गुरूपूर्णिमा, संपूर्ण भारतातील पवित्रतम उत्सवां पैकी एक उत्सव. पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण भारतात कुठे ही जा, अश्या अनेक व्यक्ति भेटतील ज्यांच्या मनात गुरू साठी अपार आस्था आहे. एखादा कदाचित कमी शिकलेला असेल अथवा खूप मोठा विद्वान, प्रत्येकाच्या मनात गुरू साठी आदरभाव असणारच.
इंग्रजांनी भारतात जी शिक्षण व्यवस्था स्थापित केली त्याचा परिणाम असा झाला की वर्तमान युगात जीवना विषयी भौतिक दृष्टिकोण असणारे अधिक भेटतात. त्यांच्या देखील, मनाच्या कुठल्या तरी कोप-यात गुरू साठी श्रद्धा असतेच. हे हया मातीचे संस्कार आहेत.
गुरूपूर्णिमा आपल्याला गुरू-शिष्य परंपरेची आठवण करून देते. ही मानवीय परंपरा आहे, भारतीय परंपरा आहे, हिन्दू संस्कृतिची परंपरा आहे.
आपल्या आसपासच्या विश्वात-'मला जे माहित आहे अथवा जे येते ते मी इतरांना शिकवितो' असे आपण पाहतो. इथे एक आहे गुरू आणि दुसरा शिष्य. परन्तु हे दोघे ही मानव. तुम्ही कधी असे ऐकले आहे का की एका सिंहाने जंगलात दुस-या लहान शावकाला शिकार करण्याचे शिक्षण दिले? अथवा एक बैलाने दुस-या लहान बैलाला शेत नांगरण्याचे शिकवले? प्राणी विश्वामधे असे नसते. तिथे न कुणी शिष्य न कुणी गुरूलहान शावक आपल्या आईला जंगलात शिकार करताना पाहतो, कळत न कळत निरीक्षण करतो आणि एक दिवस स्वताःच शिकार करतो. त्याला कुणी शिक्षण देत नाही.थोडक्यात मानव सोडून प्राणी विश्वात न पहायला मिळणारी गुरू-शिष्य परंपरा ही मानवी परंपरा आहे.
गुरू-शिष्य परंपरेत केवळ शिकवण्या इतका सिमीत व्यवहार नसतो. गुरू आपल्या शिष्याला शिकवतो, ज्ञान देतो व मार्गदर्शन देखील करतो. अगदी जीवन जगण्याच्या उद्देश्यापासून ते ईश्वर प्राप्ति सारख्या अध्यात्मिक अनुभूति पर्यन्त.
विश्वा मधे अन्यत्र Teacher, instructor, professor पहायला मिळतात. ते अनेक विद्यार्थाना मोठयामोठया महाविद्यालयांमध्ये शिक्षण देतात. परंतु भारतातील गुरूची संकल्पना हया पेक्षा खूप उच्च आहे. जसे शिवाजीला लहानपणी दादोजी कोंडदेवांनी तलवार, भाला, पट्टा चालवणे शिकवले, ते शिवाजीचे गुरू होते, तरी पण इतिहासात गुरू म्हणून समर्थ रामदासांचा उल्लेख आढळतो, ज्यांनी शिवरायांना राज्य कसे चालवावे?, आपला शत्रु कोण? आणि मित्र कोण?-हे कसे ओळखावे, हे शिकवले अथवा हयाचे मार्गदर्शन केले.
थोडक्यात सांगायचे झाले तर गुरूशिष्य संकल्पना समजण्या साठी भारतात जन्म घ्यायला हवा, भारताला समजणे आवश्यक आहे. जगातील अन्य व्यक्तिंना हे समजणे तितके सोपे नाही.
