व्यसनमुक्तीचा संकल्प घेणारे राष्ट्रनिर्माते : राष्ट्रपती

मुंबईतील 'नशा बंदी मंडळा' ला 'सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा' पुरस्कार


नवी दिल्ली : व्यसन मुक्तीचा संकल्प घेणारे प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माते असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केले.



येथील विज्ञान भवनात 'जागतिक मादक पदार्थ दुरूपयोग आणि अवैध व्यापार विरोधी दिवसा' निमित्त नुकतेच केंद्रीय समाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयातर्फे मद्यपान आणि मादक द्रव्यांचा दुरूपयोग रोखण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणा-या संस्था तसेच व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलायावेळी राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक व न्याय सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक व न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, विजय सांपला, कृष्णपाल गुर्जर, सचिव नीलम सहानी, सह सचिव सुरेंद्र सिंग मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध श्रेणीतील एकूण ९ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


 कोणतेही व्यसन हे विनाशाचे दार आहे, असे सांगत राष्ट्रपती म्हणाले, यामुळे व्यक्तीचे, समाजाचे तसेच देशाचे नुकसानच होते. प्रत्येकाने व्यसन मुक्तीच्या या लढयात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सक्रीय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्माणात भूमिका निभावली पाहिजे.


व्यसन हे व्यक्तीसह समाजाला गिळकृत करते. जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात त्याचे वाईट परिणाम दिसून येतात, असे राष्ट्रपती म्हणाले. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमये व्यसनाधीनता अधिक दिसून येते. सातत्याने होणारे बदल, स्पर्धा यामुळे येणारी निराशा आणि त्यातून वाढती व्यसनाधीनता हे प्रमुख लक्षणे आहे. व्यसनाधीनतेपासून परावृत्त करणे, स्वतः विचारपूर्वक वागून कधीही कोणत्याही व्यसनाला बळी न पडणे म्हणजेच समजदारपणाचे लक्षण असल्याचाही उल्लेख राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी केला.


संयुक्त राष्ट्राने १९८७ पासून आंतरराष्ट्रीय नशा मुक्ती दिवस पाळला जातो. भारतासारख्या वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थीतीत असणा-या देशात याचे विशेष महत्व असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.


मुंबईतील 'नशा बंदी मंडळा' ला


'सर्वोत्कृष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा' पुरस्कार


मुंबईतील 'नशाबंदी मंडळा' ला 'सर्वोत्ष्ट लाभ-निरपेक्ष संस्थेचा' राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि अमोल मडामे यांनी स्वीकारला. ही संस्था १९५८ पासून कार्यरत आहे.


मद्यपान करणारे विद्यार्थी, तरूण, ज्येष्ठ नागरिकांसाठी नशाबंदीचा कार्यक्रम या मंडळाद्वारे आयोजित केला जातो. या मंडळाचा मुख्य उद्देश तरूणांना मादकपदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करणे हा आहे. मागील वर्षभरात जवळपास ७५० व्यक्तींना व्यसनधीनतेपासून परावृत्त करण्याचे काम या संस्थेने सचोटीने केले आहे.


मादक द्रव्य, तबांखू, मद्यपानातून होणारे दुष्परिणाम याबाबत नशामंडळाच्यावतीने जागृकता निर्माण करणारे कार्यक्रमही राबविले जातात. यासह व्यसनाधिनतेला बळी पडलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित विषयांवर मंडळ सातत्याने कार्य करत असते.


नशाबंदी मंडळाला त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल यापुर्वी २०१२ मध्ये 'राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा' पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.