काश्मीरमधील उरी येथील दहशतवादाच्या जखमा अजून ताज्या आहेत. उरी मधील हल्ल्याला जेमतेम दीड वर्षे उलटले. काल मी आणि माझे सहकारी त्याच ठिकाणी थांबलो. आम्ही जिथे थांबलो त्याच्या काही अंतरावरच दहशतवाद्यांचा हल्ला २०१६ मध्ये झाला होता. उरी मध्ये जिथे दहशतवादी हल्ला झाला होता, तेथून १२ हजार फूट उंचीवर मद्रास रेजिमेंटचे युनिट आहे. या मद्रास रेजिमेंटमचे कर्नल सचिन कर्णिक आहेत. सचिन कर्णिक मुळ पुण्यातील आहेत. उरी ते मद्रास रेजिमेंटचे शेवटचे युनिट हा २७ किमीचा परिसर आहे. तिथे खूप गरीब काश्मीरी लोक राहतात. आणि नेहमी गरीबीचा फायदा दहशतवादी घेत असतात. कर्णिक यांनी तिथल्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास केला. लष्कराबद्दल भिती वाटू नये आणि या रहिवाशांच्या मनात आर्मी बद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून त्यांनी लहान मुलांशी संवाद साधला. त्यानंतर ते प्रत्येक वेळी त्या रस्त्यावरून जे जे लहान मुले भेटतील त्यांना चॉकलेट द्यायला सुरूवात केली. कर्णिक यांनी प्रत्येक वेळी गाडीत चॉकलेटचे पाकीट घेऊन प्रवास करण्याचा नियम आखून घेतला. तो अंमलातही आणला. आपले साहेब लहनग्यांसाठी चॉकलेट आणतात हे पाहून जवानांनी तेच करायला सुरूवात केली. मद्रास रेजिमेंटच्या प्रत्येक गाडीत चॉकलेटचा बॉक्स ठेवला जातोय आणि रस्त्यावरून जाताना प्रत्येक ठिकाणी थांबून मुलांना चॉकलेट दिले जाते. याचा परिणाम असा झाला की, कोणत्याही आर्मीच्या गाडीचा आवाज आला की सगळी मुलं बाहेर पळत येतात आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट करतात. सॅल्यूट केला की गाडी थांबते आणि चॉकलेट दिले जातात. पुन्हा गाडी निघताना मुलं सॅल्यूट करून जयहिंद म्हणतात. ही लहान मुले सॅल्यूट करत असल्यामुळे आता तरूण आणि मोठी माणसं पण प्रत्येक जवानांच्या गाडीला सॅल्यूट करतात.
याचा आणखी एक मोठा परिणाम झाला. एका लहान मुलानं भारतीय जवानांना खूप मोठी मदत केलीय. परंतू काय मदत केली हे जाहीरपणे सांगता येणार नाही, कारण जबाबदार पत्रकार म्हणून राष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टींबद्दल गुप्तता पाळायलाच हवी. राष्ट्राच्या सुरक्षेपुढे सर्व काही गौण आहे. सचिन कर्णिक यांनी मुलांना शाळेत शिकण्यास प्रोत्साहित केले. त्यांची टक्केवारी वाढविली. जिथे ५ मुले शाळेत येत नव्हती आता ५० मुले येतात.
सचिन कर्णिक यांनी तेथील लहानग्यांची आणि मोठयांचीही मने जिंकली. आता प्रश्न उपस्थित राहतो की सचिन कर्णिक यांची आहेत म्हणून सर्वांना चॉकलेट मिळत सचिन कर्णिक यांची आहेत म्हणून सर्वांना चॉकलेट मिळत आहेत. त्यांची बदली झाल्यावर पुढे काय? अधिका-याची बदली झाली की, त्यांनी सुरू केलेले प्रयत्न बंद पडतात. परंतू काश्मिरी जनतेशी नाळ जोडण्याचा कर्णिक यांचा प्रयत्न थांबू नये. संरक्षण मंत्र्यांनी यात लक्ष घालून काही बजेट वेगळं ठेवावं. शेवटी प्रत्येक समस्या बंदुकीतील गोळीने सुटत नाहीत. काही वेळा आपुलकीनं आणि विश्वासानं केलेली कृतीही मोठी मोलाची ठरते.
अनेकवेळा प्रतिकूल परिस्थिती असली तरी लष्कराचे प्रयत्न थांबत नाहीत. या लहान निरागस चेह-याकडे पाहिल्यावर कोणाचं मन वितळणार नाही? आणि या लहानग्यांनी सॅल्यूट मारून जय हिंद म्हटल्यावर कोणत्या भारतीयाचं मन भरून येणार नाही? हा सॅल्यूट फक्त चॉकलेटपुरता नाही. जर काश्मिरी लष्काराला स्वीकारत नसतील तर काश्मिरींनी लष्करापर्यंत बिनधास्तपणे यावं यासाठी काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. देशविरोधात जाणा-या आपल्याच लोकांना एके ४७ चं ट्रिगर दाबून क्षणात गोळ्या घालणं सोप्पं आहे. पण भरकटलेल्या काश्मिरींना योग्य मार्ग दाखवणं, त्यांच्या मनात विश्वासाचं स्थान करणं ही एका क्षणात होणारी प्रक्रिया नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. झेलम नदीत प्रत्येकवेळी रक्ताचा लाल रंग वाहत नसतो तर काही ठिकाणी माणुसकीचा झरा वाहतानाही पाहायला मिळतो. मला हा माणुसकीचा झरा दिसला, प्रत्यक्षदर्शी बनता आलं. या चॉकलेट मुळे काश्मीर मधील लहानग्यांच्या मनाला लागलेली देशप्रेमाची गोडी टिकून रहावी, एवढीच इच्छा.