मंडळी, गेले काही दिवस आपण विविध वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून थायलंड येथे गुहेत अडकलेल्या मुलांची बातमी वाचत आहोत.
आणि नुकतेच सर्व म्हणजे १२ मुले आणि त्यांचे २५ वर्षीय प्रशिक्षक यांना गुहेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आणी माझ्या सारख्याच असंख्य वाचकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर थायलंडच्या नेव्ही सिल्सनी त्यांच्या फेसबुक पेज वर जी प्रतिक्रिया दिली ती वाचून या संबंधीची जमेल तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ते नेव्ही सिल्स असे म्हणतात की we don't know if it is a miracle or sci- ence or something else but we could rescue all the boys and their coach...
खरच हे काय आहे.
गुहेत अडकल्यापासून पहिले १० दिवस संपूर्ण अंधारात जिवंत राहिलेले ते १३ जीव हे आश्चर्य म्हणायचे का अत्यंत यशस्वी मोहीम राबवून त्या सगळयांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेल यश हे आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान यांचे यश आहे.
ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न या प्रसंगानंतर पूर्वी वाचलेले एक पुस्तक आठवले सत्तर दिवस. रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचल्यानंतर जगण्याची जिद्द काय असते हे लक्ष्यात येते तसेच काहीसे थायलंडच्या आत्ताच्या प्रसंगावरूनही लक्ष्यात येते यात गुहेत अडकलेल्या मंडळींची जगण्याची जिद्द तर कळतेच पण त्यांच्या बरोबरीने त्यांना जगवण्याची जिद्द मनात ठेवून साधारण पणे एक आठवडा अथक परिश्रम करणा-या मंडळींची पण कमाल वाटते आणि म्हणूनच मी त्यांना देवदूत असे संबोधले आहे.
मला खात्री आहे की आपण देखील ही सगळी माहिती वाचून अचंबित व्हाल
शनिवार दिनांक २३ जुन २०१८
थायलंड मधील चियांग राय प्रव्हिनस मधील १२ खेळाडू असलेली वाईल्ड बोअर नावाची फुटबॉल टीम ज्या मध्ये ११ वर्ष्या पासून ते १७ वर्ष्या पर्यंतची मुले आपला नेहेमीचा सराव संपवून सायकलिंग आणि ट्रेकिंग साठी बाहेर पडली.त्यांच्या सोबत एकापोल नावाचा प्रशिक्षक देखील होता ज्याचे वय २५ वर्ष.
आपापल्या सायकल वरून मुले त्याच भागात असलेल्या थाम लुआंग केव्ह कम्प्लेक्स येथे ट्रेकिंग साठी जाऊन पोचली.टास्क काय होते माहितीये त्या गुहेच्या आत म्हणजे साधारण ३५ किमी आत असलेल्या जागी जाऊन आपले नाव तिथे लिहून परत यायचे एकापोल त्या पूर्वी ह्याच वर्ष्या मध्ये ४ वेळा तिथे आत जाऊन आला होतो तसेच सोबत असलेल्या मुलांपैकी देखील काही मुले तिथे जाऊन आली होती टास्क टफ होता पण सरावासाठी आवश्यक होता कारण एकमेकांना मदत करत आपले ध्येय गाठणे हे उद्दिष्ट होते गुहेच्या बाहेर मोठा बोर्ड पण आहे आणि त्यावर लिहिलंय की जुलै ते अक्टॉबर या काळात गुहेत जाताना विशेष काळजी घ्यावी पण आताशी तर जुन आहे मग काय हरकत आहे असा विचार करून सर्व मंडळी आत शिरली
संध्याकाळ झाली मुलांचे आई वडील वाट बघून काळजीत पडू लागले,, मुख्य प्रशिक्षक जो त्या मुलांबरोबर गेलेला नाहीये तो पण काळजीत पडला काहीच माहिती मिळेना एकपोल चा फोन लागेना आणि मग त्याने शोध सुरू केला. त्याला साधारण पणे सगळे ट्रेकिंगला कुठे गेले असतील याचा अंदाज होता, त्या जागी तो जाऊन पोचला आणि त्याच्या काळजात चर्र झाले कारण मुलांच्या सायकल्स आणि बॅग्स गुहेच्या बाहेर आहेत पण...
बाहेर सुरू असलेल्या धुवाधार पावसाने गुहेत मात्र आता पाणी साचले आहे तो वेड्या सारखा एके च्या नावाने हाका मारत सुटला पण कोणीच प्रतिसाद देईना आणि तिथेच त्याच्या काय झाले असेल ते लक्षात आले. मुले आत गेली, पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण गुहा पाण्याने भरली.
