"स्मृतींची चाळता पाने...
बाष्पांदी होती लोचने"
आपल्या सगळ्यांचे सार्वजनिक जीवनातील मित्र, स्नेही, काका, सर रा.मो.हेजीब यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष झाले. त्यानिमित्ताने 'दी कोर'च्या कार्यकारी संपादिका निवेदिता मदाने-वैशंपायन यांच्याकडे त्यांचे मित्र श्री. सुरेंद्र कुलकर्णीनी मैत्रीदिना निमित्त दिलेला आठवणींना उजळा .
'हेजीब' हा शब्द मूळ फारसी भाषेतून मराठीत आला आणि त्याचा अर्थ आहे वकील किंवा राजदूत ! हेजीब यांनी पन्नास वर्षे जी मराठी संस्कृतीची देवाण-घेवाण अन्य राज्यांशी केली तर या अर्थाने ते एक प्रकारे मराठी संस्कृतीचे वकीलच होते. हेजीब मुळचे पुण्याचे. पण त्या अर्थाने अस्सल 'पुणेरी' नव्हे तर स्वभावाने काहीसे अघळपाघळ म्हणजे देशस्थी कारभारच म्हणाना आणि अगदी बालपणी उत्तर भारतात वडिलांच्या नोकरीच्या स्थित्यांतरामुळे, स्थानीय संस्कृतीचे अगत्यही त्यांच्या वागण्यात होते.
सर्वसामान्य, बेताच्या, मध्यम वर्गीय कुटुंबीयांत पाच भावडांतील हेजीब हे सर्वात थोरले. घराला अर्थात आर्थिक हातभार लावायची जवाबदारी त्यांच्यावर होती. ती ते शिकवण्या, सायकलवर फिरते वाचनालय. चालवून ज्याद्वारे त्याकाळी दुर्मिळ असणारी मराठी नियतकालिके व दिवाळी अंक लोकांपर्यंत पोहचविणे अशी कामे करून ही आपल्या भावंडांच्या शिक्षणाला ही त्यांनी मदत केली. स्वतःचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच त्यांनी छोटया मोठया नोक-या ही केल्या.
साठच्या दशकात महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्र नावाचे कार्यालय उघडले त्यात त्यांना सहाय्यकाचे पद मिळाले आणि ख-या अर्थाने त्यांच्या करीयरला वेग आला. त्यानंतर हेजीब यांनी मागे वळून पाहिलेच नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर, मेहनतीवर अभ्यास करुन, कामकाजातील बारकावे समजून घेत उच्चपदस्थ पदे मिळवीत गेले.
यामध्ये सहाय्यक माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक विशेष आयुक्त, उपविशेष आयुक्त, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक आणि त्यानंतर १९९२ ते २००० सालापर्यंत त्यांनी माहिती संचालक हे पद भूषवून स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्ती नंतरही विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजकांनी हेजीब सरांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग करून घेतला. त्यांना सल्लागार, मार्गदर्शक म्हणून आपल्या व्यवसायात नियुक्त केले. दिल्लीतील दीर्घकाळ वास्तव्य आणि अनुभव ही बहुधा या दोन कारणांमुळे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी ही त्यांना आपल्या कार्यकालात विशेष अधिकारी म्हणून नेमले होते.
हेजीब यांना मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय राजदूत म्हणण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांनी आपल्या ७४ वर्षांच्या जीवनातील ५० च्या वर वर्षे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी खर्च केली.
हेजीब यांच्या या सगळ्याच उपक्रमात विविध गोष्टींचा समावेश होता आणि त्याचाच प्रचार प्रसार त्यांनी विविध स्तरावर केला म्हणजे अगदी 'एलिट' स्तरापासून सर्व सामान्य प्रेक्षक माणसाला भावेल अशाही स्तरावर लोक त्यात सामील होत.
