शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे राजधानीत शिवकल्याण राजांचे आयोजन!

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानीतील शिवभक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षागणिक उत्साहात साजरी करतात. राजधानीत शिवरायांच्या नावाने रस्ता, महाविदयालय, रेल्वे स्थानक आणि एक भव्य पुतळा आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज, युवराज संभाजीराजे यांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाल्यावर राजेंनी दरवर्षी १९ फेब्रुवारी, शिवजयंतीनिमित्त नवीन महाराष्ट्र सदनापासून भव्य शोभायात्रा काढण्याचा प्रघात सुरू केला. ढोल ताशांच्या आणि शिवरायांच्या जयघोषाच्या गजरात निघणा-या या शोभायात्रेत नऊवारी वेशभूषा परिधान केलेल्या मराठी गृहिणी आणि भगवे फेटे बांधलेले हजारो मराठीप्रेमी सहभागी होतात. दिल्लीकरांकरीता ही शोभायात्रा आणि शिवभक्तांचा वाढता जल्लोष आकर्षणाचा विषय आहे. याखेरीज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन यावर्षी प्रथमच करण्यात आले होते. मावळणकर सभागृहात यानिमित्त प्रसिध्द चित्रकार पोलाजी यांनी काढलेली शिवरायांच्या जीवनचरित्रावरील रांगोळी लक्षवेधी ठरली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत झालेला 'शिवकल्याण राजा' हा संगीतमय कार्यक्रमही रंगला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे ओघवते निवेदन उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. या कार्यक्रमास खासदार संभाजीराजे, डॉ. नरेंद्र जाधव आणि वसुंधराताई जाधव, चंद्रशेखर गर्गे काका, नीना हेजीब आदींची उपस्थिती होती. समितीचे सरचिटणीस कर्नल (निवृत्त) मोहन काकतीकर यांनी स्वागत केले. कलावंतांच्या सत्कार, कार्यक्रमाचे निवेदन आरती कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूरवीर जवानांना 'ऐ मेरे वतन के लोगो' या लता दीदींच्या अजरामर गीताने आदरांजली वाहून करण्यात आली.



पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि शिवकल्याण राजाच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळच्या खुद्द लतादीदींच्या दुर्मिळ आठवणी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. देविका दामले व सोनाली कर्णिक या तरूण गायिकांनी स्वतः पंडितजींच्या उपस्थितीत सादर केलेली ही गीते रसिकांना थेट शिवकालीन काळात घेऊन गेली. स्थानिक कलाकार श्री. गायकवाड, दीपक वैद्य (दिल्ली) यांनी स्वरसाथ केली. विवेक परांजपे व केदार परांजपे (सिंथेसायझर), विशाल गड्डलवार व राजेंद्र दूरकर (तबला व ढोलकी), अजय आले (ऑक्टोपॅड) यांनी साथसंगत केली. प्राणीमात्र झाले दुःखी, जयदेव जयदेव जय जय शिवराया, म्यानातून उसळे तलवारीची पात, हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा, सरणार कधी रण, वेडात मराठे वीर दौडले सात आदी गीतांनी रसिकांची दाद मिळविली. गोविंदाग्रज, सावरकर, कुसुमाग्रज, शंकर अभ्यंकर आदींच्या रचनाही यावेळी सादर करण्यात आल्या. १५-१६ वर्षांचे. दयनाथ मंगेशकर यांना स्वतः स्वातंत्र्यवीरांनी शिवरायांवरील कविता निवडून दिली ही आठवण साक्षात पंडितजींकडून ऐकणं हा एक अत्यंत दुर्मिळ योग होता!