मी 

सकाळ झाली की चिवचिवाट सगळं आता विरलं


धूरकटलेलं शहर हळू हळू खिडकी पुढती उरलं,


रस्त्यांवर मुलांचा गोंगाट, लगोर, अशी पहाट सरली


निवांतपणाने शहराबाहेर नवी जागा हेरली,


रस्त्यांच्या छाताडावरून धावते भरधाव गाडी


ओकत असतो CFC, माझा AC खरा भारी,


दीड तास आधी निघून अफिसात पोहचायचं


ट्रॅफिकमधून धावताना स्वतःला पुरवायचं,


ऑफिस मध्ये AC भला, पुन्हा CFC ओकतो


अंटार्क्टिका त कोठेतरी ओझोन म्हणे फुकतो,


मला मात्र सेल फोन चे नेटवर्क छान हवे असते


मॅयक्रोव्हेव चे जाळे घट्ट विणले तरी ते पटते,


अशा वेळी रेडिएशन मध्ये मला धंदा दिसतो


दिवसभर अफिसात लाईट असतात जळत


त्याशिवाय आम्हाला प्रझेन्टेशन नाही कळंत,


आर्सेनिकजन्य फळं खाऊन मी लंघन करतो


साखरेवरचा मुंगळा माझा मध्येच वजन धरतो,


बिझनेस च्या नावाखाली विमानातून फिरतो


जगभर प्रवास करून आकाशात CO2 भरतो,


कधी होऊन खजील कार्बन टॅक्स भरतो


त्याचं पुन्हा सरकारातून क्रेडीट वसूल करतो,


पाण्याचा अपव्यय अजिबात टाळता नाही येत


मला कळले थोडे तरी कामवाली लक्ष नाही देत,


कोणीतरी यासाठी कुठेतरी झिजतंय


जाणीव ही विरली आता, तरलपण विझतंय,


संध्याकाळी निवांत घरी गार्डन मध्ये फिरतो


पुन्हा एकदा अंघोळ करून नवा दम भरतो,


काहीच कसे बदलत नाही अस्वस्थ होतो


मी तरी बदलतो का, रोज विचार सलतो,


पुन्हा सकाळी उठून आपले पहिले पाढे पंचावन्न


तेच जल, वायू, ध्वनी, AC, फोन, मायक्रोओवन,


सगळ्याच काही जबाबदा-या शासनाच्या असतात


माया असण्याचे ओझे बिचारे इकलजिस्ट्स सोसतात


टिपूर चांदणे स्वच्छ जलाशय गार गार वारे ।


हवे हवे ते बालपणीचे आठवणीतच का रे,


नद्यांचे नाले झाले, बारवांची कचराकुंडी


विहिरींच्या पिकदाण्या, बगीचांची घुगुरु-घंटी,


रस्त्यांभोवती झाडांची छाया केवढी होती गडद


आता निघते इमारती लाकडांसाठी अडत,


वृक्षारोपणाच्या नावाखाली निलगिरी, अशोक लावतो


वड, पिंपळ, आंबा, चिंच, नीम, शहाणपणात हरतो,


असो, आता छोटी खुरडी झाडं कुंडीत वाढवायची.


माणसाची पिढी बोन्साय झाल्यास ती कुठे सांडायची.