मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'धप्पा' चित्रपट दाखविण्यात आला.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन अलिकडेच करण्यात आले. या कार्यक्रमास निवासी आयुक्त (अतिरीक्त कार्यभार) समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु सिंधु, विजय कायरकर आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे मंचावर उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने उचललेली पाऊले तसेच मराठी भाषेचे सौंदर्य, वैशिष्टये याप्रसंगी सांगण्यात आले.
यानिमित्त 'धप्पा' हा मराठी चित्रपट भारत सरकारच्या 'चित्रपट महोत्सव संचनालयाच्या सहयोगाने दाखविण्यात आला. 'धप्पा' या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रात हा चित्रपट अलिकडेच १ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे.
'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त निबंध व शुध्द लेखन स्पर्धाही ठेवण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचा-यांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी भाग घेतला.
निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार अंकुश गोसेवाडे, द्वितीय पुरस्कार प्रमोद कोलापटे, तृतीय पुरस्कार निलेश सांगे यांना मिळाला. शुद्ध लेखन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्रमोद कोलापटे, व्दितीय पुरस्कार अंकुश गोसेवाडे, तृतीय पुरस्कार हरीश अविनाश व्हटकर यांना मिळाला. पुरस्काराचे वितरण श्री सहाय यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांनी केले.