उमलते नवी रम्य पहाट!

ज्ञानेश्वर मुळे हे नाव पहिल्यांदा नजरेस पडले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखांद्वारे.लेखनशैली साधी,सरळ, सोपी. विचार सुस्पष्ट,आपल्या मातीचे वाटणारे, अक्षरचित्रण असे की,वाचक अलगद त्या भावविश्वात तरंगावा.



तर वाचक-लेखक असे त्यांचेशी पहिले नाते बनलेले.


ते जपानहून भारतात आले तेव्हा माझ्या दिल्लीतील त्यावेळचा सुख-दुःखाचा साथी व सध्याचा मराठी वाहिन्यांचा सुपर स्टार राजू खांडेकर ने त्यांची प्रत्यक्ष भेटच घालून दिली.जशी सरपट धावणारी लेखणी तशीच सरळ बांध्याची चणी.



दरम्यान आणखी एकदा परिवारासह शंकर्स डॉल्स म्युझियमला पोचलो तर अवचित समोर मुळे सर कॅण्टिन मध्ये, सोबत साधना मॅम.सरांनी अगदी घरगुती परिचय करून दिला.


२००८ मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या दिल्लीत असणा-या मराठी अधिकारींच्या मदतीने युपीएससी च्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी येणा-या उमेदवारांसाठी 'मॉक इंटरव्हयू' घेण्याचा उपक्रम हाती घेतला तेव्हा मुळे सर पॅनल मेंबर म्हणून तर आलेच पण या उपक्रमावर लोकसत्तेत एक दीर्घ लेख लिहून प्रोत्साहनही दिले.


हा उपक्रम आरंभशूर राहू नये म्हणून त्यांनी नियमितपणे भेटीगाठीद्वारे सेतू निर्माण करण्यास सुचवले. यासाठी एक विचार विनिमय बैठकही ठेवली. या बैठकीत त्यावेळचे माझे साथी अधिकारी मित्र उन्मेष वाघ सर, प्रताप भोसले, अंकुश चव्हाण, मनोज पांगारकर, मी आणि मुळे सर असे जमलो. तिथेच सरांनी या ग्रुपला नाव दिले षटकार क्लब. आज दिल्लीमध्ये १५०- २०० मराठी अधिकारी वृंदांची एकजिनसी टीम दिसतेय त्याची मुहूर्तमेढ ११ वर्षांपूर्वीची आहे.


सर त्यानंतर मालदीव, अमेरिका व अन्यत्र जात राहिले तरी ते जेव्हा-जेव्हा भारतात यायचे तेव्हा-तेव्हा त्यांचा संबंध येतच राहिला. एक तर त्यांच्या वा साधना वहिनींच्या पुस्तक प्रकाशनानिमित्ताने अथवा पारिवारिक स्नेहभोजनानिमित्ताने पण त्यांनी अनुबंध वाढता ठेवला, दृढही केला.


दरम्यान मी महाराष्ट्र परिचय केंद्रामधून २०१२ मध्ये केंद्राची वाट धरली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर सरांसोबतची माझी व मुळे सरांची 'पासपोर्ट मॅन' बनण्याची वाटचाल एकाच वेळी बहरत गेली.


भारतीय सनदी सेवेचा अलिकडेच त्यांचा अखेरचा दिवस. त्यांच्या कल्पक कारकिर्दीबद्दल त्यांचे अभिनंदन तर आहेच पण उद्याच्या नव्या रम्य पहाटेच्या हार्दिक शुभेच्छा ही आहेत. ते लवकरच पुण्यात आपले 'पुढचे पाऊल' कोणते असणार याचा उलगडा करणार आहेत असे त्यांनी माझा भाचा विनायक पाचलग याला त्याच्या थिंक बँक या यु टयूब चॅनलवर ऑफ दी रेकॉर्ड सांगुनही टाकले आहे.


विदेशनितीमध्ये चौफेर फटकेबाजी केल्यानंतर लवकरच पायाला राजनितीचे पॅड्स बांधून ते सज्ज होत आहेत. आता पुढे सरसावत त्यांनी षटकारच ठोकावा अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा असणार आहे.


उद्याची पहाट त्यांच्या चाहत्यांसाठी रम्यच उगवणार आहे.