गुरू म्हणजे एखादा साधु अथवा एखादे योगी, संन्यासी, असा देखील एक समज आहे. जेव्हां पासून हया परंपरेला धार्मिक अधिष्ठान मिळाले तेव्हां पासून मठ-मंदिरात, आश्रमात हा उत्सव साजरा होऊ लागला. त्याचे स्वरूप धार्मिक झाले. परन्तू भूतकाळात देखील हा उत्सव केवळ धार्मिक नव्हता. जो साधु नाही, संन्यासी नाही परंतु गुरू आहे असे देखील बरेच गुरू आपल्याला पहायला मिळतात. संगीत, गायन, नृत्य, चित्रकला हया क्षेत्रात आज देखील अनेक शिष्य स्वतःच्या गुरूंना भेटायला, पाया पडायला गुरूपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या घरी जातातच. ते सर्व काही साधु-संन्यासी असणे आवश्यक नाही.
समाजात सामान्य व्यक्तिंचे कोणी न कोणी गुरू असतात, तसे श्रीमंत व्यक्तिंचे देखील गुरू असतात. पूर्वी राजा-महाराजांचे देखील गुरू असायचे. गुरूकुलात विद्याभ्यासाची जशी व्यवस्था असायची तशी वेग-वेगळया प्रकारे गुरू मार्गदर्शन करायचे. बुंदेलखंडातील वीर छत्रसालचे गुरू स्वामी प्राणनाथ स्वतः युद्धभूमी वर आले होते असा उल्लेख पहायला मिळतो. युद्धभूमी वर अटीतटीच्या वेळी शस्त्र विद्या शिकवण्या पेक्षा मानसिक बळ देणे अधिक आवश्यक, स्वामी प्राणनाथ सम्भवतः त्यासाठीचे आपल्या शिष्या सोबत युद्धात स्वतः उभे होते. केवढे मोठे साहस! म्हणूनच असे म्हणावे लागते की गुरू-शिष्य संकल्पना समजण्या साठी भारताला समजणे आवश्यक आहे.
साक्षात भगवंताने जेव्हां हया भूमीत मानव रूपात जन्म घेतला, तेव्हा त्याने देखील गुरूकुलात शिक्षण घेतले.तो देखील शिष्य होता. त्याने देखील गुरू वंदन करून गुरूदक्षिणा दिली होती.
कृष्णाने एकदा आपल्या गुरूनां विचारले, मला देखील गुरूदक्षिणा द्यायची आहे. काय देऊ? तेव्हां गुरूनी सविनय नाकारले, गुरू म्हणे भगवंता मी तुझ्या कडून काय गुरूदक्षिणा घेऊ? मला गुरू होण्याचे भाग्य लाभले हयातच माझे जीवन धन्य झाले. पण कृष्णाला स्वतःचे कर्तव्य माहित होते. तो गुरूमाते कडे गेला आणि स्वतःचा विचार अधिक दृढतापूर्वक ठेवला. तेव्हां गुरूमातेने गुरूच्या माध्यमातुन सांगितले तुला गुरूदक्षिणा द्यायची आहे न! मग आमच्या पुत्रांना राक्षस घेऊन गेलाय, ते आज देखील कारागृहात आहेत, त्यांना मुक्त करून घेऊन ये. कृष्णाने त्या राक्षसाशी युद्ध केले, त्यावर विजय प्राप्त करून गुरूपुत्रांना सोडवले. त्या राक्षसाच्या अस्थितुन विजयाचा प्रतिक असा शंख बनविला आणि महाभारता सारख्या युद्धात देखील तो शंख फुकला. त्या राक्षसाचे नाव होते पाँचजन्य, म्हणुन त्या शंखाचे नाव देखील पाँचजन्य होते.थोडक्यात भगवंतानी देखील गुरूदक्षिणा दिली. गुरू-शिष्य परंपरेचे हयाहुन अधिक उदात्त उदाहरण काय असणार!
एक प्रचलित विचार असा की गुरू आणि देव हयात श्रेष्ठ कोण? हया भूमीत गुरूंना देवा पेक्षा देखील श्रेष्ठ स्थान प्राप्त आहे. कारण भगवत दर्शन करायच असल्यास गुरूचे मार्गदर्शन प्राप्त करणे आवश्यक.
'तुम्ही देव पाहिला का?'
