संजू (Sanju)

वडील आणि आई, दोघेही सिनेजगतातली दोन मोठी नावं. पत्यांचा लाडावलेला मुलगा जो अगदीच "आला क्षण गेला क्षण" आयुष्य जगतोय. पाहता पाहता वाईट संगतीच्या खाईत सापडतो आणि वहावत जातो; इतका की मुंबई बॉम्ब स्फोटासारख्या घात पातात नाव गुंफलं जातं. एकीकडे आपल्या पत्नीच्या निधनाचा विरह आणि दुसरीकडे ड्रग अॅडिक्ट झालेल्या आपल्या मुलाची काळजी.. ही तारेवरची कसरत करत वडील मोठ्या हिमतीने त्याला त्या गर्तेतून बाहेर काढतात. मुन्नाभाई सिनेमासाठी त्याला मिळालेलं फिल्मफेअर अवॉर्ड घेताना त्याचे वडील त्याला डोळा भरून पाहतात, हा त्यांच्यासाठी आयुष्यातला फार मोठा आनंद. एका कार्यक्रमात तो त्याच्या वडिलांना पहिल्यांदाच स्टेजवरून “thanks" म्हणणार असतो; पण टेररिस्ट हे लेबल लागलेल्या त्या मुलाला सिक्युरिटी गार्ड डेलिगेट्सपासून दूर मागच्या रोमध्ये बसवतात, त्याचं स्पीचही रद्द करण्यात येतं; पण एव्हाना समाजाकडून सतत नाकारले जाण्याची जणू सवयच झालेला तो मुलगा ही गोष्टंही वरकरणी स्र३ करतो. त्याचे वडिल दुस-या दिवशी हे जग सोडून जातात आणि तो त्याचं ते स्पीच त्याच्या वडिलांना कधीच ऐकवू शकत नाही. या स्पीचमध्ये तो त्यांना म्हणणार असतो, “you deserve a better son than me, who is more like you and much less like me. But believe me Dad, आपका वो लडका आपसे उतना प्यार कभी नही कर पाता जितना प्यार आपका ये नालायक बेटा आपसे करता हैं।



रणबीर, विकी कौशल, परेश रावल यांचं काम केवळ अप्रतिम! नर्गिसच्या भूमिकेत हवेची मंद झुळूक यावी तशी येऊन जाणारी मनिषा कोईराला खूप प्रसन्न दिसलीये. बाकी इतरांना जिथे जिथे सधी मिळाली आहे तिथे तिथे त्यांनी आपली उपस्थिती चोख नोंदवली आहे. हा राजू हिरानीचा चित्रपट आहे; त्यामुळे टेक्निकली हा सिनेमा सुरेख आहे यात शंकाच नाही. संगीतही आपली छाप उमटवणारं आहे; पार्श्वसंगीत त्या त्या दृश्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. कॅमेरा, कलर टोन, लेन्स फिल्टर्स आणि कॉश्च्युम्स तुम्हाला त्या काळात घेऊन जातात. ड्रग्ज घेतल्यानंतरची संजूची अवस्था दाखवण्यासाठी कंप्युटर ग्राफिक्सचा उत्तम उपयोग केलेला आहे. परदेशातली लोकेशन्स टिपिकल बॉलीवूड स्टाईल आयकँडी आहेत.


वेगवेगळ्या भावनिक स्थित्यंतरांमधून पुढे सरकणारी "संजू'ची कथा संजय दत्त नामक त्या मुलाची आणि सुनील दत्त नामक त्या वडिलांची गाथा आपल्यासमोर मांडते आणि आपण, एक प्रेक्षक म्हणून, कधी हसत तर कधी भावूक होऊन संजूच्या आयुष्याचा (अविचारी जगण्यातून उद्भवणारा) आलेख पाहून त्या वडिलांच्या थक्क करणा-या जिद्दीला सलाम करतो; आणि बुचकळ्यात पडतो की इतक्या कर्तबगार आई-बापाच्या पोटी जन्माला आलेला संजू असा का?!


