सांस्कृतिक क्षितीजावरील अढळ तारा : कुसुमाग्रज

शिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षितिजावर उगवलेला अढळ तारा म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर. संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतातील आणि जगातील सर्व मराठी भाषिक माणसांना ज्यांच्या प्रतिभेने वेड लावले असे तात्यासाहेब शिरवाडकर आमच्या नाशिकचे होते याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. तात्यासाहेब यांनी स्वतः मी जन्माने पुणेकर असलो तरी ख-या अर्थाने नाशिककर आहे असे सांगितले होते त्यादृष्टीने नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात तात्यासाहेबांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे. नाशिकला जी विविध नावे देण्यात आली त्यात जनस्थान हे जसे नाव आहे तसे गुलशनाबाद हेदेखील एक नाव आहे त्याबरोबरच आता नव्याने कुसुमाग्रजनगरी किंवा तात्यासाहेब शिरवाडकर नगरी असे देखील या शहराचे नामकरण केले तर अतिशयोक्ती होणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तात्यासाहेबांच्या जीवनातील उत्तरार्ध नाशिक मध्ये अत्यंत प्रसन्न अशा वातावरणात गेला या काळात विविध सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांनी समरसून सहभाग घेतला लोकहितवादी मंडळ, सार्वजनिक वाचनालय तसेच विविध संस्था ही याची साक्ष आहेत. याबरोबरच नाशिक शहरातील प्रत्येक कार्यक्रमात तात्यासाहेब आवर्जून हजर असत. एखादे पुस्तक प्रकाशन असो किंवा शोकसभा या दोन्हीला देखील त्यांची उपस्थिती अनिवार्य असे. आणि ते देखील आवर्जून या कार्यक्रमात सहभागी होत. या संपूर्ण कार्यक्रमातील तात्यासाहेबांचे भाषण ऐकणे हा एक सुखद अनुभव असे. त्यांचे भाषण अतिशय सुंदरप्रसंगाला उचित असे, तसेच त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय देणारे असे. मला त्यांचे अनेक कार्यक्रम आठवतात विशेष म्हणजे शोकसभा असली तर ते दिवंगत व्यक्तीच्या कार्याचे अतिशय वास्तव असे विश्लेषण करीत. त्यांच्या या उपस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षभेद किंवा पंथभेद नसे मला आठवते समाजवादी सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनानंतर तात्यासाहेब जसे उपस्थित असत त्याचप्रमाणे शिवसेना नेते काकासाहेब सोलापूरकर यांच्या श्रद्धांजली सभेत देखील त्यांनी केलेले भाषण मला आठवते. त्या वेळी तात्यासाहेब 'गोदाकाठी मृत्यूची छावणी पडली आहे' अशा प्रकारचे धीर गंभीर वाक्य बोलून गेले होते. सार्वजनिक काका असे त्यांनी सोलापूरकर यांना संबोधले होते. खरे तर तात्याच आता नाशिककरांचे सार्वजनिक तात्या झाले होते. तात्यासाहेबांची प्रतिभा आणि त्यांचे तत्वज्ञाप्रमाणे वाटणार धीरगंभीर आवाजातील भाषण सर्वांना मंत्रमुग्ध करीत असे, तसेच त्यांच्या कवितांचे वाचन ऐकणे हा देखील विलक्षण अनुभव असे. त्यांनी आपल्या नव्या को-या कविता पाहिल्या प्रथम नाशिकच्या साहित्यिक मेळाव्यात वाचलेल्या आहेत. सार्वजनिक वाचनालायचा नाशिक जिल्हा शारदीय साहित्यिक मेळावा ही जशी स्व. डॉ. अ.वा. वर्टी यांनी साहित्यिकांना दिलेली भेट आहे तितकेच त्यात तात्यासाहेबांचे योगदान आहे. तात्यासाहेबांचा आशीर्वाद मिळाल्यानेच हा मेळावा पन्नास वर्षे होऊनही अजून सुरू आहे. साहित्यिक कोणत्याही विचारांचा असला तरी त्याचे या मेळाव्यात स्वागत असे, त्यात कोणताही प्रकारचा भेद नाही. या मेळाव्यातील तात्यासाहेबांचा सहज अकृत्रिम वावर सर्वांना हवाहवासा असे. त्यात कृत्रिमता आलेली त्यांना सहन होत नसे. तात्यांना ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारने जाहीर केला त्यावेळी एका पदाधिका-याने तात्यासाहेबांचा आदर करावा म्हणून