भाऊसाहेब मोरे हैदराबाद मुक्तीसंग्रामातील बाबासाहेबांचे सेनापती

बाबासाहेबांच्या लढयाचा ध्वज त्यांच्या या निस्सीम सेनानीने एकदा जो आपल्या खांदयावर घेतला तो जीवनाच्या अंतापर्यंत कधीही सोडला नाही.त्यासाठी त्यांना निझामी राजवटीचा रोष इतका सहन करावा लागला की, त्यांना उघडपणे वावरता आले नाही व भूमिगत राहावे लागले. तरीही भाऊसाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचा घेतलेला वसा मागे सोडला नाही.



१५ ऑगस्ट १९४७ ला भारतास ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. पहिले पंतप्रधान पं. नेहरूच्या त्या प्रसिद्ध 'ट्रस्ट विथ डेस्टीनी' या भाषणासह संपूर्ण जग नीद्रेत असतांना, भारतीयांनी स्वातंत्र्याच्या नव्या स्वर्गात प्रवेश केला स्वातंत्र्यप्राप्तीच्या जल्लोषासह नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रासंमुख फाळणीच्या कटु अनुभावाव्यतिरिक्त अनेक गंभीर समस्या



उभ्या राहिलेल्या होत्या. त्यांत ब्रिटीश साम्राज्याच्या अधिसत्तेखाली अस्तित्व जोपासू पाहणा-या भारतातील सुमारे ५६४ संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न अतिशय गंभीर तेवढाच नाजूक होता. पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे कणखर नेतृत्व आणि मुत्सद्देगिरिमुळे हैदराबाद, जुनागढ़ आणि जम्मू आणि काश्मीर यांना वगळून अन्य संस्थानांच्या विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागला वरिलपैकी हैदराबाद संस्थानाचा विषय त्वरित निकालात काढून निझामाच्या जुलमी जोखडातून त्राही-त्राही झालेल्या जनतेची मुक्ती करने नवस्थापीत भारत सरकारसाठी अतिशय जिकरिचे होते.



हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान यांने भारतापासून हैदराबाद संस्थानाचे स्वातंत्र्य जाहीर केल्यानंतर यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परखड मत व्यक्त केले. ते म्हणतात- "राज्यांना भारतीय संघराज्याशिवाय अस्तित्व असू शकत नाही. भारतातील लोक भारतीय संस्थानांच्या स्वातंत्र्याला कदापीही मान्यता देणार नाहीत आणि भारतीय संस्थाने ही भारताचा अविभाज्य भाग आहेत.


इतर प्रांतामधील भारतीय जनता नव्याने मिळवलेल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा अनुभव उत्साहने साजरा करीत असतांना हैदराबाद संस्थानातील जनता मात्र रझाकारांनी घातलेल्या उच्छादाचा प्रतिकार करत होती. त्याअर्थाने निझामाच्या राजवटीतील जनतेची स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ही दुसरी लढाई म्हणावी लागेल हैदराबाद मुक्ती संग्रामात दलीत समाजाने दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. पण त्यासंदर्भात आधुनिक भारताच्या इतिहास लेखनात फारश्या नोंदी आढळत नाहीत. किबहूना स्वातंत्र्य लढयातील यासंदर्भातील काही नोंदी चुकीच्या पद्धतीने लिहील्या गेलेल्या आहेत. हे खरे आहे की बी.एस. व्यंकटराव, भय्यारेड्डी रामस्वामी यासारखे दलीत नेते निझामी सत्ता आणि इतेहादला बळी पडले होते. पण या नेत्यांना व्यापक आंबेडकरवादी जनसमुदायाने कधीच आपले मानले नाही. वास्तविकता ही आहे की हैदराबाद मुक्तीसंग्रामात आजच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि या जिल्हयांमधील मराठी आंबेडकरी समुदाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात 'शेडूल्ड कास्ट फेडरेशन' या संघटनेच्या माध्यमातून निझामी राजवटीविरूद्ध भक्कमपणे उभा राहिला.


