सुसंस्कृततेची खूण : वारी

पंढरीची वारी ही मायमराठीच्या । सुसंस्कृततेची फर मोठी खूण आहे. महाराष्ट्रातील भागवत धर्माचे महान संत ज्ञानदेव व तुकाराम यांच्या वाड्मयाने मराठी जीवन बहरले, समद्ध झाले आणि त्यांनी जीवनाच्या सर्व कला आणि विद्यांना स्पर्श केला. वारी म्हणजे नुसती येरझार घालणे नव्हे. वारी याचा अर्थ विठ्ठलाला मनापासून भेटणे आणि त्याच्या चरणांवर डोके ठेवून चांगल्या कर्मांची-सत्कर्मांची जाणीव करून देणे.वारकरी म्हणजे प्रत्येक वारी जो नवीन काहीतरी चांगले करी, त्याला वारकरी म्हणतात. वारी हा जसा अनेक घरांतला कुळधर्म-कुळाचार आहे. तरीही वारीतून सामाजिक आणि अध्यात्मिक प्रबोधनाच्या खुणा अत्यंत स्पष्टपणे दिसतात. वारीची परंपरा प्राचीन आहे. आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या पांडुरंगाष्टकात पंढरपूरला महायोगपीठ असं म्हटलं आहे. याचा अर्थ शंकराचार्यांच्या काळापासूनही वारीच्या खुणा सापडतात. भगवंताला प्रेमाने भेटणे हे उद्दीष्ट त्यात आहे तसे माणसांमधला देव जागा करणे हेही उद्दीष्ट आहे. सध्या चाललेल्या राक्षसी प्रवृत्तींवर वारी हे रामबाण औषध आहे.



ज्ञानदेवांचे पणजोबा वारी करीत असल्याचे उल्लेख आहेत. वैष्णव परंपरा महाराष्ट्रात ब-यापैकी रूजली. भागवत धर्माच्या पताकेचे अढळस्थान श्री क्षेत्र पंढरपूर झाले. वारकरी संप्रदाय हळूहळू महाराष्ट्रभर पसरला. या सांप्रदायाला ज्ञानेश्वरीसारखा प्रमाणभूत, आदर्श ग्रंथ मिळाला. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामांच्या गाथा ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी ठरली. ज्ञानदेवांनी सर्वसामान्य मानवी मनातला विठ्ठल निर्माण करून तो सत्कर्मासाठी सगळ्यांना व्यक्त केला. म्हणूनच, ज्ञानदेवे रचिला पाया, असे बहिणाबाई म्हणतात. ज्ञानदेवांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे कर्मकांडाचे प्रस्थ मोडून त्यांनी, आपण करीत असलेले कर्म मनापासून करणे हीच देवपूजा मानली. आपल्या कामात आपण जीव ओतणे आणि सतत सेवा व परोपकार करीत रहाणे, यातूनच आपल्याला विठ्ठलाचे रूप जाणवते. म्हणून ज्ञानदेवांचे पसायदान हे विश्वाचे विश्वगीत ठरले. इतरेवळी आपण आपल्या संसारात आनंदाने रमावे पण संसाराचे वृंदावन करण्यासाठी आषाढी वारीला पांडुरंगाला भेटायला जावे, हा आग्रह वारकरी पंथातल्या सा-यांनीच धरला आणि सगळ्या गावांमधून आषाढी वारीसाठी दिंडया निघाल्या.आळंदी ते पंढरपूर, हे २४० किलोमीटर अंतर पायी चालून विठ्ठलाला भेटणे यात आनंद आहेहा आनंद आपल्या प्रपंचाचे टॉनिक आहेप्रपंच आनंदाने करण्यासाठी विठ्ठल आपल्या पाठीशी सतत उभा रहातो म्हणून वारी महत्वाची मानली जाते. ज्ञानोबाराय एका अभंगात म्हणतात, अजी संसार सुफळ जाला गे माये। देखीयेले पाय विठोबाचे ॥ किंवा विठ्ठल यात्रे जाती वो माये। त्यांचे धरीन मी पाये॥ विठोबा माझे माहेर। भेटेना बुद्धीपरिकर। रखुमादेवीवर विठ्ठले। मन ठेवून राहीले निर्धार ॥ ज्ञानदेवांचा हा भाव ओळखला म्हणजे लक्षात येते की संतांचे प्रेम भीवरेच्या तीरी दाटून का येते ते. म्हणून ते म्हणतात, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी । किंवा तुकोबांना वाटते, सकळ तीर्थांचे माहेर, भूवैकुंठ निर्विकार॥