'हो! अगदी तु जसा माझ्याशी बोलतो
तसे देवाशी देखील संवाद करणे शक्य आहे,'
'मला तुम्ही देवाशी भेट घालुन द्याल?'
'अवश्य'
हा संवाद स्वामी विवेकानंद व त्यांचे रामकृष्ण परमहंस हया दोघातील आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की रामकृष्णांनी जेव्हां नरेन्द्रच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हां एक दिव्य शक्तिचे दर्शन घडले.
तरी भगवंताचे दर्शन करवुन देण्याचे सामर्थ्य ज्यांच्या पाशी आहेत ते गुरू आणि हे केवल भारताच शक्य आहे म्हणुन ही परपंरा भारतीय आहे.
जीवनात गुरूचे मार्गदर्शन प्राप्त झाले तर परिवर्तनाची अनुभूति होते. गुरू स्वतः शिक्षण देण्यासाठी सोबत नाहीत, तरी देखील जंगलात एका वृक्षाच्या छायेत, गुरूच्या प्रतिमेचे केवळ चरण वंदन करून, श्रद्धापूर्वक स्मरण करून विद्यार्जन केल्याचे उदाहरण पण भारतात आहे. एकलव्य कोणाला माहित नाही? त्याची गुरूदक्षिणा देखील एक आदर्श रूपात वर्णित आहे.हे एक असे उदाहरण की जेथे गुरूचे केवळ स्मरण देखील मार्गदर्शक ठरते.
गुरू-शिष्य परंपरा ही भारतीय अर्थात हिन्दु परंपरा आहे. सांस्कृतिक वारसा ज्यांना लाभला नाही असे भारतातील अहिन्दु, ह्या प्रवाहात पहायला मिळत नहीत. म्हणुन ही परंपरा हिन्दु संस्कृतिची देन आहे असे म्हणायला काहीही हरकत नाही.
एक विचार, पुस्तक अथवा ग्रंथ देखील भारतात गुरूस्थानी आहे. शिख धर्मात गुरूग्रंथ साहेब गुरू रूपात आहेत. गुरूनानकांपासून दशम गुरूपर्यंत व्यक्ति गुरू होते पण त्यानंतर गुरूग्रंथ साहेब गुरू स्थानी विराजमान आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून एका ग्रंथाची पूजा केली जाते. हया परंपरेत व्यक्ति नाही परन्तु ग्रंथाला गुरू म्हणुन स्वीकारण्यात आले आहे.
अशीच एक परंपरा म्हणजे गुरू स्थानी भगवा ध्वज. ध्वज हे एक प्रतीक आहे विचारांचे, तत्वांचे, मार्गदर्शक मुल्यांचे. व्यक्ति जरी किती ही महान असला तरी भविष्यात त्याचे स्खलन होऊ शकते. तसेच एका व्यक्तिच्या दृष्टिने जो आदर्श, तो सर्वांना आदर्श वाटेलच असे आवश्यक नाही.म्हणूनच तत्व रूपात भगवत ध्वजाला गुरू स्थानी ठेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लक्षावधी स्वयंसेवक दरवर्षी गुरूपूर्णिमेला त्याचे पूजन करतात. त्याच्या समक्ष समर्पण करतात.
इथे देखील व्यक्ति नाही परंतु विचार, तत्व गुरू स्थानी आहे. एक अनोखी पद्धति, अतुलनीय परंपरा. संघ स्वयंसेवकाच्या रूपाने दरवर्षी व्यासपौर्णिमेला पूजन करणे उभ्या आयुष्यातील एक भाग्यच. हया परंपरेचा मी देखील एक अनुगामी आणि म्हणूनच लेखनाचा सुयोग आला. गुरू-शिष्य परंपरेचे पुण्यस्मरण करून विराम.
(खूप वर्षांपूर्वी विद्यार्थी असताना मी स्व. प्र. ग. सहस्त्रबुद्धे लिखित 'जीवन मूल्य' पुस्तक वाचले होते, पुस्तकातील काही विचार आज देखील आठवतात. मनाला चैतन्य देऊन जातात. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.)