तो पर्यंत त्या मुलांपैकी एका मुलाच्या आईने आपला मुलगा हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती त्या मुळे पोलीस देखील गुहेच्या तोंडापाशी जाऊज पोचलेआणि शोधकार्य सुरू झाले.
२४ जून २०१८
गुहेच्या अंतर्भागातील माहिती असलेल्या मंडळींनी मुले जिवंत असू शकतात आस अंदाज व्यक्त केला आणि मग गुहेच्या बाहेर मुलांच्या सुखरूपते साठी प्रार्थना सुरू झाल्या प्रशासन देखील गुहेच्या आत कसे शिरता येईल याची आखणी करायला लागले पाण्याचा जोर वाढतच होता.
२५ जून २०१८
थाई नेव्ही सिल्स चे पाणबुडे गुहे मध्ये उतरले आणि आत जाण्याचा प्रयत्न करू लागले परंतु गुहेत पाणी इतके जास्त होते आणि ते पण खूप गढूळ होते की ज्या मुळे त्या पाणबुडयाना लगेचच बाहेर यावे लागले.
२६ जून २०१८
आज पुन्हा एकदा पाणबुडे गुहेत शिरले आणि अथक परिश्रमानी एका T जंक्शन ला पोचले जो साधारण पणे पटधया बीच जवळचा भाग होता आणि शोध कार्यात सहभागी असलेल्या लोकांना मुले तिथे असतील असा अंदाज होता पणपुन्हा एकदा पाण्याच्या दबावामुळे सगळ्यांना बाहेर पडावे लागले.
२७ जून २०१८
ब्रिटिश आणि अमेरिकन पाणबुडे, लष्करी अधिकारी, गुहे मधील पाण्यात बुडी मारणारे तज्ञ तसेच जगभरातील ह्या विषयातील तज्ञ मंडळी ज्यामये ब्रिटिश तज्ञ पाणबुडे “रिचर्ड स्टॅतों, जन आणि रॉबर्ट'' हे मदतीसाठी विविध अत्याधुनिक उपकरणे घेऊन थायलंड कडे रवाना झाले.
आज पुन्हा एकदा नेव्ही सिल्सनी गुहेत शिरण्याचा प्रयत्न केला पण अति वृष्टी आणि पाण्याचा जोर या मुळे आजही त्यांना आत शिरता आले नाही
२८ जून २०१८
खूप जोराचा पाऊस आणि गुहेत खूप मोठ्या प्रमाणात येणारा पाण्याच्या लोंढा या मुळे आजच्या दिवसासाठी शोध कार्य रहित करण्यात आले.
गुहेतील पाणी बाहेर काढण्यासाठी मोठाले पंप तसेच गुहेच्या वरील डोंगरात आत जाण्यासाठी एखादी वाट आहे का हे शोधण्यासाठी ड्रोन कॅमेरे त्याच बरोबर साधारण ६०० गिर्यारोहक आज शोध कामाला लागले
२९ जून २०१८
आजही जोराच्या पावसामुळे शोधकार्य स्थगित करावे लागले.
थायलंड चे पंतप्रान यांनी घटना स्थळी येऊन शोध कार्याची माहिती घेतली आणि आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी दाखवली
३० जून २०१८
आज पाऊस थांबला आणि पुन्हा दा पाणबुड गुहत शिरल, गल्या वेळेपेक्षा ते थोडे पुढे नक्की गेले पण अजूनही ते त्या जागेपासून बरेच दूर होते जिथे मुले असतील असे त्यांना वाटत होते
अजूनही कोणी जिवंत असल्याची कोणतीही चिन्हे सापडत नव्हती प्रयत्न सुरू होते
१ जुलै २०१८
आज पुन्हा पावसाची उघडीप मिळाल्यावर पाणबुडे गुहेच्या अजून खोल भागात जाऊन पोचले आणि त्यांनी तिथे एक अस्थायी बेस तयार केला ज्याठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर ठेवले गेले कारण त्यापुढे जायला ऑक्सिजन कमी पडू लागायचा.
२ जुलै २०१८
साधारण पणे रात्रीच्या १० वाजता रिचर्ड आणि जन या २ ब्रिटिश पाणबुडयाना गुहेच्या तोंडापासून ३२ किलोमीटर अंतरावर संपूर्ण टीम त्यांच्या कोच सकट जिवंत सापडली
गुहेच्या उतारावर एका दगडावर ही सर्व मंडळी गेले १० दिवस बसून होती आणि जिवंत पण होती.
