संवर्धन

एखाद्या गोष्टीची जाणीव असणं आणि रत्या जाणीवेतून प्रत्यक्षात कृती करणं यामध्ये 'जर-तर' एवढाच फरक आहे. अशाच एका जाणीवेतून सुरुवात झाली 'संवर्धन' ची.. सन २००९ साली मी आसपासच्या मित्रांशी गोदावरी प्रदूषण मुक्तीवर चर्चा करू लागले. नाशिकची जीवनदात्री गोदावरी तेव्हापासून प्रदूषणाच्या विळख्यात आहे. यामध्ये प्रत्येक गणेशोत्सवात भर पडते ती पीओपी पासून तयार केलेल्या असंख्य मूर्त्यांची. तेव्हा विसर्जनानंतर पाण्यामध्ये मृत्यांची उरलेले अवशेष पाहताना गणपती बाप्पाची विटंबना असहाय्य झाली. गणेशमूर्तीची अर्धवट विघटनाने होणारी विटंबना कॅमेराबद्ध करत मित्रांच्या एका गटाला सोबत घेऊन नाशिकच्या 'लोकसत्ता' । कार्यालयाशी संपर्क केला. त्यांनी लगेचच काय करता येईल आपल्याला, असं विचारुन पुढील प्रयोजन करण्यास सांगितले. यानंतर विविध महाविद्यालयांना भेट देऊन समवयस्क मंडळींना गोदावरी प्रदूषणमुक्ती चे महत्व पटवून सांगितले, त्यांच्यात समोरच्या व्यक्तीला गोदावरीमध्ये थेट मूर्तीच विसर्जन करण्यापासून थांबवण्यासाठी चर्चा करण्याचे कसब निर्माण करणे खरे आव्हान होते. तरुण मुलांना सोबत घेऊन समोरच्या वयस्कर माणसाला नवे विचार पटवून देणं तसं कठीण काम होत. आज संवर्धन ने ८ वर्ष पूर्ण करत नवव्या वर्षाची तयारी सुरू केली... सुरुवातीचा काळ असा होता, जेव्हा काही धर्मवादी संस्थांकडून मला आणि माझ्यासोबत उभ्या असणा-यांना धमक्या दिल्या जात 'तुम्ही धर्मविरोधी काम करत आहात, हे थांबवा' आशा वेळी सुद्धा न घाबरता पुढे जाण्याचं धैर्य सोबत असणा-या लोकांमुळे आलं. लोकसत्ता नंतर काही राजकीय विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संवर्धन काबीज करण्याचा प्रयत्न केला,या प्रयत्नांमध्ये शेवटपर्यंत कोणताही 'झेंडा' लावू देणार नाही या माझ्या आणि माझी सोबती स्नेहा वासवानी हिच्या हट्टाने त्यांचा प्रयत्न मोडीस काढला. पुन्हा एकदा फक्त ३-४ लोकांच्या जोरावर काम सुरू झाले. काही वषानंतर माणसं जोडली गेली, नव्याने शाळा महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थी प्रबोधनातून हेतू साध्य करण्याचा प्रवास सुरु केला. एक विद्यार्थी शिकला की कुटुंबाचे प्रबोधन होते हे लक्षात घेऊन कामाची मांडणी करू लागलो. शालेय विद्यार्थ्यांचा 'काका तुमची मूर्ती विसर्जित न करता दान करता का?' या प्रश्नाला नाशिकचे तत्कालीन आमदार ही डावलू शकले नाहीत. आजही आमचा हा प्रयत्न संस्था म्हणून रजिस्टर नाही, कारण विचारल्यास हे काम करणा-यांचं काम आहे. प्रत्येकाने आपल्या मेहनतीने उभे केलेले काम असताना याला एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि बाकी कार्यकर्ते कसे असू शकतात? म्हणून कधी संस्था स्थापनच झाली नाही.



पण गेल्या ९ वर्षांपासून एक ही वर्ष न चुकवता काम करणारी अनेक मंडळी आज स्वतः मोठी पावले उचलत तब्बल ७ हजारांवर मूर्ती संकलित करतात. या मूर्ती स्वयंसेवकांच्या माध्यमातून महानगरपालिकेकडे विघटनास्तव सुपूर्त केल्या जातात. या नंतर मूर्त्यांची जवाबदारी घेत त्या पुन्हा बाजारात येणार नाहीत याची संपूर्ण खबरदारी महानगरपालिका घेत असते. या सगळ्याची खातरजमा करून प्रत्येक स्वयंसेवक संवर्धन मध्ये काम करत असतो. संवर्धन ची सुरुवात जरी एका डोक्यातून झाली असली, तरी त्याचा विशाल वटवृक्ष उभा करण्यामध्ये अनेक पारंब्या काम करत आहेत. दर वर्षी संवर्धन मध्ये नवीन स्वयंसेवक घेतले जातात, सातत्य असणा-या सहभागीना प्रत्येकी २ नवीन स्वयंसेवक आणण्याची जवाबदारी असते. असे केल्याने १०० नवीन घरांमध्ये मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन आणि प्रदूषणमुक्ती संदर्भात जनजागृती होते.



संवर्धन च्या कामाचे स्वरूप म्हणजे ज्या ठिकाणी नदीपत्रामध्ये विसर्जन केले जाते तेथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनप्रबोधन करणे. नाशिकमध्ये दोन मुख्य विसर्जन स्थळांवर आणि मध्यम तसेच निम्न मध्यम वर्गीय वस्ती असणा-या ठिकाणी प्रबोधन केले जाते. याचे महत्वाचे कारण असे की नाशिकमध्ये सुरू असलेल्या अनेक प्रबोधन चळवळी या वर्गापर्यंत पोहोचण्यास नकार देतात. अनेकदा यांच्याकडून येणार निकाल हा तुलनेने धीम्या गतीचा असल्याने त्यांचे प्रबोधन अवघड ठरविले जाते. हाच समज मोडून काढण्यासाठी उच्चभृ वस्तीच्या पलीकडे जाऊन काम केले जाते. एवढेच नाही तर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये पोलीस आणि पोलीस कर्मचारी यांच्यासोबतीने संवर्धन ची कृतज्ञता दिवाळी साजरी झाली. फक्त पर्यावरण नाही तर माणुसकी हा देखील समाज शिक्षणाचा भाग असल्याचे लक्षात घेत हा उपक्रम राबविला गेला. प्रत्येक वर्षी ७० ते १०० विद्यार्थी या विसर्जन दिवसाचे नियोजन करत असतात. सकाळी ९ पासून 'अहर्निश सेवा महे' चा वसा घेतलेले स्वयंसेवक संध्याकाळी उशिरा पर्यंत केलेल्या कामाच्या निस्सीम आनंदाने भरून पावतात. या नंतर सुरू होतो प्रवास पुढील वर्षी ताई आपण काय करायचं? आपण असं करूया का? आपण नवीन काही करूया का? या कल्पनांचा..आशा वेळी लक्षात येतं की संवर्धन मधून फक्त नदी प्रदूषण नियंत्रण आणि मूर्ती संकलन हेच नाही तर कल्पनाविलास, सृजनशीलता, सहिष्णू वृत्ती आणि सामंजस्य देखील घडते आहे. संवर्धन कुणा एकट्याचे नसून युवकांची चळवळ आहे, त्यांच्या नाशिकसाठी, त्यांच्या गोदावरीसाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी कारणीभूत ठरणारी निर्णायक चळवळ! 100