स्मृतींची चाळता पाने..

पण ते खरोखरच आपल्यातनू गेले का? त्यांच्या कवितांमधून, नाटकांमधून व इतर लेखनामधून, तसेच त्यांच्या अनतं आठवणींमधनूही तात्यासाहेब आजही आपल्यातच आहेत असे म्हणणे चुकीचे म्हणता येईल का? यातील काही आठवणी जागवण्याचा प्रयत्न मी या लेखाच्या निमित्ताने करणार आहे.


 वर्ष नक्की आठवत नाही. बहुधा १९७०७१ च्या आसपास असेल. थोर समाजसेवक बाबा आमटे नाशिकला आले होते. त्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानतंर पटेल कॉलनीमधील तात्यासाहेबांच्या निवास स्थानी बाबा आणि त्यांचे सहकारी अनौपचारिक भेटीसाठी आले होते. या कार्यक्रमाचे संयोजक व इतर मडंळीही तिथे होती. मी तिथे होतो ते या दोन महानभुवांच्या आकर्षणामुळे. या सर्व मडंळींच्या गप्पागोष्टी चालू असतानाच बाहेर कोणीतरी आले. कोण आहे, काय काम आहे वगैरे चौकशी करून त्या व्यक्तीला 'तुम्ही नतंर कधीतरी परत या' हे सांगण्याचे काम परस्परच कोणीतरी केले. पण तात्यासाहेबांच्या हे लक्षात आल्यावर ते लगेच स्वतः बाहेर गेले. त्या व्यक्तीला भेटले. कोठून आलात, काय हवे आहे याची चौकशी केली. ती व्यक्ती एक सर्वसामान्य अशी एक प्राथमिक शिक्षक होती. त्यांना तात्यासाहेबांना भेटायचे होते, त्यांच्याशी बोलायचे होते. तात्यासाहेबांनी त्या व्यक्तीला नाराज केले नाही. चांगली १५-२० मिनिटे त्या व्यक्तीला दिली. 'माझ्याकडे मोठी माणसे आली आहेत. तुम्ही नंतर या,' असे सांगनू त्या व्यक्तीची बोळवणी केली नाही. कारण तात्यासाहेबांच्या लेखी लहान-मोठे असा भेदभाव कधी नव्हताच. बाबा आमटे व इतर पाहण्यांना काही वेळ तिष्ठत रहावे लागले, पण त्याला इलाज नव्हता. तात्यासाहेबांच्या मनात बाबा आमटे यांच्याबद्दल स्नेहभाव तर होताच आणि त्यांच्या थोर कार्याबद्दल आदरही होता. पण त्याचबरोबर दारात आलेल्या त्या सर्वसामान्य व्यक्तीबद्दलही स्नेहभाव मनात होता. माझ्या मनावर एक कायमचा संस्कार करून जाणारी ही आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे.


दुसरी आठवण आहे थोडी वेगळीच. व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचे पहिले आर्थिकदृष्टया यशस्वी नाटक होते 'ययाती आणि देवयानी'. नाटकाचे प्रयोग धुमधडाक्यात चालू असल्यामुळे निर्माते व कलावतं खुशीत होते. त्या आनंदात निर्मात्याने ठरवले की नाटककाराचे मानधन वाढवून दयायला हवे. विदर्भातून कुठूनतरी त्यांनी वाढीव दराने मनीआर्डेर पाठवली. तात्यासाहेबांनी ती मनीआडर स्वीकारली नाही. पैसे परत आलेले पाहून निर्माता घाबरला. चांगल्या चाललेल्या नाटकाचे अधिकार तात्यासाहेब काढून घेणार असे त्याला वाटले. रातोरात तो नाशिकला आला. तात्यासाहेबांना भेटला. तात्यासाहेबांनी त्याला शांतपणे सांगितले की जे आधी ठरले होते तेवढेच मानधन स्वीकारणार, जास्तीचे नाही! निर्मात्याने त्यांना दंडवतच घातले. आपल्याला मिळालेल्या पैशात समाधानी रहावे, पैशामागे धावू नये, पैशाने मिळणा-या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते हा आणखी एक संस्कार यातून मला मिळाला. ___ एकदा ज्येष्ठ विचारवंत यदुनाथ थत्ते नाशिकला आले होते. मी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या बी. वाय. के. महाविद्यालयाला त्यांनी भेट द्यावी व विदयार्थ्यांशी सवांद साधावा असे ठरवले. आचार्य डॉ मो. स. गोसावी सरांनी समंती दिली. चौकशी केल्यावर समजले की यदुनाथजी गोळे कॉलनीत राहणा-या विठ्ठलराव पटवर्धन यांच्या घरी उतरले आहेत. त्यांना तिथून महाविदयालयात आणण्यासाठी मी प्राचार्यांची गाडी घेऊन तिथे पोहोचलो. तिथे समजले की यदुनाथजी तात्यासाहेबांच्या भेटीसाठी गेले आहेत. मी तात्यासाहेबांच्या घरी पोहोचलो तर तिथे तात्यासाहेब एकटेच बसले होते. यदुनाथजी कोणाच्यातरी सोबतीने महाविदयालयाकडे जाण्यासाठी बाहेर पडलेले होते. त्यांना महाविदयालयाच्या प्रवेशदवाराशी कोणी ओळखणार नाही, त्यांचे यथोचित आगतस्वागत होणार नाही या काळजीतून मी तात्यासाहेबांना म्हटले मी कॉलेजला फोन करून कळवतो. ते हसले व म्हणाले 'पण आपल्याकडे दूरध्वनी कुठे आहे?' एवढया मोठ्या लेखकाकडे साधा दूरध्वनी नव्हता. पण यामुळे त्यांचे मोठेपण कमी झाले नाही की त्यांच्याशी सपंर्क साधणा-यांची संख्याही कमी झाली नाही.



