सायकलीचा सौररथ हे खास वैशिष्टय

यंदाच्या रॅलीचे खास वैशिष्टये म्हणजे विठु माऊलीला बसण्यासाठी तयार करण्यात आलेला सौररथ हा नागपूर येथून आणला आहे.सूर्यापासून उर्जा साठवायला या रथाला लहान प्लेटा बसविण्यात आल्या आहेत.या रथाला तीन चाके असून त्यास सायकलचे पॅडल बसविले आहे. रस्त्याने चालतांना ढगाळ हवामान असल्यास या रथाला पॅडल मारावे लागते. एक व्यक्ती बसून हा रथ सहज चालवू शकेल अशी व्यवस्था आहे. सूर्यापासून मिळणा-या उर्जेवर हा सायकल रथ चालत आहे. हा रथ नागपूरहून आणण्यात आला होता. नाशिकमधील उद्योगवर्धिनी संस्थेचा अक्षय गांगुर्डे यांनी रथाची प्रायोगिक चाचणी केली होती. यामध्ये विठु माऊलीची दीड फूटाची मुर्ती ठेवण्यात आली होती.दरवर्षी हा पायंडा पाडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



माझ्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार मी नाशिक सायकलिस्ट असोशियनमध्ये सहभागी झालो. त्यानंतर मिळालेले मित्र व अनुभवांमुळे माझी सायकलिंगची आवड वाढत गेली...


सायकलिंगसाठी मला मार्गदर्शन करणारे श्री. किरण चव्हाण, श्री. हरिश बैजल सर, विशाल डगळे व इतर सायकलिस्टनी पंढरपुर सायकल वारीसाठी प्रोत्साहित केले.सुरवातीला एवढ अंतर पूर्ण करु शकेल की नाही अशी शंका होती पण सर्वाच्या प्रोत्साहनामुळे मी मनाची तयारी केली व नाशिक ते पंढरपुर सायकलवारीत सहभागी झालो.


पहिल्या दिवशी नाशिक ते अहमदनगर हे १६५ कि.मी.चे अंतर मी १० तासात पूर्ण केले बरोबर असलेल्या मित्रांमुळे एवढ मोठ अंतर कधी संपवल हे समजले सुध्दा नाही.रस्त्यात सायकल दोन वेळेस पंक्चर झाली.पण सायकल दुरुस्तीची टिम सोबत असल्यामुळे अडचण आली नाही. दुस-या दिवशी सकाळी ५.३० वाजता आम्ही अहमदनगर येथून सुरवात केली व १४० कि.मी. अंतर पार करुन संध्याकाळी सात वाजता टेंभूर्णी येथे पोहचलो. तिस-या दिवशी सकाळी ४० कि.मी.सायकलींग करुन पंढरपुर येथे श्री.विठ्ठलाचे दर्शन घेतले.


सायकलिंगमुळे माझा आत्मविश्वास दुणवला आहे. सायकलवारी करुन पंढरपुर येथे येणा-या वारकरी भक्तांची भक्ती प्रत्यक्ष अनुभवली.पंढरपुरचे श्री विठ्ठल माऊली भक्तांना संकटात नेहमी मदत करीत असतो याचा मी अनुभव घेतला आहे.



गेल्या चार वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकल वारीत सहभागी होत आहे. आम्ही २०१४ मध्ये प्रथमच या वारीत सहभागी झालो.त्यानंतर प्रत्येक वारीत सहभाग घेतला आहे. नाशिक ते पंढरपूर ३४३ किमीचा प्रवासात आमचे आगळया-वेगळया रितीने स्वागत होत होते. ही वेगळी दिंडी सर्वांचे आकर्षण वाढविणारी होती. आम्ही सर्वानी एकसारख्या रंगाचे व स्वतःचे नाव छापलेले जर्सी परिधान केलेल्या होत्या.हेल्मेट घालून सर्व सायकलिस्ट एका रांगेत वाहतकीचे नियम पाळन सायकलिंग करत होते. आम्ही सर्वजण विठ्ठलाच्या दारी पोहचल्यावर आनंद वेगळाच होता. यावर्षी आम्ही दृष्टीहिन सायकलप्रेमींची वारी टॅडेम (Tandem) सायकलवर घडवून आणली आहे व त्यादृष्टीने खास तयारी केली होती.



नाशिकच्या सायकलवारीत कर्मकांडाला महत्त्व नाही. मोहिमेमागे 'आरोग्यासाठी सायकल चालवा' हा हेतू असल्याने वारीतील प्रत्येकाने सायकल चालवण्यालाच महत्त्व दिले. स्वयंशिस्त आणि सायक्लिस्टांची सुरक्षितता याला सर्वाधिक महत्त्व होते. सार्वजनिक स्वच्छता पाळण्याबरोबरच पाणी आणि अन्न यांची नासाडी टाळली गेली. सायकलवारीसोबत अॅब्युलन्स, डॉक्टरांचे पथक होतेच.डॉक्टरांच्या पथकाने पायी वारी करत पंढरपरला निघालेल्या वारक-यांवरही रस्त्यात उपचार केले. वारीतील सर्व वारकरी तसेच होते. 'जय जय रामकृष्ण हरी, आरोग्याचा जागर करी' हा संदेश घेऊन निघालेली पायी वारी करणा-या वारक-यांचे कुतूहल जागवत होती. सायकलवारीचे व्यवस्थापन मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांप्रमाणे अचूक होते. स्वयंसेवकांचा ताफा वारीला दिशा दाखवत होता. हा वारीचा अनुभव अविस्मरणीय ठरणारा होता.