श्रावणातले एकामागोमाग येणारे सण संपून भाद्रपद महिना सुरु होतो. हा बाप्पाचा महिना. गणपती बाप्पा हा केवळ मराठीच नाही तर सर्वच देशबांधवांचे लाडके आराध्यदैवत. त्यामुळे त्याच्या आगमनाची तयारी अगदी उत्साहात होत असते. त्याच्या एक दिवस आधी, म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला,अजून एक व्रत किंवा पूजा भारतातल्या बहुतेक राज्यांमध्ये केली जाते.
महाराष्ट्रात आपण त्याला हरतालिका पूजन म्हणतो. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्येही ही पूजा केली जाते. नेपाळ मध्ये तर फार मोठया प्रमाणावर तीन दिवस हा उत्सव असतो.
हिमालय कन्या पार्वती हिने शंकराला मनाने वरले होते. शंकराशी विवाह व्हावा ही इच्छा मनात धरून, तिने चौसष्ट वर्षे फार कठिण तपश्चर्या केली. केवळ झाडांची पिकलेली पाने खाऊन; थंडी, ऊन, पाऊस कशाचीच तमा न बाळगता तिने उपासना चालू ठेवली होती. पण पित्याला मात्र तिच्या विवाहाची काळजी होती. नारदमुनींच्या सूचनेनुसार त्यांनी श्रीविष्णू बरोबर तिचा विवाह करण्याचे ठरवले. हे कळताच पार्वती रागावली. तिने सखीला आपले मनोगत सांगीतले. सखी पार्वतीला दूर अरण्यात घेऊन गेली. तिथे एका गुहेत पार्वतीने वाळूचे शिवलिंग स्थापन केले व शिवाची आराधना सुरू केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता.त्या रात्री जागूनही तिने आराधना सुरू ठेवली. त्याच्या पुण्याने शंकराने तिला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगीतले. पार्वतीने, 'तुम्ही माझे वर व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही असे सांगितले. शंकरांनी ते मान्य केले आणि ते अदृश्य झाले'.
दुस-या दिवशी पार्वतीने पूजा विसर्जित केली. नंतर शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला.......
तर अशी ही हरितालिका व्रताची कथा आहे. पौराणिक कथा वाचण्यात हल्ली कोणालाच इंटरेस्ट नसतो. ब-याच जणांचा या सगळ्यावर विश्वासही नसतो. पण तरीही काही व्रतवैकल्यांचे महत्त्व आजही टिकून आहेत. हरतालिका हे त्यापैकीच एक व्रत.
त्यातील बाकी सर्व उपचार टाळून या व्रताकडे बघितले,तर एक गोष्ट लक्षात येते, आपले ईप्सित साध्य करायचे असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही.!!! खास करून मुलींनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. अनादी काळापासून आपल्या कडे स्त्रीशक्तीने वेळोवेळी आपला प्रभाव दाखवला आहे. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा असोत की पी.टी. उषा, कल्पना चावला, टेसी थॉमस, निर्मला सीतारामन असोत.... आपले ध्येय साध्य करण्यासाठी यांनी कठोर मेहनत घेतली. कोणत्याही अडथळ्याची पर्वा केली नाही. स्त्री म्हणून स्वतःला कमी लेखलं नाही. म्हणूनच तर त्यांचीही नावं पिढयानपिढया लक्षात रहातील. आपणही आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, आणि पार्वती मातेला मिळाला तसा देवाचा आशीर्वाद आपल्याला ही मिळवा.
गणेशोत्सव म्हटले की जल्लोष, ढोलताशे
आणि बाप्पांचा प्रसाद मोदक तसेच |
पर्यावरणपूरक आरास आणि गणेशमर्तीचा साकार....!
अलिकडेच माझ्या मोठया मुलीला 'क्ले' चा गणपती करण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षिस मिळाले. मुलीच्या हातातील कला, माझे विचारमंथन, आणि आर्टिस्ट असलेली माझी मैत्रिण सौ. सायली पाटील मिळुन शाडू मातीचा गणपती बाप्पा घरीच साकारू लागलो. योगायोगाने शिकवण्यांकरीता विदयार्थी घरी येतच होते ते "आम्हाला शिकवाल का?' अशी विचारणा करू लागले. आणि त्यातूनच कार्यशाळा सुरू झाल्या. लहान मुलांना गणपतीबाप्पाची मूर्ती तयार करायला शिकवतांना अवर्णनीय आनंद मिळतो. मुलेही सहजपणे कल्पकततेने, सुंदर मूर्ती साकारतात. अभ्यासासेबात अथर्वशीर्ष पठन व सर्जनशीलता वाढीस लागण्याचे काम ओघाने होतेच. शाडूमातीची मूर्ती तयार करण्यासोबतच अथर्वशीर्षाचे पठन केल्यामुळे भावनिर्मिती होते. मुख्य म्हणजे "करायला गेलो गणपती आणि झाला मारूती" असे कधीच होत नाही. गणेशाचे व्यक्तिमत्वच नकळतच बालमनावर जादू करून जाते. गणेशाच्या सगुण साकार रूपासोबतच त्याची गुणसमृद्धता आम्ही विदयार्थ्यांपर्यंत पोहचवत असतो. यंदा कार्यशाळेत पर्यावरणपूरक सुशोभन ही शिकवण्याचा मानस असल्याचे कार्यशाळेच्या संचालिकांनी 'दी कोर' च्या टीमला सांगितले.