हीकथा कशी संपवावी हे तुमच्या हातात आहे. कथेचा अंत मी लिहिलेला नाही, तो कसा करावा हे तुम्हीच ठरवू शकाल. ही कथा आहे इनडोअर जनरेशनची, ही कथा आहे तुमची, माझी आणि आपल्या लेकरांची. अश्या लोकांची जी आपल्या आयुष्यातला : वेळ इनडोअर वातावरणात घालवतात.
निसर्गाची साथ सोडली आणि ही कथा सुरू झाली. आपण घरे बांधली, ऑफिसेस बांधले, रस्ते मोठे केले, झाडे कापली. उष्णता वाढू लागली आणि त्यावर मात करण्यासाठी आपण वातनुकूलन आणले. घरातल्या फटी बंद झाल्या, घरात गार वाटावे, वातानुकूलन संयंत्र नीट इफिशियांटली चालावे म्हणून खिडक्यांना डार्क पडदे लावण्यात आले. फ्रेश हवेचा गृहप्रवेश आधीच बंद करण्यात आला होता, आता सूर्याला देखील मज्जाव करण्यात आला. आता घरात कोणालाही यायला मनाई होती, आपण या घरातच अन्न शिजवत होतो, आंघोळ करत होतो, घर म्हणजेच आपले विश्व झाले होते, त्या घरात आपल्याला जे काही आवडते ते सगळे आपण भरण्याचा प्रयत्न करत होतो. हवा येईना म्हणून आपण पंखे लावले, प्रकाश येईना म्हणून आपण दिवे लावले, पण हे आर्टीफिशियल आहे हे आपण विसरलो.आपले घर म्हणजे एक प्लास्टिक रॅप झाला, आपण त्यात गुंडाळलो गेलो.
अफिसेस देखील एअर टाईट झाली, आपण व्यायाम देखील बंदिस्त वातावरणात करायला लागलो.बघता बघता
सगळीकडची हवा खराब झाली, भयंकर खराब.मग हीच हवा शुद्ध करायला आपण केमिकल्स वापरायला लागलो. काहीही आत येत नव्हते. काहीही बाहेर जात नव्हते. प्रकाश यावा म्हणून छोटे छोटे आर्टीफिशियल सूर्य आपण घरात लावले. आणि गडबड इथूनच सुरू झाली. सुरवातीला हे लक्षात यायला कठीण होते पण लक्षात आले तेंव्हा बरेच नुकसान झाले होते. सतत चोंदलेले नाक, खवखवणारा घसा, वाढलेले वजन, बीपी आणि साखर. सगळयांनी आपल्यावर अटॅक करायला सुरुवात केली होती. निवांत झोप दुर्मिळ झाली, अनेकांना अंग खाज हा रोग लागला, अनेकांना डिप्रेशनला सामोरे जावे लागले.
संशोधनात हे सिद्ध झालेय, आपल्या घरातली हवा बाहेरच्या हवेपेक्षा पाचपट जास्त पोल्युटेड असते, आपल्या घरातली लहान मुलांची खोली सर्वात प्रदूषित असते. जगातली मिलियन्स ऑफ घरे राहण्याच्या लायकीची नाहीत. बंदिस्त घरात लहान मुलांची क्रिएटिव्ह ग्रोथ होत नाही.चाळीशी पार केलेल्या लोकांचे ब्लडप्रेशर वाढते, जवळपास चाळीस टक्के लोक अस्थमाला बळी पडतात.
कथेचा खरा प्रवास आत्ता सुरू करता येईल. भरपूर खेळणारी हवा आणि दणदणीत सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. या इनडोअर जनरेशनला सशक्त बनवायचे असेल तर मैदानात खेळायला जाऊ द्यामातीत लोळू द्या, कपडे , घर, सोफे मळवू द्या. मी वर्षाचा होईन मी यावर्षी,अजूनही कधीही डॉक्टरांकडे काही सिरीयस तक्रार घेऊन गेलेलो नाही. चष्मा सोडला तर आजार नाही, कारण आमची माय आम्हाला मैदानावर पिटाळात असे. रडलो म्हणून हातात गॅजेट देत नसे. तीन चार वर्षांनी मुलं गॅजेटसाठी गोंधळ घालतात आणि आपण झुकतो, आपण झुकत नसतोआपण त्या मुलांच्या पाठीत कुबड सारत असतो. रडू द्या पोरांना पण मैदानात जाऊ द्या, मैदाने नसतील तर घराबाहेर खेळायला मजबूर करा. गॅजेटला विरोध नाही, पण गॅजेट म्हणजे सगळे काही नाही. उन्हात खेळणा-या मुलांची बखोटे धरू नकारस्त्यावर फक्त अनहेल्दी मिळते हा गैरसमज त्यांच्या डोक्यात घुसवू नकाबर्फाचा गोळा खाऊद्या, वेळ पडली तर जे मिळेल ते पाणी पिऊद्या.पावडर सिक्स पॅक पेक्षा काटक सुदृढ माणूस जास्त टिकतो.
हेल्थ कॉन्शस आयांनो, बापांनो तुमचे बालपण आठवा, मुलांनाही तसेच काहीसे जगू द्या.
कथा इथे अर्धवट अशीच सोडतोय, पूर्ण तुम्ही करायची, तुम्हाला हवी तशी कारण ही कथा माझी नाहीच, ही तुमची आहे, तुमच्या घरातली आहे आणि तुमच्या घरासाठी बेस्ट काय असेल हे मी कसे ठरवणार!!