हा चित्रपट येण्याआधीपासून, आणि तो रिलिज़ झाल्यापासून हा मुव्ही पाहेपर्यंत याबद्दल अनेकांच्या अनेक उलट सुलट प्रतिक्रिया ऐकल्या होत्या. "क्रिमिनल्सचं उदात्तीकरण' इथपासून ते “भोगली की शिक्षा त्याने; येऊ द्या की त्याला आता माणसात' अशा अनेक अनेक प्रतिक्रिया. जो तो "संजू' चित्रपटासारख्या कलाकृती बनवणे कसं समाजविघात आहे अथवा नाही यावर आपली ठाम मतं मांडताना दिसत होता. मला कळेना...खरंच चित्रपट पाहून समाज बिघडतो/बदलतो?


आजवर कीर्तनाने समाज कधी सुधारला नाही, आणि तमाशाने तो कधी बिघडला नाही. कीर्तन आणि तमाशा या दोन्ही कलाकृती माणसाच्या दोन भिन्न मानसिक अवस्थांच्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी जन्माला आल्या आणि सामाजिक पातळीवर जोपासल्याही गेल्या. आणि आजचा समाज एखाद्या कलाकृतीने सुधारावा, अथवा बिघडावा इतका संवेदनशील आहे?! संजू पकडला गेला, ओके; आणि त्याला ड्रग्जच्या नादाला लावणारे, त्याला ड्रग्ज पुरवणारे? त्यांचं काय? म्हणजे जो पकडला गेला तो चोर; जो नाही तो कोण? “सामान्य माणूस'? चित्रपट पाहून आल्यावर एकूणच "संजू'बाबत ऐकलेली, वाचलेली ही सगळी चर्चा मला एका निव्वळ पुस्तकी आयडिआलिजमचं प्रारूप वाटली. कलाकृती ही मुक्त विचारांचा निष्कलंक आरसा असावी; त्यात सिलेक्टिव आयडिअलिजम नसावं. ज्याला जेव्हा तमाशाला जायचय तो फडाचा पत्ता काढतोच आणि ज्याला जेव्हा कीर्तनाला जायचंय तो निमूट मंदिराची वाट धरतो.


 चित्रपट पाहून माणसं सुधारली किंवा बिघडली असती तर काय हवं होतं?! पण तसं होत नाही; जो तो फक्त त्या गोष्टी चित्रपटात पाहणं पसंत करतो ज्याचं त्याला/तिला कायम आकर्षण होतं. अनेकांसाठी चित्रपट हा एक असा दृकश्राव्य कल्पनाविलास असतो जो त्यांना त्यांच्या भावविश्वाचं थेट प्रकटीकरण वाटतो. कदाचित म्हणूनच अनेक व्यावसायिक चित्रपट निर्माते सत्यकथेला "मसाला' जोडतात किंवा ती अधिक रोचक बनवण्याचा प्रयत्न करतात. सचिनचा सिनेमा "डॉक्युमेण्टरी' म्हणवला जातो आणि धोनीची अनटोल्ड स्टोरी मात्र कमर्शियल हिट असते.


चित्रपटातली पात्र एक दृष्टिकोन आपल्यासमोर पझेनिफाय करतात. त्याचं विश्लेषण आणि स्वभावानुसार त्यातून काही घेणं, सोडणं या व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत.


कुणी म्हणेल, मग कसाबवरही सिनेमा बनवा. मी म्हणतो, खरंच नीट अभ्यास करून बनवा. कळेल तरी कसाब निर्माण कसा होतो? अशा चित्रपटासाठी प्रेरणाच हवी असेल तर हंसल मेहता यांनी “ओमर शेख" या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यावर बनवलेला “ओमेर्ता" नामक चित्रपट आहेच. त्या चित्रपटाची मांडणी मात्र संजपेक्षा खुप वेगळी आहे.संजूमध्ये जिथे जमेल तिथे मीडियावर ताशेरे ओढले आहेत. ओमेर्तामध्ये दिग्दर्शक एका त्रयस्थ भूमिकेतून फक्त एक कथा आपल्यासमोर मांडतो. कुणी जन्मतःच आयुष्यात काय करायचं आहे ते ठरवून येत नाही आणि प्रत्येक परिस्थितीचा परिणाम हा सकारात्मक असतोच असं नाही. अनिर्बंध नकारात्मकता तुम्हाला एका अशा विचारसरणीचा भाग बनवते जी तुमच्या नकळत "तुमची' झालेली असते.