उभे राहण्यास साहित्यिकांना सांगितले होते. मात्र आपल्या भाषणात तात्यासाहेबांनी त्याबद्दल नाराजी प्रकट केली होती असे कृत्रिम अभिवादन करणे त्यांना रुचले नव्हते. त्यावेळी त्यांनी शुक्रवारची कहाणी ऐकवली होती. चांगले दिवस असतात तेव्हा लोक कसे सन्मान करतात आणि विपत्ति किंवा वाईट दिवस असतात तेव्हा लोक कसे वागतात याचे वर्णन कहाणीत आहे. वैयक्तिक रीत्या तात्यासाहेबांचा माझा संबंध हा तरुण वयामध्ये अनेक वेळा आला मला आठवतंय माझ्या मामांच्या लेखनाचे स्वरूप पाहून मी स्वतः देखील कथा कविता लिहू लागलो ते करत असताना माझे मामा श्री पुरुषोत्तम गोपाळ पागे यांनी मला एकदा नाशिकमधील त्यावेळी खूप प्रसिद्ध असलेले बहुप्रसव लेखक स्व. पंडित य. देशपांडे यांच्याकडे नेले होते. माझे नाव देखील म्हणजे त्यांचे नाव देखील 'पद्माकर' आहे पण मी लेखन करताना पंडित य. देशपांडे असे लावतो असे त्यांनी संगितले होते. त्यांची कथा त्यावेळी शालेय क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाली होती. पंडित देशपांडे यांनी आमच्याशी बोलताना मला विचारले, 'तुम्ही कधी तात्यासाहेबांकडे गेले आहात का?' तोपर्यंत मी तात्यासाहेबांकडे गेलेलो नव्हतो. तर ते म्हणाले तुम्ही तात्यासाहेबांकडे जाऊन कवितेसाठी मार्गदर्शन घ्या. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी आणि माझा मित्र राजेश कुलकर्णी आम्ही आमच्या कवितेच्या वह्या घेऊन तात्यासाहेबांकडे गेलो. तात्यासाहेब नवोदित कवींच्या कविता एक आठवडाभर ठेवून घेऊन त्या वाचत आणि त्यावरील अभिप्राय सांगत असत. मात्र ते नवीन लेखकांचे गद्यलेखन वाचण्यास घेत नसत. त्याप्रमाणे आम्ही आमच्या कवित तात्यासाहेबांकडे ठेवल्या. त्यावेळी आम्ही शाळेतून नुकतेच कॉलेजात पदार्पण केले होते. तात्यासाहेब किती मोठे आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. इतके मोठे होते तरीदेखील आम्ही त्यांच्या दरवाजापाशी जाताच त्यांनी 'या' असे म्हणून आमचे स्वागत केले. आणि आम्हाला दिलासा मिळाला. त्या काळामध्ये तरुण पोरसवदा व्यक्तीला किंवा व्यक्तीला असा मान मिळणे ही देखील खूप मोठी गोष्ट होती. त्यातून कविता कवी हे देखील समाजामध्ये विनोदाचे विषय होतात, अशा परिस्थितीत नव्या कवींना मान देणे हे तात्यासाहेबांचे मोठेपण भावले. आम्ही त्यांना कविता दिल्यानंतर ते वाचून त्यांनी परत दिल्या आणि त्या चांगले आहेत असं सांगितलं, त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. त्याबरोबरच मकर संक्रांतीला तिळगूळ घेण्याचा किंवा दस-याचा सोनं देण्याचा कार्यक्रम असो या दोन्ही दिवशी आम्ही आवर्जून तात्यासाहेबांकडे जात असू. तात्यासाहेब देखील आम्हाला तिळगूळ देत आणि आमचे सोने स्वीकारीत. नंतरच्या काळात राजेश कुलकर्णी मी आणि कविवर्य रेव्हरंड ना.वा. टिळक यांचे पणतू आणि माझ्या वर्गातील कवीमित्र स्वर्गीय जीवन नारायण टिळक असे तिघे आम्ही तात्यासाहेबांकडे जात असू. 'जीवन टिळक याला तात्यासाहेबांनी कवितेतच उगवलेला आहे' असे म्हटले होते. काव्यक्षेत्रात फुलामुलांचे कवि म्हणून ना. वा. टिळक याला तात्यासाहेबांनी कवितेतच उगवलेला आहे' असे म्हटले होते. काव्यक्षेत्रात फुलामुलांचे कवि म्हणून ना. वा. टिळक आणि स्मृतिचित्रे लिहिणा-या लक्ष्मीबाई टिळक यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. त्यांच्याविषयी तात्यासाहेबांना देखील अत्यंत आदर होता त्यामुळे आमच्या बरोबर असणे ही आम्हाला एक जमेची बाजू होती. तात्यासाहेब दिलखुलासपणे आमच्याशी बोलत असत. आमच्या कविता पाहून त्यावर अभिप्राय देत असत. कधीकधी तात्यासाहेबांकडे मान्यवर आले तर त्यांच्याशी ओळख देखील ते करून देत अरविंद इनामदार हे पोलीस महासंचालक असताना