महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षात आपल्या कामाने स्वतःची ओळख निर्माण करणा-या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे वित्त, नियोजन व वने मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. एखाद्या कामाच्या मागे लागून ते काम तडीस नेण्यासाठी नियोजनबध्दपणे काम करणारे नेतृत्व म्हणून तमाम महाराष्ट्राने त्यांच्या कर्तुत्वाला स्वीकारले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे भाऊ म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. राज्याच्या राजकारणात आघाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची नोंद घेतली जात असतानाच गेल्या चार वषार्तील मंत्रिपदाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्या कार्यातुन कर्तुत्वाचा मोठा आलेख निर्माण केला आहे. राज्याच्या अर्थकारणाला एकीकडे घडी लावत असतानाच त्यांनी महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्याच्या अनेक मागास भागांमध्ये लक्ष घालत त्या ठिकाणच्या समस्यांना योग्य न्याय दिला. समतोल आणि सर्वव्यापी नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा गृह जिल्हा चंद्रपूर असला तरी त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने महाराष्ट्राच्या सर्वदूर भागात आपला जनसंचय केला आहे. त्यांच्या विविध सामाजिक आणि आर्थिक सुधारणांनी मोठ्या संख्येने त्यांचे नेतृत्व मानणारा वर्ग निर्माण झाला आहे. कोकणातल्या पाडयावरच्या सामान्य माणसापासून अगदी गडचिरोली जिल्हयातील सामान्य कुटुंबातील माणसालादेखील सुधीर मुनगंटीवार यांचा मोबाईल नंबर माहित असून भाऊंना एकदा की रींग केली की त्यांचा काॅल बॅक येतोच या आशेने अनेक सूचना मागणया घेऊन कार्यकर्ते तयार असतात मंत्रालयातल्या गर्दीत असो वा विमानतऴावर कुणीतरी आग्रहाने भाऊ असा आवाज देऊन त्यांच्याशी सहज संवाद साधतो चंदपूर जिल्ह्यामध्ये तर गेल्या चार वर्षात त्यांच्या नेतृत्वात शेकडो प्रयोग झाले आणि ते कमालीचे यशस्वी सुद्धा ठरले आहेत. नेतृत्व कल्पक असले की मग सभोवतालच्या अधिकारी- कर्मचा-यानां देखील काम करण्यात आनंद येतो.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षात कामाचा जो सपाटा लावला तो दिपवून टाकणारा आहे. कधीकाळी महाराष्ट्रातील सर्वाधिक अविकसित जिल्हा असणा-या चंद्रपूर, गडचिरोली भागांमध्ये अतुलनीय पद्धतीची विकास कामे सध्या सुरू आहेत. ही कामे बघता गेल्या कित्येक वर्षामधील विदर्भाचा बॅकलॉग भरून निघत असल्याचे दिसून येते. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात घेतलेली आघाडी अतिशय उल्लेखनीय आहे. पायाभूत सुविधांना बळकट करतानाच जिल्ह्यामध्ये सिंचन वाढवण्याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. वर्षाला ३ नव्हे ४ पीके घेणारा शेतकरी त्यांना जिल्हयात उभा करायचा आहे. चंद्रपूर जिल्ह्याला वरदान ठरत असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सिंचन वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या सात तालुक्यांमध्ये गोसीखुर्दच्या माध्यमातून सिंचनाचे जाळे विणले गेले आहे. तथापि, जिल्ह्यामधील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा व अन्य छोटया नद्यांवर उपसा सिंचनाच्या माध्यमातून शेतक-यांना वर्षातून चार पिके घेण्यासाठी पाणीपुरवठा उपलब्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी पाटाच्या पाण्यापेक्षा आता पाईपलाईनने पाणी पुरवठा कसा करता येईल याकडेही लक्ष वेधले. जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा पहिला प्रकल्प शिवणी चोर येथे लवकरच आकारास येत आहे. जिल्हा रोजगार युक्त करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग जिल्ह्यांमध्ये होत आहे. या जिल्ह्याला विपुल वनसंपदा लाभली आहे. यामध्ये बांबू हे या जिल्ह्यासाठी वरदान ठरू शकते. हे लक्षात घेता त्यांनी बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरू केले. आय.