रिचर्ड आणि जन गुहेच्या तोंडापासून दोर लावत पुढे जात होते, जन चा हात त्या दोरी वरून सुटला आणि त्याला पाण्याच्या पृष्ठभागी यावे लागले आणि त्याला ही मंडळी दिसली.ज़न आणि ह्या टीम मध्ये पाणी होते पण तो त्यांच्याशी बोलू शकत होता आणि मुलांच्या टीम मध्ये एक मुलगा असा होता की ज्याला इंग्रजी बोलता येत होते
जन ने ताबडतोब सोबत आणलेल्या हेडफोन द्वारे बाहेर संदेश पाठवून मुले सापडली आहेत आणि सुखरूप देखील आहेत हा संदेश दिला.
इंग्रजी बोलता येणा-या मुलाने जन ला विचारले आज कोणता दिवस आहे तेव्हा जन त्यांना म्हणाला आज सोमवार आहे पण तो तुम्ही आत आल्या नंतरचा १०वा दिवस आहे घाबरू नका तुम्ही सगळे खूप शूर आहात आणि आता तुमच्या मदती साठा काही वळात खूप लोक इथे येतील
३ जुलै २०१८
आज ७ पाणबुडे ज्यामध्ये १ अस्ट्रेलियन डॉक्टर आणि एक नर्स पण होते ते ग्रुप जवळ जाऊन पोहचले.
रिचर्ड हॅरिस नावाचा हा ऑस्ट्रेलियन डॉक्टर भूलतज्ञ होता पण त्याच बरोबर तो एक प्रशिक्षित पाणबुडा पण होता डॉक्टर ने सगळ्या गृपची तपासणी केली आणि त्या सगळ्यांना पचायला सोपे असलेले पण प्रथिन युक्त अन्न पदार्थ खायला दिले
सोबतच्या पाणबुड्यांनी या सर्व मुलांचे विडिओ काढले ज्या मध्ये सगळी मुलं आपआपली नावे सांगताहेत आणि थाई पद्धती नुसार नमस्कार करताना दिसतात.
आता या मुलांजवळ अन्न, औषधे, पाणी, गरम कपडे, टॉर्च लाईट तसेच मदतीसाठी तज्ञ मंडळी पोचली आहेत पण
एक गोष्ट लक्षात आली की या पैकी काही मुलांना पोहताच येत नाहीये मग त्यांना बाहेर कसे न्यायचे
आतापर्यंत हा प्रश्न विविध माध्यमांद्वारे जगभर पोचला होता.
जगभरातील असंख्य तज्ञ मंडळी/संस्था मुलांना बाहेर कसे काढायचे याचे विविध उपाय शोधत होते.
त्यातला एक विचार हा होता की मुलांना संपूर्ण पावसाळा संपेस्तोवर तिथेच ठेवायचे त्यासाठी पुढील ४ महिने पुरेल अशी सगळी साधन सामुग्री त्यांना पुरवायची आणि पावसाळा संपला की मग त्यांना बाहेर आणायचे
डोंगराला भोक पाडून एक रस्ता तयार करायचा, तो प्रयत्न पण झाला पण ९०० मीटर खोल गेल्यावर देखील गुहे पर्यंत पोचता आले नाही
मुलांना पाण्याखालन पोहायचे प्रशिक्षण द्यायचे आणि बाहेर आणायचे.पण ते बाहेर पडायला कमीत कमी ५ तास लागणार होते गुहेत काही ठिकाणी खूप पाणी होते तसेच काही जागी खूपच कमी जागा होती सगळी कडे चिखल भरलेला होता गढूळ पाण्यामळे काहीच दिसायचे नाहीगुहेतले पाणी बाहेर काढणे हा एकच उपाय होतातज्ञ लगेच कामाला लागले.
सुरुवातीला गुहेत शिरणा-या पाण्याचा प्रवाह दुस-या दिशेला वळवला गेला त्याच बरोबर विविध ठिकाणी ड्रिल करून पाणी बाहेर काढायला सुरुवात झाली पण ह्या कार्यात सगळ्यात महत्वाचे ठरले ते झेक रिपब्लिक या देशाने दिलेले पंप हे पंप प्रत्येक सेकंदाला ४०० लिटर पाणी म्हणजे प्रत्येक तासाला सोळा लाख लिटर पाणी गुहेतून बाहेर काढून फेकू लागले आणि ५ जुलै २०१८ रोजी तमुनम टीम गुहेमध्ये १५ किलोमीटर आतपर्यंत चालत जाऊशकली
६ जुलै २०१८
आज गुहेतील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय हे लक्षात आल्याने गुहेमध्ये एक एयर लाईन टाकली गेली
आता साधारणपणे ९० पाणबुडे या मदत कार्यात सक्रिय झाले होते त्यातील ५० हे थायलंड मधील तर उर्वरित ४० हे इतर देशातील तज्ञ होते
८ जुलै २०१८
१३ पाणबुडे आज गुहेमध्ये शिरले आणि त्यांनी पहिल्या ४ मुलांना गुहेच्या बाहेर आणले साधारण संयाकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी पहिला मुलगा गुहेच्या बाहेर आला आणि त्याला लगेचच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले, चवथा मुलगा सायंकाळी ७५० ला बाहेर पोहचला
त्यानंतर पणबुडयांना कमीत कमी १० तासाची विश्रांती आवश्यक असल्याने त्या दिवशीची मोहीम संपली
९ जुलै २०१८
पुन्हा एकदा दिवसभरात ४ मुलांना बाहेर काढण्यात आले.