हैदराबाद संस्थानात येणा-या मराठवाडयातील दलीतांची अवस्था दयनीय होती. अज्ञान आणि दारिद्रयामुळे हा समाज गलितगात्र झालेला होता. मुस्लीमांचे शासन आणि प्रशासनातील प्राबल्य अनाकलनीय होते. निझामी राजवटीचे मुस्लीम राज्यात रूपांतर करण्यासाठी तयार झालेल्या 'इतेहादुल मुसलमीन' आणि रझाकार अशा संघटनांनी दलीतांबरोबरच इतर असाहय हिंदू समाजातील लोकांचे मुस्लीम धर्मात रूपांतर करण्याचे षडयंत्र चालविले होते या मागचे मुख्य कारण म्हणजे हैदराबाद संस्थानमध्ये मुस्लीम लोकसंख्या केवळ १८ टक्के होती. ही संख्या वाढविण्यासाठी निझाम व रझाकारांचे प्रयत्न चालू होते. यासाठी या संघटनांनी निझामी राजवटीत आरंभलेल्या राष्ट्रवादी आणि सुधारणावादी चळवळीचे दमन करण्याचे धोरण अवलंबले होते. या सोबतच त्यांनी पाकीस्तानातून व उत्तर हिंदूस्थानातून अनेक मुस्लीम आयात करून हैदराबाद संस्थानात स्थायिक करवले होते. मुस्लीम धर्माचा प्रसार करणे हे मुस्लीमांचे धार्मिक कर्तव्य आहे अशी रझाकार संघटनेची धारणा होती. याच मोहीमेचा तक भाग म्हणून या संघटनांनी दलीतांचे मोठया प्रमाणात धर्मांतर करून घेण्याचे कार्य आरंभले होते. त्यासाठी दहशत आणि आमिषे अश्या मार्गांचा अवलंब केल्या जात होता. त्यात भर म्हणून काय तर निझामाच्या मंत्रीमंडळात असलेल्या बी.एस. व्यंकटराव आणि निझामाच्या कार्यमंडळात असलेल्या श्यामसुंदर अशा दलीत नेत्यांनी 'डिप्रेस्ड क्लास असोसिएशन' नावाची संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यामातून आपल्या अनुयायांसह त्यांनी निझामाच्या अशा समाजविरोधी कृत्यांना समर्थन देणे सुरु केले होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निझाम आणि त्याच्या आश्रयाखाली कार्यरत असलेल्या मुस्लीम संघटनांचा हा कावा फार जवळून ओळखला होता. 'शेडूल्ड कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया' ची स्थापना १९४२ला करून त्यांनी 'डिप्रेस्ड क्लास असोसिएशन' च्या निझाम समर्थक कृत्यांना सफल होऊ दिले नाही. हैदराबाद संस्थानचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण व्हावे यासाठी ते फार आग्रही होते. बाबासाहेबांनी १९४७ मध्ये निझामा-विरूद्ध एक आरोपनामा दिला होता. त्यामध्ये हैदराबाद संस्थानातील दलीत समाजास त्यांनी निर्देश दिला, तो असा


“The Scheduled Castes need freedom and their whole move- ment has been one of freedom. That being so, they cannot sup- port the Nizam who is against freedom. The Scheduled Castes of Hyderabad under no circumstances should side with the Nizam or the Razakars.”


इ.स. १९३३ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद आणि मराठवडयातील इत्तर जिल्हयांत वारंवार भेटी दिल्या. त्यांचे सुधारणावादी काम आणि निझामाविरूद्धची भूमीका यांची खबर निझामापर्यंत पोहोचल्यानंतर बाबासाहेबांवर निझामाच्या हद्धीत प्रवेश बंदी घातल्या गेली. आशावेळी बाबासाहेबांचे विचार आणि कार्य यांची धुरा वाहण्याचे काम त्याच्या जवळच्या आणि विश्वासू सहका-यांनी केले. अश्या सहका-यांमध्ये भाऊसाहेब मोरे यांचे नाव शीर्षस्थानी येते.


भाऊसाहेब मोरे उपाख्य बी.एस. मोरे (बाळकृष्ण शिवराम मोरे) यांचा जन्म ११ मार्च १९१५ मराठवाड्यातील कन्नड जिल्हा औरंगाबाद येथील आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले शिवराम बाडाजी मोरे यांच्या पोटी झाला. भाऊसाहेबांचे वडिल श्री. शिवराम मोरे ब्रिटीश सरकारच्या टपाल खात्यात पोस्टमनच्या नोकरीला होते. भाऊसाहेब मोरे जन्मतः हुषार, चंचल आणि एकपाठी होते. त्यामुळे चाळीसगावला त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यात पाठविल्या गेले. पुण्यात बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे सामाजतील उपेक्षीत घटकांच्या विदयार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून निर्माण झालेल्या अहिल्या आश्रम नावाच्या वसतिगृहात त्यांची राहण्याची सोय झाली. पुण्यातील एस.पी. महाविदयालयात त्यांनी पदवीधर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. भाऊसाहेब पदवीधर होणारे मराठवाडयातील पहिले विदयार्थी ठरले.


