यावर्षीदेखील तुझ्या भेटीचा योग हुकला.तसंही मी काही वारीकरीता नियोजन वैगेरे केलं होतं अशातला भाग नाही. तुझ्याशी खोटं बोलून काय करणार? आणि तुझ्यापासून लपवणार तरी काय. पण दररोज 'घर ते ऑफीस व परत' अशा वारी नित्यनेमाने करणा-या माझ्यासारख्या चाकरमान्याला तुझ्या वारीसाठी वेळ मिळेल तर शपथ! महानगराचा शाप, आणखी काय? आम्ही तर दिवस मावळला की तो कसा चांगला गेला आणि येणारा कसा चांगला जाईल ह्याच विचारांमध्ये सदैव धन्यता मानतो. काय करणार? अजून काही मार्गच नाही रे! आपुलिया हिता प्रेमाचा सुकाळ, असं म्हणणा-या त्या तुकोबाला बरं जमलं संसार आणि अध्यात्म. तुझ्या भेटीची आस लागलेल्या त्या संतश्रेष्ठाची भूक तू तुझे श्रीमुख दाखवून भागविलीस तरी. पण त्याची अन् आमची कोठे रे बरोबरी. तुकाराम किंवा तुकोबा म्हणजे तुझ्या वारकरी संप्रदायाच्या महामंदिराचा कळस तर आम्ही पडलो निव्वळ कारणे शोधणारे पळपुटे!
मी पंढरीपासून खूप म्हणजे खूपच लांब राहतो. पण तुझं सावळं रूपडं मात्र मनापासून दूर नसतं.तू या ना त्या रूपात तुझी आठवण मनात सदैव ताजी ठेवतोस. तुळशीहार गळा, कासे पितांबर ल्यालेलं आणि कानांमध्ये मकराकार कुंडले शोभून दिसणारं तुझं रूप कामाच्या धबडग्यातही मनाच्या पटलावर पौणिर्मेच्या चंद्रासारखं अचानक दिस लागतं. हे कसं जमतं रे पंढरीनाथा तुला? पोटोबावर लक्ष देता देता आम्ही विठोबालाच विसरतोय की काय अशी आमची आम्हालाच खंत वाटू लागते त्या क्षणी पुंडलीक वरदा हारी विठ्ठल, अशा तुझ्या नामघोषांत टाळमृदंगांचा गजर कानांवर पडतो आणि मनाला पंढरीची आस लागते. अर्थात हल्ली हा नामगजरही मोबाईल रिंगटोनच्या स्वरूपात असतो म्हणा.
विठूराया, आज असाच एका मित्राच्या Whatsapp Profile वर तुझा फोटो पाहिला.खरंच रे तुझा महिमा अगाध आहे देवा. कोणी भक्त आपल्यापासून दूर गेला तर आपणच त्याच्याजवळ जायचं. इतका कसा रे भोळा तू? आणि आम्ही अप्पलपोटे मात्र काही मागणं असेल तेव्हाच तुझ्याकडे धाव घेतो.तोंडाने मात्र म्हणतो, शीण गेला, भाग गेला अवघा झालासे आनंद.आताही बघ ना, तुझ्या पंढरीपासून हजारो किलोमीटरवर दिल्लीत राहणा-या मला वारीला यायला जमलं नाही म्हणून जणू तूच तर माया लेखणीतून स्वतःच स्वतःला चितारत नाहीस नं? माझं हे लिखाण जर कुणी वारीत वाचलं किंवा याची आठवण करत जर कुणी तुझ्या चरणी माथा टेकला, नाहीच काही झालं तर हे ज्यावर वाचलं आहे असा एखाद्याचा मोबाईल जरी तुझ्या गाभा-यात पोहचला तरी ज्याप्रमाणे कित्येक वारक-यांना तुकोबाचे बोल ओठी आणि पंढरीचा कळस नजरेत असताना जे समाधान आणि पुण्य लाभतं तेच पुण्य नव्हे तरी पण मानसिक समाधान तरी मला लाभो ही आणी एवढीच प्रार्थना तुझिया चरणी करतो!