मुलांना बाहेर काढत असताना जो सगळ्यात फिट आहे त्याला सगळ्यात पाहिले बाहेर काढायचे हे धोरण ठरले कारण त्याची जगण्याची शाश्वती जास्त आहे
१० जुलै २०१८
आज उरलेली ४ मुले, त्यांचा कोच एके, सोबत असलेले डॉक्टर, नर्स, आणि सगळे पाणबुडे सुखरूप बाहेर आले आणि ही मोहीम संपली
टीम मधील एका मुलाचा वाढदिवस २३ जून रोजी होता तो साजरा करण्यासाठी गुहेत शिरताना मुलांनी खाण्याचे पदार्थ आणि केक बरोबर घेतले होते तसेच आजू बाजूच्या झ-यातून येणारे पाणी पिऊ या मुलांनी हे २ आठवडे काढले.
कोच एकपोल याने या काळात मुलांना कमी पडायला नको म्हणून अजिबात अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत कृश झाली होती आणि म्हणून त्याला सगळ्यात शेवटी बाहेर काढले गेले.
वाईल्ड बोअर या टीमचा कोच एकपोल हा बुद्धिस्ट मंक आहे आणि त्याने सगळ्या मुलांना प्राणायाम करायला लावून मन शांत ठेवायला मदत केली
साधारण पणे १००० मंडळी या संपूर्ण मोहिमे मध्ये सामील होती, जगभरातील १९ देशातून ही मंडळी इथे आली होती पण त्यात प्रामुख्याने थायलंड मधील नागरिकांनी अतोनात कष्ट घेतले
एलोन मस्क नावाच्या अमेरिकन उद्योगपतीने मुलांच्या आकाराची एक पाणबुडी तयार करून तो ती थायलंडला मदत करण्यासाठी घेऊन आला होता पण या पाणबुडीचा वापर केला गेला नाही.
FIFA तर्फे या सर्व मुलांना फुटबॉल वर्ल्ड कप फायनल बघण्याचे निमंत्रण दिले गेले आहे पण सर्व मुलांना १० दिवस हॉस्पिटल मध्ये राहायला लागणार असल्याने ते जाऊ शकणार नाहीत.
मँचेस्टर युनायटेड या प्रसिद्ध फुटबॉल क्लब ने पुढील वर्षी या सगळ्या मुलांना ओल्ड ट्रॅफर्ड वर खेळायला येण्याचे निमंत्रण दिले आहे या मोहिमे मध्ये समान गुनान नावाच्या ३५ वर्षीय नेव्ही सील हा ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे मरण पावला.
द गार्दीअन या वृत्तपत्रा नुसार शेवटचा मुलगा बाहेर आला आणि गुहेतून पाणी बाहेर काढण्यासाठी लावलेले पंप बंद पडले.
शोध मोहीम सुरू असताना थायलंड मधील भारतीय दूतावासाने गुहेतील पाणी बाहेर काढण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स चे पंप वापरण्यासंदर्भात सूचना केली होती आणि त्यासाठी श्री. प्रसाद कुलकर्णी आणि शुक्ला असे २ इंजिनीअर ५ जुलै रोजी थायलंडला रवाना केले होते तसेच मोठ्या क्षमतेचे काही पंप किर्लोस्करवाडी येथे तयार पण ठेवले होते तयार पण
जगण्याची जिद्द आणि जगवण्याचीपण जिद्द असल्याशिवाय हे शक्य होणार नाही.
गुहेतल्या मुलांचे रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती होती आणि त्यांना जगावण्याची जिद्द असणा-यांना ताकत देणारी पण कोणतीतरी अदृश्य शक्ती होती ह्यात वाद नाही.
म्हणूनच इथे चमत्कार झाला का की
विज्ञान जिंकले हे ठरवता येत नाही?!