तात्यासाहेबांना जाऊन आता २० वर्षे होतील, पण आजही जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते, मराठी कविता वाचली व ऐकली जाते त्या सर्व ठिकाणी त्यांची आठवण जागवली जाते. आजही तात्यासाहेबांच्या नावाने विविध ठिकाणी वाचनालये चालवली जात आहेत, कवीमडंळे आहेत, लहान मोठया साहित्यिक संस्था आहेत. या सर्व ठिकाणी त्यांचे स्मरण केले जाते, त्यांच्या संस्कारांची उजळणी केली जाते.


आज तात्यासाहेब आपल्यात नाहीत हे केवळ लौकिक अर्थाने घ्यायचे. खरे म्हणजे आजही ते आपल्यात आहेतच. कवी अमर्त्य असतो असे म्हणतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून अगदी मढेकर, केशवसुत, बालकवी इत्यादींबद्दल आपण काय म्हणतो? आपण म्हणतो ज्ञानेश्वर माऊली सांगते, तुकाराम महाराज म्हणतात, मढेकर म्हणतात, कुसुमाग्रज म्हणतात. आपण कधीही 'तेम्हणाले' असे म्हणत नाही. कारण आजही हे सर्वजण आपल्यात आहेत असे आपण मानतो. ते आपल्यात आहेत त्यांच्या ओव्यांमधून, अभंगांमधून, कवितांमधून.



कवी हा प्रज्ञावंत असतो. पण त्याहीपेक्षा तो असतो आमची सद्सद्विवेकबुध्दी जागृत ठेवणारा, आमचा 'कॉन्शन्स कीपर'. आणि तात्यासाहेब शिरवाडकरांसारखा कवी तर जीवनदृष्टिच देतो. तात्यासाहेबांसारख्या कवीलाच सांगावेसे वाटते 'कोलंबसाचे गर्वगीत'. त्यांच्यासारख्या कवीलाच भावते 'पृथ्वीचे प्रेमगीत'. त्यांच्यासारख्या कवीच करतो 'क्रांतीचा जयजयकार' आणि त्यांच्यासारखा कवीच 'उठा उठा चिऊताई' सारखे आजही टवटवीत असणारे गीत लिहू शकतो.


तात्यासाहेबांच्या कविता, त्यांची नाटके आणि त्यांचे इतर साहित्य यांच्यामागे असलेला त्यांच्यातला 'माणूस' मला _कायमच विशेष भावलेला आहे. त्याचीच आठवण म्हणून त्यांच्या एका वेगळ्याच कवितेची आठवण जागवायला हवीः 


दीप लाव तो


प्रसन्न झाला देव मानवा


म्हणे, 'माग तुज काय हवे ते'


'शस्त्र हवे मज', माणुस वदला


'साध्य सर्व हो पराक्रमाते'.


शस्त्र मिळाले. हो समरांगण


अवघ्या भूचे हृदय विदारी


माखुनिया रक्तात राहिला


पुन्हा उभा देवाच्या द्वारी.


'काय हवे तुज?' 'शस्त्र न पुरते


करील शास्त्रच मंगल जीवन


ज्ञानसाधनी ये ईश्वरता


स्वर्गधरेचे करील मीलन!'


शास्त्र मिळाले, शस्त्र मिळाले


स्वर्ग परी स्वप्नातच राही


हतबल आणिक हताश मानव


पुन्हा प्रभूच्या सन्निध येई.


'काय हवे तुज?' 'बावरलो मी


वाट दिसेना या तिमिरातून'


देव म्हणे-'तुजजवळीच आहे,


दीप लाव तो, तव माणुसपण!


हे 'माणूसपण' तर तात्यासाहेबांचे वैशिष्टय होते, त्यांचे संचित होते. हे संचित आपण सभाळले तर तात्यासाहेब समाधानाने म्हणणार 'श्रीराम'! नाही सभाळले तरीही ते म्हणणार 'श्रीराम'! आता त्यांचे 'श्रीराम' कोणत्या अर्थाने आहे हे समजण्याची बुध्दी त्या श्रीरामाकडून आपल्याला लाभो हीच प्रार्थना.