माणसांना माणसाने भेटणे आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. आपण सारे मोबाईलवासी झालो आहोत. पण माणूस जेव्हा माणसाला प्रत्यक्ष भेटतो त्या भेटीत जिवंतपणा असतो. चालत चालत जाण्यात अधिक स्नेहाळपणा असतो. गाडीवरून भेटणे ही यांत्रिक भेट असते पण चालत जाऊन माणूस आला तर दोघांनाही विशेष वाटते. मला वाटते भागवतधर्माचे असे वैशिष्ट्य जगात कोठेही नसावे की देव भक्ताची वाट पाहतो. इतर पंथ किंवा संप्रदायांत भक्त वाट पहात असतात आणि देव कोठे तरी उंच गाभा-यात बसलेला असतो. बहुतेकांना गाभा-यापर्यंत जाण्याचीही मनाई असते. काही देवांच्या गाभा-यांत आजही दिवे नाहीत. समयांच्या प्रकाशात तो देव कितपत भक्तांना दिसतो कोणास ठावूक.पण विठ्ठलाला आलिंगन द्यायला विठ्ठल ही उत्सुक असतो आणि भक्तही उत्सुक असतात. वारीचे उपचारही किती साधे आहेत. कपाळी गंध, मधोमध बुक्का. गंध हे सत्कर्माचे तर बुक्का हे समतेचे प्रतीक आहे. तुळशी माळ हे अभ्यासाचे आणि सेवेचे प्रतीक तर गोपीचंदन हे निष्काम भक्तीचे प्रतीक आहे. हरिपाठ म्हंटल्याशिवाय अनेक वरकरी जेवत नाहीत किंवा रात्री झोपतही नाहीत. वारीत कोणीही कोणाला कुळ-गोत्र विचारत नाही. सारेच जण एकमेकांना माऊली म्हणतात.यातूनच वारी सर्वांना समान लेखते. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव येथे काहीही नसतो. आपण सारे एक आहोत या भावनेतून लाखो वारकरी पंढरपूरला जातात.त्यांचे पाय थकत नाहीत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, च्या जयघोषात २४० कि.मी. अंतर ते कधी चालून जातात ते त्यांना कळत नाही. जेव्हा पंढरपूरपासून काही अंतरावर विठ्ठलाचा कळस दिसतो तेव्हा जे काही धाव्याचे अभंग सुरू होतात ते इतके आर्त आहेत की विठ्ठल भेटीची आस त्यात विलक्षण असते. नाचत-गात आनंदाने सारे जातात. फुगड्या खेळतात, भारूडे, गौळणी, संतांचे अभंग गातात. प्रवचनांतून प्रबोधन होते. कीर्तनातून शुध्द जीवनाचे निरूपण ऐकायला मिळते. रसाळ संतचरित्रेही ऐकायला मिळतात असा तो सगळा सोहळा निसर्गाच्या साथीने आनंदाने होतो. हा आनंदच प्रसाद म्हणून वाटला जातो. चंद्रभागेच्या तीरावर आल्यावर स्नान करायचे, नगर प्रदक्षिणा करायची, पुंडलिकाचे दर्शन घ्यायचे नि मग विठ्ठलाच्या राऊळात जायचे. पांडुरंगाची सावळी-साजिरी मूर्ती बघून कृतार्थ व्हायचे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने। ज्ञानोबाराय म्हणतात, जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा, आपुलीया ॥ गोविंदाचे गुणी वेधले, पांडुरंगी मन रंगले। तो मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही.तुकोबांच्याच शब्दांत सांगायचे तर, आनंदाचे डोही आनंद तरंग। हा आनंद चिरंतन असतो. तो ज्याला मिळतो तो वैष्णव. तो भगवतभक्त. विठ्ठलाला स्मरून तो सदाचरण करतो. आपले काम उत्तम करतो. प्रपंच आनंदाने करतो आणि आनंदाने विठ्ठलाला सांगतो, बापरखुमादेवीवरे विठ्ठलेची भेटी । देवा दरवर्षी तुझी भेट व्हावी, आम्हा सर्वांना सुखी ठेवावे. भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे असे रहावे.ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण करावी, अवघे विश्व सुखी ठेवावे. वारीचा गोपालकाला हा आहे.आजही वारी कोठेही वर्तमानपत्रात जाहिरात न देता लाखो माणसे आळंदीला माऊलींच्या समाधीस्थळी जाऊन पुढे वारीला जातात. त्यांना काय मिळते याचे विश्लेषण करण्यापेक्षा आपणच एकदा वारी अनुभवावी. म्हणूनच नामदेव म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी।। 


या अनुभवाचं महत्वाचं ठिकाण म्हणजे अजानुवृक्षापासून पंढरपुरापर्यंत पायी चालत जाऊन विठ्ठलाला भेटणे. जीवनातील ही कृतार्थता वारक-यांना आजही लाख मोलाची वाटते. म्हणून ते म्हणतात, गुण गाईन आवडी. आणि जयजयकार करतात, पुंडलीक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय।।