हीपद्यपंक्ती वाचली की आठवते महाकवी कालिदासाने केलेले आषाढ मासाचे वर्णन. आषाढमासात आकाश कृष्णमेघांनी आच्छादले जाते. धरणीमाता चातकासारखी पर्जन्यसरींची वाट पाहत असते. अवखळ वायू कृष्णमेघांना सर्वदूर घेऊन जात असतो, अशाच एका कृष्णमेघाला महाकवी कालीदासाने दूत बनवून पत्नीचा विरह झालेल्या प्रेमव्याकुळ यक्षाचा संदेश सांगीतला आणि मेघदूत हे अप्रतिम निसर्गवर्णन असलेले काव्य निर्माण झाले.
आषाढमासापासुन सुरुवात करुन कालिदासाने वर्षाऋतुतील सृष्टीत होणारे बदल वैज्ञानिक व काव्यमय दृष्टीने टिपलेले दिसून येतात.म्हणुनच आषाढमासाचा प्रथम दिन 'महाकवी कालिदास दिन' साजरा केला जातो.कविकुलगुरु या नावाने सर्वश्रुत असणारा कालिदास हा कवी ईसवीसनाच्या चौथ्या शतकात होऊन गेला.ते भोजराजाच्या दरबारात मान्यवर कवी होते. असे अनुमान कालिदासाच्या लेखनावरुन काढले गेले.
महाकाव्य, खंडकाव्य, नाटक या सर्वांमधुन कालिदासांची प्रतिभा विलसत असलेली दिसून येते. म्हणुनच 'उपमा कालिदासस्य' असा कालिदासांचा गौरव केला जातो. कुमारसंभवम् व रघुवंश ही दोन महाकाव्ये ऋतुसंहारम्, आणि मेघदूत ही दोन निसर्ग वर्णनपर खंडकाव्य तसेच मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञातशाकुन्तलम् ही कालिदासरचित नाटके संस्कृतसाहित्यात अजरामर ठरलेली आहे.
कविश्रेष्ठ कालिदासाच्या संस्कृत- साहित्यातील योगदानासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक वंदता आहेत. त्यापैकी त्यांच्या साहित्य निर्मितीशी निगडीत चमत्कारिक वंदता .
विद्वोत्तमा नावाची एक विदुषी राजकन्या होती. आपल्या विद्वत्तेचा तिला फार अभिमान होता. तिच्या अहंकाराचे हरण करण्यासाठी प्राधन एका मूर्ख अज्ञानी मनुष्याला तिच्या समोर वरपरीक्षेसाठी उभे करतात. त्याने संकेतात दिलेली उत्तरे राजकन्येला मान्य होतात व ती त्याच्याशी विवाह करते. विवाहपश्चात हा मनुष्य अज्ञानी आहे हे राजकन्येच्या लक्षात येते. तेव्हा राजकन्या क्रोधित होऊन घराबाहेर हाकलून देते.अपमानित झालेला तो अज्ञानी मनुष्य जंगलात जाऊन कालिमातेची उपासना करतो. तिच्या प्रसादानेच कालिमातेचा उपासक म्हणुन कालिदास नावाने प्रसिद्ध होतो.घरी परतताच राजकन्या प्रश्न विचारते, अस्ति कश्चित् वाग्विशेषः या तिच्या प्रश्नाला उत्तर देत असतांना 'अस्ति' या पदापासुन आरंभ झालेले कुमारसंभव, कश्चित' या पदापासुन आरंभ झालेले मेघदूत , व 'वाग्' या पदापासुन आरंभ झालेले रघुवंश ही तीन काव्ये राजकन्येला एकविली.
कालिदास शब्दांनी व भाषासौंदर्याने समृद्धतर होतेच त्याच बरोबर स्वभावाने उदार होते. कुटप्रश्न, समस्यापूर्ती, सुभाषिते यांची रचना करुन त्याने अनेक नवकवींना पारितोषिके प्राप्त करुन दिली.
वाङमयात अशी उक्ती प्रसिद्ध आहेकी,
काव्येषु नाटकं रम्यम् तत्र रम्यं शाकुन्तलम् ।
तत्रोऽपि चतुर्थोऽङकः तत्र श्लोकचतुष्टयम् ॥
अभिज्ञातशाकुन्तलम् विषयी अशी उक्ती प्रसिद्धी असली तरी कालिदासांचा प्रत्येक श्लोक हा रस प्रतिभेने सजलेलाच असतो. शब्दसौंदर्य व शब्दसौंदर्यासोबत विज्ञान, राजनीती, खगोलशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र, पर्यावरणाकडे बघण्याचा सांस्कृतिक दृष्चिकोन, प्रवासाने या बाबत सखोल ज्ञान होते.
कालिदासाच्या सखोल ज्ञानाने व काव्यातील उपमासौदर्यांने प्रभावित होऊन पाश्चात्य साहित्यिकांनी कालिदासाला 'संस्कृतसाहित्यातील शेक्सपिअर' म्हणुन ओळखले जाते.
अशा विविधांगी वैशिष्ट्ये असलेल्या कवीसाठी स्वतंत्र दिवस असावा हीच भारतीय संस्कृतीची महानता आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब कालिदासाच्या काव्यात, नाटकात जागोजागी पडलेले दिसून येते. मग ते कण्व ऋषी असोत किंवा दुष्यंतराजा असो वा शकुन्तला असो ही तर वास्तवातील पात्रे मात्र मेघदूतातील यक्ष ही संस्कृतीच्या चौकटीबाहेर जात नाही. हीच संस्कृत साहित्याची व कविश्रेष्ठ कालिदासाची महत्ता आहे. अशा या महान कविकुलगुरु कालिदासांना शतशः प्रणाम .