एफ.एस दर्जाच्या एका अधिका- याच्या नेतृत्वात या केंद्राचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणावरून हजारो महिलांना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मिळत आहे. देश-विदेशातील बांबू संदर्भात आवश्यक असणारे नवीन तंत्रज्ञान व उपयोगी यंत्र चंद्रपूर मधील या केंद्रामध्ये घरघरत असून यावर या ठिकाणाचे सुशिक्षित तरुण, महिला, युवक सफाईदारपणे काम करत आहे. या केंद्राची इमारत देखील जागतिक दर्जाची होणार असून संपूर्ण बांबू पासून तयार होण-या इमारतीच्या निर्माण कार्याची दखल सिंगापूरच्या प्रसिद्धी माध्यमांनी घेतली आहे. भारताच्या ईशान्य पूर्व राज्यांसोबतच इंडोनेशिया, सिंगापूर, जपान देशांशी आता चंद्रपूरचा संबंध येणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी या केंद्राचा निश्चितच उपयोग होत आहे. चंद्रपूर मध्ये येत्या काळामध्ये काही महत्त्वाच्या संस्था उभ्या राहत आहेत. एखाद्या भागात अशा मोठया संस्था उभ्या राहिल्या की त्यातून निर्माण होणा-या पायाभूत सुविधा व रोजगार निर्मितीतून स्थानिक प्रदेशाला आर्थिक उभारी मिळते. नेमका हाच उद्देश त्यांनी काही संस्था उभारताना लक्षात घेतला आहे. विसापूर जवळ निर्माण होणारी सैनिकी शाळा, पोंभूर्णाजवळ आकाराला येत असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र, बल्लारपूर मध्ये मुलींसाठी उभी राहत असलेली पहिली डिजिटल शाळा, विसापूर जवळचे बॉटनिकल गार्डन, राजुरा मध्ये उभे राहत असलेले विमानतळ, चंद्रपूरमध्ये उभे राहत असलेले अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल, मूल जवळ आकाराला येणारे गोडया पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बल्लारपूर जवळ उभे राहत असलेले अद्यायावत क्रीडा संकुल, जिल्हयात ठिकठिकाणी उभी राहत असलेली बसस्थानके, छोटया शहरात खुललेले बाग-बगिचे, व्यायामशाळा, अभ्यासिका, नवे जिल्हा सामान्य रुग्णालय आदी संस्थांचा विचार केला असता त्यामागे सुधीर मुनगंटीवार यांची दूरदृष्टी दिसून येते. चंद्रपूर सारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात आरोग्य सुविधांची गरज आहे. या ठिकाणी अनेक सर्वेक्षणानुसार कॅन्सर पिडितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्तम आरोग्य व्यवस्था उभी राहावी. यासाठी ५९ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्यावतीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधराशे शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणेच प्रवेशासाठी स्पर्धा लागावी, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी टाटा ट्रस्टच्या मदतीने पालकमंत्री संगणक प्रशिक्षण अभियान सुरू केले आहे. कौशल्ययुक्त शिक्षणाची सुरुवात बाल्यावस्थेतच व्हावी, यासाठी हा प्रयत्न आहे. कौशल्य विकास विभागामार्फत बेरोजगारांचे मेळावे जिल्हयात आयोजित होत आहे. बल्लारपूर जवळ त्यांनी डायमंड कटिंग सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणावरून दरवर्षी एक हजार याप्रमाणे पाच वर्षात पाच हजार विद्यार्थ्यांना सुरत, अहमदाबाद, मुंबई या सारख्या महानगरात वीस ते पंचवीस हजार प्रतिमहा रुपयाची नोकरी देण्याची हमी या ठिकाणी घेतली जाते. महाराष्ट्रातला हा बहुधा पहिलाच प्रयोग आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या सुधारणा मिशन मोडवर घेतल्या आहे. ज्यांच्या घरात रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. घरात लाईट सुद्धा नाही, अजूनही कुडाच्या घरामध्ये राहणा-या आदिवासी शाळेतील मुलांना त्यांनी जगातील सर्वोच्च समजल्या जाणा-या एव्हरेस्ट शिखरावर चढविले. मुलांची जिद्द, त्यांचा