मूलही मनात विचार करू लागेल.


 'पालकत्वाची सत्ता' ही न वापरण्यासाठी असते.


ती चांगल्यासाठी जरूर वापरावी.


पण मारण्यासाठी, अपमान करण्यासाठी, अडवणूक करण्यासाठी वापरू नये.


पटतंय ना? खूप छान विचार आहेत. आपणाला जर वाटतं आपली मुलं चांगले मार्कस् मिळून पास व्हावे अथवा आपल्या मुलाचे एखाद्या खेळात प्राविण्य असावे तर मुलांना अशी वागणुक देणं खुप गरजेचं आहे.