आसधुनिक महिपती संतकवी श्री जादासगणू महाराज 'भक्तिसा- रामत' ग्रंथात एके ठिकाणी 'उपवास' या शब्दाचा लक्षणार्थ उलगडताना लिहितात
एकादशीस उपवास । कराया शास्त्र सांगे खास ।
रताळी, भुईमूग, भगरीस । नाही खाया सांगितले ।।
उपवास या शब्दाचा । अर्थ आता सांगतो साचा ।
अहोरात्र विठ्ठलाचा । ध्यास धरणे उपवास हा ।।
कोण अवडंबर माजवतो आपण या उपवासाचे! तो करण्यासाठी शरीराला तोषीस पडू नये म्हणून एक दिवस आधी; साबुदाणा, भगर, रताळी, बटाटे वगैरे सामग्री गोळा करावी लागते. महाराष्ट्रापासून दूर राहणा-यांना 'भगर' म्हणजे 'सामक किंवा व्रत के चावल' हे कळायला काही वर्षे घालवावी लागतात, वाण्याशी वाद घालावे लागतात, भगरीचे फोटो दाखवावे लागतात आणि एवढे करून तो म्हणतो- 'घर में कोई बिमार है क्या?', सहसा याशिवाय उत्तरेत साबुदाणा; भगर खात नाहीत. एवढे करून नेमके काहीतरी राहून गेल्यामुळे एकादशीच्या ऐन दिवशी सकाळी धावपळ करीत केळी किंवा चुकलेला जिन्नस शोधून नेहमीपेक्षा महाग भावाने खरेदी करावा लागतो.परिणाम, ऑफिस ला उशीर! कारण, 'आज उपवास ना, झाला उशीर!'
'अरे, एवढा उशीर करणारच होतास तर जरा नामस्मरण करून ऑफिस ला गेला असतास तर तेवढेच गाठीला पुण्य बाधले असतेस, नाही का?'- असे काही आमची विठु-माऊली म्हणत नाही. माऊलीच ती! श्री मोरोपंत रामचंद्र पराडकर एका केकेत (डोक्यातून उमटलेला आर्त स्वर म्हणजे 'केका' किंवा प्रार्थना) म्हणतात
पिता जरी विटे; विटो,
न जननी कुपुत्री विटे ।
दयाअमृतरसाधी न
कुलकज्जले त्या किटे ।।
प्रसादपट झाकिती परिपरां गुरुचे थिटे ।
म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे! ।।
आईची माया श्रेष्ठतर! म्हणन तर अवघी संतांची मांदियाळी विठुमाऊलीच्या प्रेमाच्या सावलीत सुखाने नांदली, त्या माऊलीचे स्मरण, तिचा ध्यास म्हणजेच उपवास! ईशावास्योपनिषदात ५ व्या मंत्रात परमेश्वराचं वर्णन करताना, तो दिसत नाही कारण तो आपल्या अंतर्यामी वास करून असतो- 'तदन्तरस्य सर्वस्य', असं म्हंटलं आहे, म्हणून परमेश्वराशी एक-ज्योत होण्यासाठी जीवाला; वैश्वानर, तैजस, आनंदमय व तुरीय अशा आत्म्याच्या चार अवस्थांतून प्रवास करावा लागतो, यासाठी यान हा एक मार्ग, त्यामार्गात ख-या अर्थानं केलेला 'उपवास' उपयोगी ठरतो, असं संत सांगतात.
आपण बदलत्या संदर्भांमध्ये, 'उदात्त कार्याचा ध्यास' असाही उपवासाचा अर्थ घ्यायला हरकत नाही.स्वातंत्र्य लढयाच्या काळात महात्माजींनी सत्याग्रहासाठी उपवास केला, काही वर्षांपूर्वी अण्णांनी लोकपाल संस्थेच्या समर्थनार्थ केलेला उपवास देशभर व्यापून राहिला, अगदी आमच्या गुडगावातही 'लेशर व्हॅली' नावाच्या प्रशस्त मैदानात अण्णांच्या उपवासाच्या शेवटच्या दिवशी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कॉर्पोरेट जगताने स्वयंस्फूर्तीने मेणबत्ती रॅली चे आयोजन केले होते. उपवास जर सन्मार्गाने जाणा-या, लोकहितैषी कामे करणा-या व्यक्तीने विशिष्ट सद्हेतूने प्रेरीत होवून केला तर तो आजही राज्यकर्त्यांच्या नाकी नऊ आणतो हे कळून चुकले.
उपवास ही शक्ती खरी; व्यक्ती जीवनात आत्मोन्नतीसाठी, समष्टी जीवनात समाजोन्नतीसाठी तिचा उपयोग होतो, तो तसा व्हावा यासाठी उपवासांची साखळी वाजली पाहिजे. अशा अनेक साखळया एकत्र आल्या तर 'एकीचे बळ, मिळते फळ' या न्यायाचा प्रत्यय येणार हे नक्की! तेव्हा उपवासांच्या या पर्वाला आरंभ करूया का?