काटकपणा आणि बहुजनांना न्याय देणा-या नेतृत्वाच्या महत्वाकांक्षेतून हा पराक्रम घडला. या मिशनला नाव दिले होते मिशन शौर्य, चंद्रपूरसह महाराष्ट्राचा झेंडा घेऊन पाच आदिवासी मुले एवरेस्टवर पोहचली. आता त्यांनी नारा दिला आहे, मिशन शक्तीचा. मिशन शक्ती अंतर्गत महाराष्ट्र नाही देशासाठी ऑलिम्पिकचे मेडल आणण्याची ही आखणी आहे. ते नेहमी म्हणतात... स्वप्न पाहायची तर हिमालयाची. या मोहिमेअंतर्गत सहा विशिष्ट खेळांमध्ये आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक मेडलसाठी सिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे नाव उज्वल करण्यासोबतच ही मुले निश्चितच चंद्रपूरचे नाव देखील रोशन करणार आहेत. चंद्रपूरची अशीच एक योजना हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा देशभर पोहोचली आहे. सामान्य माणसाच्या हातात प्रशासनाला गतिशील आणि जबाबदार करण्याची सुविधाच जणू त्यांनी या यंत्रणेद्वारे दिली आहे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, असा कोणताही सामान्य माणूस आपली तक्रार या यंत्रणेद्वारे देऊ शकतो. त्याला हमखास महिनाभरामध्ये प्रतिसाद मिळण्याची हमी दिल्या जाते. चंद्रपूर सध्या बदलत आहे. या ठिकाणचे नाट्यगृह, या ठिकाणच्या अभ्यासिका, बागबगीचे, नाटयगृह या ठिकाणची रस्ते आणि पेयजलामध्ये आरो मशीनचा सुरू झालेल्या सार्वत्रिक वापर, उत्तम नागरी सुविधा देणा- या दुर्गम भागातील एका शहराकडे चंद्रपूरला घेऊन जात आहेत. चंद्रपूर आणि ताडोबा आता विकास आणि पर्यटनाचे नाव झाले आहे. पर्यटनाच्या संदभार्तील नवनवीन प्रयोग चंद्रपूरमध्ये होत आहे. ताडोबा आपले रुप लवकरच बदलणार आहे. एका आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात ताडोबाचे रुपांतर होणार आहे. जिल्हयातल्या खाण पर्यटनाला गती मिळणार आहे. वाघांची संख्या देखील उल्लेखनीय वाढत आहे. वनावर, वनचरांवर आणि वृक्षवल्लीवर प्रेम करणा-या या वनमंत्र्यांनी वनासंदर्भात ४ वर्षात शेकडो निर्णय केले आहेत. वनावरील अवलंबित्व कमी करताना उद्योग, व्यवसाय बहाल केले. मोबदल्याच्या रकमेत अनेक पटीने वाढ केली. गेल्या अनेक वषार्तील वनमंत्र्यांची नावे देखील माहीत नसणा-या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील घराघरातील मुलांना सुधीर मुनगंटीवार वनमंत्री म्हणून माहीत झाले आहेत. २ कोटी त्यानंतर ४ कोटी आणि आता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा बिगुल वाजविणारा दमदार वनमंत्री अशी त्यांची ओळख महाराष्ट्राला पटली आहे. सुरुवातीला झाडे जगतील का असे म्हणणारे अनेक जण आता वृक्ष दिंडीच्या पालखीचे भोई झालेले आहेत. ही एक जनचळवळ झाली आहे. त्यामुळेच उद्दिष्टापेक्षा दर वर्षी वृक्ष लागवड होत असून पुढील वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीसह पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सुधीर मुनगंटीवार पूर्ण करणार आहेत. चंद्रपूर, मुंबई असो की महाराष्ट्राचे विधिमंडळ, बोटांवर निश्चित आकडेवारी तोंडपाठ असणारा नेता अशीही त्यांची ओळख झाली आहे. पत्रकारांसाठी १५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून त्यांनी समाजाच्या भल्यासाठी झटणा-या एका वर्गाला आयुष्याच्या उत्तर काळात सन्मानाने जगता यावे याची व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांच्या काळातच अर्थमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू झाली आहे. हजारो शेतक-यांना याचा लाभ झाला असून त्यांची समाजाप्रती असणारी सहृदयता त्यांच्या कार्यकर्तृत्वातून कायम उमटत असते. महाराष्ट्राने देखील अशा या असामान्य प्रतिभेच्या सामान्य माणसाला घरातला कर्ता पुरुष 'भाऊ' हे बिरूद आणि गेल्या महिन्यात मिळालेला देशाच्या राजधानीतील प्रतिष्ठेचा 'सोसायटी एक्सलन्स' हा पुरस्कार अभिनंदनीय ठरतो!