चळवळया प्रवृत्तीच्या भाऊसाहेबांवर पुण्यात शिक्षण घेत असतांना आंबेडकर चळवळीच्या आणि विचारांचा प्रभाव अधिक खोलवर रूजला यासोबतच त्यांना अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या म. गाधी, पं. नेहरू, अबुल कलाम आजाद, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अखिल भारतीय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना ऐकण्याचे सौभग्याही प्राप्त झाले. भाऊसाहेब पुणे विदयापीठातून पदविधर झाले. विद्यार्थी दशेतच भाऊसाहेबांना बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांचा आणि दर्शनाचा लाभ झाला. त्यांच्या विचारांनी भाराऊन जाऊन भाऊसाहेबांनी मराठवाडयातील दलीत समाजाच्या उच्याटनाचे कंकण हाती घेतले. बाबासाहेबांच्या समाज व राष्ट्रकार्याला वाहून घेण्यासाठी म्हणून भाऊसाहेबांनी निझाम संस्थानातील संपर्क अधिकारी या गैझेटेड अधिकारी या मोठया पगाराच्या नोकरीचा त्याग केला. बाबासाहेबांच्या उत्तम, उदात्त व उन्नत कार्यासाठी त्यांच्या या सेनापतीने दिवस-रात्र, उन्हाची-पावसाची तमा न बाळगता सातत्यपूर्ण समर्पण भावनेने कार्य केले.


मराठवाडयात कन्नड तालुक्यातील छोटे से गाव मझणपूर येथे ३० डिसेंबर १९३८ ला जिल्हा दलीत परिषदेचे अधिवेशन झाले. त्यानंतर २३ फरवरी १९४९ ला त्यावेळच्या निझाम सरहदी जवळील तडवळे या गावी महार परिषद झाली. या दोन्ही ठिकाणच्या ऐतिहासिक सभांमध्ये बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण केले आणि आपल्या अनुयायांना निझामाच्या भूलथापांना बळी न पडण्याचे सूचविले. या दोन्ही सभांच्या आयोजनात भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा होता. या संभामधील बाबासाहेबांच्या निझामाविरूद्ध स्पष्ट भूमिकेमूडे हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या आणि हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या लढयाला बळ प्राप्त झाले. त्यांनतर १९४४ साली 'शेडुल्ड कास्ट फेडरेशन' चे राज्य अधिवेशन झाले या अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर १९४७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निझामाविरूद्ध तक जाहिरनामा प्रसिद्ध केला. या अधिवेशनाच्या आयोजनातही भाऊसाहेब मोरेंची भूमीका अतिशय महत्वपूर्ण होती.


तेवढयावरच भाऊसाहेब थांबले नाहीत. या सभांच्या यशस्वी आयोजनानंतर त्यांनी दलीत समाजास निझामाविरूद्ध सतत चेतविले. या कामी त्यांनी निझाम राजवटीत १८ महिने प्रोपागंडा अधिकारी म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा उपयोग झाला. भाऊसाहेबांनी तालुका शेगाव, अहमदनगर ते भेंडाळा, कायगाव टोळा, येवला ते मनमाड व मनमाड ते चाळीसगाव ते मलकापूर, बुलढाना, चिखली, धाड, शिवना, गोंदी अंबड, जळगाव वगैरे भागात राहून मराठवाडयातील महार, माँग, चांभार समाजतील लोकांनी मुसलमान धर्म स्विकारू नये असा प्रचार केला. भाऊसाहेबांच्या या अथक परिश्रमामुळे शोषीत समुदायातील लोक मुसलमान होण्यापासून वाचले. जेथे अन्याय, अत्याचार जास्त होत होता त्या लोकांना इंग्रजी हद्दीत बोलावून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी भाऊसाहेबांनी आपल्या जीवाचे रान केले. आपल्या प्रचार मोहिमेत ते बाबासाहेबांचा संदेश या जनसामान्यांसाठी वाचून दाखवत असत आणि निझामाचे समर्थन करणे किती धोक्याचे आहे हे त्यांस पटवून सांगत असत.


अशाप्रकारे बाबासाहेबांच्या लढयाचा ध्वज त्यांच्या या निस्सीम सेनानीने एकदा जो आपल्या खांदयावर घेतला तो जीवनाच्या अंतापर्यंत कधीही सोडला नाही. त्यासाठी त्यांना निझामी राजवटीचा रोष इतका सहन करावा लागला की, त्यांना उघडपणे वावरता आले नाही व भूमिगत राहावे लागले. तरीही भाऊसाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचा घेतलेला वसा मागे सोडला नाही. मुख्य म्हणजे आज 'जय-भीम' जे घोषवाक्य झाले आहे त्याचा नारा भाऊसाहेब मोरे यांनी १९३८ साली झालेल्या मझणपूर परिषदेत दिला व त्याचा प्रचार व प्रसार केला.


बाबासाहेबांच्या अशा या थोर सेनान्यास मानाचा जय-भीम!


दिव्यत्वाची जेथेप्रचिती।


तेथे कर माझे जुळती।।