तात्यासाहेबांकडे येत असतत्यांची देखील आमच्याशी तात्यांनी ओळख करून दिल्याचे आठवते. नंतर एकदा अरविंद इनामदार यांच्याशी पुन्हा पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना संपर्क आला तेव्हा तुमचे नाव आपल्याला माहित आहे असे त्यांनी सांगितले होते ही तात्या साहेबांचीच कृपा म्हणावी लागेल. तात्यासाहेबांच्या अकृत्रिम स्नेहामध्ये आणखी एक गोष्ट सांगता येईल ती म्हणजे कधीकधी ते आम्हाला चहा किंवा सरबत वगैरे देत. काही वेळा तर स्वतः आतल्या खोलीत जाऊन आणून देतआमच्यासारख्या पोरसवदा व्यक्तींना अशाप्रकारे आदरातिथ्य करणे किती मानाचे आणि आनंदाचे वाटत असेल याची कल्पना करता येईल. अर्थातच कधीकधी तात्यासाहेबांकडे जास्त मान्यवर व्यक्ती आलेल्या असतील किवा कामाची गडबड असेल त्यांनी आम्हास नंतर या असे देखील स्पष्टपणे सांगत असत तात्यासाहेबांचा हाही गुण महत्त्वाचा मानावा लागेल. लग्नाची पत्रिका देखील मी तात्यांना दिली होती. मात्र त्या दिवशी नाशिकमध्ये नसल्याने ते येवू शकले नव्हते. माझे लग्न झाल्यावर पत्नी, बहीण, मुलगा यांना घेऊन देखील त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी बुंदीचा लाडू दिला होता हे आठवते.



तात्यासाहेबांच्या सहवासात नंतर देखील पत्रकारिता करताना खूपच चांगले अनुभव आले कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना तसेच नाशिकमधील विविध सांस्कृतिक उपक्रम यांची माहिती मिळण्याचे केंद्र म्हणून आम्ही तात्यासाहेबांच्या टिळकवाडी येथील निवासस्थानाकडे पहात असू तात्यासाहेबांचे निवासस्थान पूर्वी गावातील पटेल कॉलनी येथील मालुसरे यांचे सरस्वती सदन हे होते त्यानंतर नाशिक मनपाने त्यांना टिळकवाडीत तरण तलावाजवळ निवास स्थान दिले त्यानंतर काही दिवस तेथून जवळच असलेले एक निवासस्थान देखील दिले होते या सर्व ठिकाणी आम्ही जात असू. तात्यासाहेबांच्या पंचाहत्तरीनिमित्त एक सुंदर कविसंमेलन सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केले होते रंगठा विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कविसंमेलनात मराठीतील सर्व नामवंत कवी उपस्थित होते त्यात कृ.ब. निकुंब, मंगेश पाडगावकर वसंत बापट, विठ्ठल वाघ अशा अनेक कवींची नावे सांगता येतील त्यावेळी माझ्या पत्रकारितेला सुरुवात झाली असल्याने या कवी संमेलनावर मुंबई तरुण भारत मध्ये 'कवितेच्या जळी तुडुंबले मन' या शीर्षकाचा एक विस्तृत लेख मी लिहिला होता. त्यावेळचे सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह भरद्वाज रहाळकर यांनी माझ्याकडून तो आवर्जून लिहून घेतला होता त्यासाठी मला कविसंमेलनाची संपूर्ण कॅसेट देखील उपलब्ध करून दिली होती. विशेष म्हणजे या लेखातला तरुण भारत ने मला चांगले मानधन देखील दिले होते. तात्यासाहेबांच्या नाशिक मधील अनेक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करता येईल सामाजिक कार्यात त्यांनी दिलेली प्रशंसेची थाप अनेकांना प्रेरणादायी ठरली आहे. त्यांना सामाजिक कार्याचे अप्रूप होते केवळ साहित्यिक असणे त्यांना फारसे रुचत नव्हते. तात्यासाहेबांनी सार्वजनिक वाचनालयाच्या साहित्यिक मेळाव्यास उत्तम कविता लिहीणा-यास प्रोत्साहन म्हणून 'कवी गोविंद काव्यस्पर्धा' जाहीर करून त्यासाठी स्वतः निधी दिलेला आहे. स्वातंत्र्य कवी गोविंद हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निकटचे सहकारी होते. त्यांची स्मृती जतन करावी अशी प्रेरणा तात्यांची त्यामागे होती. मला देखील हा पुरस्कार १९८४ मध्ये प्राप्त झालेला आहे. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी देखील विस्मृतीत गेलेला स्वतंत्र कवी असा लेख त्यावेळी सकाळच्या साप्ताहिक पुरवणीत लिहिला होता. तात्यासाहेबांचे विचार अतिशय पारदर्शक असे होते आणि स्वीकारलेले धोरण बदलण्याची गरज असेल तर बदलले पाहिजे हे त्यांना पटत असे हे त्यांचे मोठेपण होते. सार्वजनिक वाचनालयाच्या साहित्यिक मेळाव्याच्या निमित्ताने याचा प्रत्यय आलेला आहे. त्याचे असे झाले साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपद नाशिक मध्ये राहून गेलेल्या साहित्यिकासच द्यावे अशी एक प्रथा होती डॉक्टर वर्टी, तात्यासाहेब आदि मंडळींनी हा एक नियम घालून दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये थोडा काळ जरी वास्तव्य केले असेल मेळाव्याचे अध्यक्षपद द्यावे असे होत चालले होते नंतर नंतर तर अगदीच नाममात्र संबंध असलेल्या नाशिककराला हे अध्यक्षपद देण्यात येऊ लागले. त्यामुळे नाशिकमध्ये वास्तव्य असलेल्या परंतु बाहेर न गेलेल्या साहित्यिकास हा मान मिळू शकत देखील खाली संपादक विभागात होतो त्याच काळात माझा अभ्यास सुरू होता. माझा विषय देखील 'मनोहर शहाणे यांचे कादंबरीविश्व' हाच निवडला होता. त्यामुळे मनोहर शहाणे यांना जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपद मिळावे, असे वाटत होते. त्यावर मी 'सांस्कृतिकी' मध्ये एक लेख लिहिला. तात्यासाहेबांना स्वतः भेटलो वाचनालयाचा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदाबाबतचा नियम बदलण्याची गरज आहे हे सांगितले तेव्हा त्यांना ते पटले. आणि या प्रयत्नाचे फलित म्हणून मनोहर शहाणे यांना साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षपद प्राप्त झाले तात्यासाहेबांचा नव्या गोष्टी स्वीकारण्याच्या स्वभावाचे हे द्योतक म्हणावे लागेल.


नंतरच्या काळात तात्यासाहेबांच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि आजदेखील या प्रतिष्ठानचे कार्य मोठया जोमाने सुरू आहे अशा त-हेने तात्यासाहेबांच्या सांस्कृतिक मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला होत असतानाच झपाट्याने दिवस बदलत होते एकदा असे समजले की तात्या साहेबांची प्रकृती बरी नाही आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो मात्र नेहमी या असे स्वागत करणारे तात्यासाहेब आम्हाला भेटलेच नाहीत आम्ही गेलो तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे भेटता येणार नाही असे घरापुढे फलकावर लिहिलेले आढळले. नंतरच्या काळात त्यांची प्रकृती सुधारेल अशी आशा वाटत होती मात्र ती वेळ आलीच नाही आणि एकदिवशी अचानक तात्या सोडून गेले अशी दुःखद वार्ता कानावर आली आणि आणि पत्रकारितेचे काम करताना तात्यासाहेबांच्या अंत्यसंस्काराच्या वृत्ताचे संकलन करावे असे मला सांगण्यात आले. नाशिकच्या यशवंत महाराज पटांगणावर हा अंत्यविधी पार पडला तेव्हा, त्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील आवर्जून उपस्थित होते. (त्यापूर्वी तात्यासाहेबांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भेटायला आले होते त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांनी आशीर्वाद घेतल्याचे छायाचित्र चांगलेच गाजले होते.) पोलिसांनी तात्यासाहेबांना अखेरची मानवंदना दिली. यावेळी विविध मान्यवरांच्या शोकसंदेश संकलनदेखील मी केले होते. तात्यासाहेबांचे आपल्यातून जाणे असे आम्हाला खूपच जिव्हारी लागले. त्यांचा सहवास मिळणार नाही ही जाणीव दुःखदायक होती मात्र कुसुमाग्रज प्रतिष्ठान च्या रूपाने त्यांचे अस्तित्व आजही प्रेरणा देत आहे आणि भावी काळात अखिल भारतातील कवी आणि साहित्यिकांना हे स्मारक कायमस्वरूपी प्रेरणेचा स्रोत बनवून साहित्यिक सामाजिक विज्ञान विषयक उपक्रमांना हे प्रतिष्ठान प्रोत्साहन देईल व नाशिकचे नाव देखील उंचावण्यास त्यामुळे हातभार लावेल यात काहीच शंका नाही.