संजू हे पात्र आला क्षण गेला क्षण आयुष्य जगणारं पात्र आहे. अशावेळी साधनशुचितेचा फार विचार न करता माणूस कृती करत जातो आणि अनाहूतपणे एका विळख्यात अडकत जातो, ज्यातून बाहेर पडण्यातल्या रिस्कला तोंड देण्यापेक्षा परिस्थिती आहे तशी रेटत नेण्याचा प्रयत्न होत राहतो. एक धाडस वेळीच केलं आणि सारं सावरण्याचा प्रयत्न केला गेला तर अनेक अनर्थ टळतात; फक्त ते धाडस करण्याची जिगर एकवटता यावी.


संजूच्या पात्रात मला आयडेंटिटी क्रायसिसही खूप दिसतो. लहान सहान गोष्टींच कौतूक केलं की मुलं डोक्यावर चढतात असं म्हणणारे पालक "डोक्यावर चढतात' म्हणजे नेमकं काय याची अनेकदा व्याख्याही करू शकत नाहीत. एखाद्या गोष्टीच्या मनासारखं होण्याच्या आनंदाचं तुमचं मायलेज हे “दहा-वीस मिनीट, आईबाबांकडून/नवरा-बायकोकडून कौतूक, इतर काही निवडक लोकांसमोर ताठ मान" हे असेल; तेच मायलेज तुमच्या मुलांचंही असलं पाहिजे असं नाही. ते वेगळं असू शकतं. मग ते काय आहे हे पालक म्हणून जाणून घेऊन, असेलच तर त्यातला अवास्तव भाग काढून टाकून, उरलेलं मुलांना वेळीच मिळणं आणि मिळत राहणं ही गोष्ट त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेण्टचा आवश्यक घटक असते.किंबहुना, घरातच या गोष्टी २३२८ झाल्या तर वाईट संगत लागण्याची शक्यताही कमी होते; कारण वाईट संगत ही अनेकदा निव्वळ वायफळ कौतुकाने सुरू होते. इथेच मुलांचं हुरळून जाणं टाळता आलं म्हणजे झालं.


संजू चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी किती ख-या, किती खोट्या यापेक्षाही मायासाठी "संजू' हे पात्र म्हणजे एक सायकॉलॉजी आहे आणि मला वाटतं त्या सायकॉलॉजीला आपल्या विचारांची कुठलीही लेबल्स न लावता पाहता येणं ही एक प्रेक्षक म्हणून आपली basic minimum requirement fonal अगदीच मराठी शब्द हवा असेल तर "आवश्यक पात्रता' आहे. अर्थातच ही सायकॉलॉजी राजू हिरानीने त्याच्या दृष्टीने दाखवली आहे; ती पाहून झाली की तुम्ही ती तुमच्या दृष्टीने पहा; पण एका माणसाचं माणूस म्हणून घडणं त्यात केंद्रस्थानी असावं इतकीच माफक इच्छा. आता हे जमणं शक्य नसेल तर तुम्ही या चित्रपटाचे अपेक्षित प्रेक्षक नाही असं समजा; आणि असं समजल्याने तुम्ही कमी दर्जाचे सिनेरसिक वगैरेही होत नाही हेही खरंच.


शेवटी आपणही आपल्या चौकटीत, थोड्या बहुत प्रमाणात "संजू" आहोतच; आपल्याला आपल्या वैचारिक भूमिकेचा ठामपणा पूर्ण पटलेला आहे आणि तो जोपासणं ही आपली स्वाभाविक मनुष्यवृत्ती आहे. पण अशा प्रकारात अशी एखादी कलाकृती निर्माण करणं ही समाजविघातक गोष्ट आहे असं म्हणणं आणि म्हणून त्यावर ताशेरे ओढणं मला व्यक्तीशः जरा टोकाचं वाटतं.


समाज “टॉयलेट एक प्रेमकथा'' ने सुधारला नाही; "पॅडमॅनने' ने विकसित, मॉडर्न, स्त्रियांच्या समस्यांप्रती संवेदनशील वगैरेही झाला नाही; आणि हाच समाज "संजू' ने बिघडणार, सुधारणारही नाही..किमान मला तरी असंच वाटतं.


एक कलाकृती म्हणून आणि एका मुलाची, वडिलांची कथा म्हणून "संजू" हा चित्रपट जरूर पहावा.