त्यांच्याच सहकार्याने दिल्लीतील भव्य कला प्रदर्शने, शिल्प कला प्रदर्शने, नाटयमहोत्सव, नामांकित व्याख्याने होत. तसेच तमाशा महोत्सव, लावणी महोत्सव, लोककला महोत्सव, हस्तकला महोत्सव, कुठल्याही प्रकारचा कलाकार त्यांच्याकरीता लहान नसे.
तीच गोष्ट महाराष्ट्राबद्दलची माहिती केवळ मराठी भाषिकांपर्यंत प्रकाशकांद्वारे न पोहचविता अ मराठी भाषिकांपर्यंत कशी पोहचविता येईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. महाराष्ट्रातील विविध विषयांवर नामांकित लेखकांकडून पुस्तके, पुस्तिका मुद्दाम मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहून घेतली आणि मोठया प्रमाणावर त्याचे वितरण ही केले.
महाराष्ट्रातील मंदिरे, किल्ले, महाराष्ट्राचे खेळ, महाराष्ट्राचे संत इत्यादी अनेक विषयांचा यात समावेश होता. देशाच्या राजधानीत दिल्लीत टिळक पुण्यतिथी गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, आणि अन्य ही महाराष्ट्रीयन सणसमारंभ साजरे केले, संस्कृतीचे जतन संवर्धन करताना त्याकाळातील केंद्रीय मंत्री कै.वसंत साठे यांचेही सर्व प्रकारे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
हेजीब यांनी त्यांचे कार्यक्षेत्र केवळ दिल्लीपर्यंत मर्यादित न ठेवता नवी दिल्ली येथील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकारी पदाचीही जवाबदारी त्यांनी यशस्वीपणे उचलली. हेजीब सरांच्या सार्वजनिक जीवनाचा सर्वोच्च महत्त्वाचा यशस्वी क्षण म्हणता येईल तो म्हणजे १९९४ मध्ये त्यांनी पुढाकार घेऊन सहका-यांच्या मदतीने यशस्वीरित्या दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केलेली तिसरी 'जागतिक मराठी परिषद' विविध विषयांवरील परिसंवाद, तज्ज्ञांची व्याख्याने, मान्यवरांची उपस्थिती, दर्जेदार मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल या गोष्टींची कमतरता नव्हती. म्हणूनच परिषदेस देशभरातूनच नव्हे तर जगभरातून विविध देशातून हजाराच्यावर आलेल्या मराठी भाषिक प्रतिनिधींनी आपली पसंती दर्शविली. त्याचबरोबर यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक ही केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी विशेषतः हेजीब यांना अरविंद दीक्षित आणि सुरेंद्र कुलकर्णी यांची साथ मिळाली.
याशिवाय ही हेजीब यांच्या सामाजिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळात रमेश मुळगुंद, दादासाहेब सरपोतदार, दादा अभ्यंकर,कठाळे, चंद्रशेखर गर्गे यांनी साथ दिली तर त्यानंतर अरविंद दीक्षित, विलास जोशी, प्रकाश गोखले, डॉ.एस.एम.रेगे, वीरेंद्र उपाध्ये, डॉ. मातापूरकर यांचा परिवार, कुलकर्णी परिवारातील विशेष उल्लेख करावा असे गोपीनाथ-निशा, सुरेंद्र-विद्या, शिरीष-आरती, उदय, शशी कुलकर्णी अश्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित घेऊन दिल्लीत महाराष्ट्राचा झेंडा उंचावण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आणि आजही त्यांच्या पश्चात त्यांचे हे कार्य पुढे नेत आहेत. या सगळ्याच्या साक्षीदारच नव्हे तर नेहमीच अप्रत्यक्ष आणि आता प्रत्यक्ष त्यांच्या पत्नी नीना हजीब त्यांचे हे कार्य वैयक्तिक दुःख व्याधी दूर ठेऊन सगळया कार्यत्यांच्या मार्गदर्शक आधारस्तम्भ होऊन हिरीरीने पुढे नेत आहेत