निरामय आरोग्यासाठी योग 

आरोग्य म्हणजे सतत बदलत असणा-या वातावरणाला | अचूक प्रतिसादा देण्याची क्षमता होय.वारंवार होणा-या बदलांना तोंड देता यावे, अशा प्रकारे आपल्या शरीरातील फुफ्फुसे, ह्दय, यकृत व इतर अवयवांची रचना केलेली असते. आरोग्य म्हणजे बदलांना तोड देण्याची अवस्था अतिशय कार्यक्षमतेने कायम ठेवणे होय. आरोग्याचा आधार आहे जीवनशक्ती. जी कोणत्याही तपासणीत दिसू शकत नाही. ही _ जीवनशक्ती वाढविण्याचे काम योगामार्फतच होते. योगशास्त्र हे व्यापक शास्त्र आहे. ती एक कला आहे आणि तत्त्वज्ञानही आहे. म्हणूनच योग जीवनशैली बनविण्याचा आग्रह आहे.



वेळ आणि श्रम वाचवणारी भौतिक व ऐच्छिक सुख प्राप्त करुन देणारी अमर्याद साधने हाताशी असूनही मनुष्य सुखी नाही. एका बाजूला आर्थिक भरभराट, विकास, तर दुस-या बाजूला तणावग्रस्त जीवन, त्यातून निर्माण होणा-या निद्रानाश, मधूमेह, उच्च रक्तदाब, चिडचिडेपणा, यांसारख्या व्याधी. पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन, सर्वच क्षेत्रांत असलेली जीवघेणी स्पर्धा, भौतिक सुखाचे आत्यंतिक आकर्षण, __त्यासाठी धावपळ, बिघडलेले वातावरण, सामाजिक मानसिक आणि बौध्दिक असुरक्षितता यामुळे व अनेक कारणांनी व्यक्तीचे व समाजाचे आरोग्य बिघडत चालले आहे. विज्ञानातील प्रगती, संशोधनसुध्दा आरोग्यविषयक समस्या दूर करण्यात अपयशी ठरत आहेत.आधुनिक काळातील आरोग्यविषयक शारीरिक, बौध्दिक, भावनिक व मानसिक समस्यांवरचा अचूक उपाय म्हणजे योगशास्त्र होय.


योग या परिस्थितीत आशेचा किरण असून पूर्ण आरोग्य देण्याची क्षमता योगातच आहे. म्हणूनच योग ही पूर्ण जीवनशैली बनविणे काळाची गरज आहे. शरीर व मन यांचा समन्वय संतुलन साधने म्हणजे योग, अशी योगाची व्याख्या आहे. योग म्हणजे केवळ शरीरिक व्यायाम, उपचारपध्दती नाही, तर ज्यात शरीर, मन, बुध्दी, आत्म्याबरोबर आणि समष्टीबरोबर जोडले जातात.योगसाधना केवळ सकाळी तासाभरासाठी नसून ती चोवीस तास अंगीकरण्याची गोष्ट आहे.महर्षी पंतजलींनी अष्टांग योगाची सूत्रे सांगितली आहेत. या सूत्रांतील आठ अंगाचा जीवनात अंगीकार केला, तर व्यक्तीला परिपूर्ण आरोग्य, तर लाभतेच याबरोबर सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो.


योगामुळे अनेक प्रकारचे विकार दूर हेतात किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. काहींवर तर योगामुळे उपचारही होतो. मन शुध्द ठेवण्यासाठी मनात चांगल्या भावभावना येण्यासाठीही योगाचा चांगला उपयोग होतो.योगासनामुळे शरीर, मन, भावना शुध्द होते. योगाभ्यास हा एकच अभ्यास असा आहे जो कुणालाही करता येईल. त्यासाठी काही खर्च येत नाही. फक्त चांगल्या प्रशिक्षकाकडून तो शिकून घ्यायला पाहिजे. योगाचे महत्त्व जाणून घ्यायला हवे. योग सर्वाना उपयोगी आहे. आजारी माणूसही योगाचे काही खास प्रकार करु शकतो. तरुण असो, जेष्ठ नागरिक असो व वृध्द.. सर्वासाठी योगाभ्यास फायद्याचा ठरतो.


आपण आपल्या शरीराचा आदर राखायला आणि ते बळकट करायला शिकले पाहिजे. हे योगसाधनेचा उपचार पध्दतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.आपण मोठया प्रमाणावर व्यसनांच्या अधिन जातो तेव्हा आपल्या शरीराचं वाईट पध्दतीने नुकसान झालेल असतं. योगसाधनेतून ही प्रक्रिया उलटवता येते.योगतंत्रातून आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळया यंत्रणांषी 'संवाद' साधू शकतो, त्यातून त्या यंत्रणांमध्ये नव्याने सकारात्मक उर्जा निर्माण करणे शक्य होते. आसने आणि प्राणायाम यांचा संयुक्त वापर हे व्यसनातून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी आपल्या हातात मिळालेले उत्कृष्ट हत्यार आहे.


आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जगाला प्रेरक ठरावे अस बरेच काही दिले आहे. योगाभ्यास ही सुध्दा भारताने जगाला दिलेली अशीच अमूल्य देणगी. योगाभ्यासाचे महत्व सा-या जगाला आता पटले आहे. त्यातूनच 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्याचा विचार पुढे आला आणि त्यावर शिक्कामोर्तबही झाले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पुढाकारानंतर डिसेंबर २०१४ मध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जाहिर केला होता. ४० इस्लामिक देषांसह १९० देषांनी योग दिनाचा स्वीकार केला होता. २०१५ पासून जगभर योगदिन भारताएवढा उत्साहात साजरा केला जातो. त्यातून योगाभ्यासाचे महत्व जगाला नव्याने पटलं असून त्याबाबत ओढाही वाढला आहे. यंदाही 'आंतरराष्ट्रीय योग दिन' ही जय्यत तयारीनिषी साजरा होत आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर योगाभ्यासाच महत्व सा-यांना पटवून दिल जात आहे.


योगाभ्यासामुळे शारीरिक, मानसिक, बौध्दिक, आध्यात्मिक आणि सामाजिक प्रवृत्ती लाभू शकते. योग अंगामध्ये नवचैतन्य निर्माण करतो.शरीर, मन आणि बुध्दी या तिन्ही अंगान सक्षम झाल्यास कुठलाही ताण जाणवणार नाही हे त्रिवार सत्य आहे. पण हे घटक दुर्बल राहिले तर एखाद्या पांगुडगाडयासारखं होईल. अश्या गाडयानं प्रवास करण अशक्य आहे.सध्या आपण स्पर्धात्मक युगात वावरत आहोत. यासाठी उत्तम स्मरणशक्ती, एकाग्रता आणि ध्येयासक्त नजर असायला हवी. या सर्वाबरोबर एकाच वेळी विविध कामं पार पाडण्याची क्षमता असायला हवी. यासाठी देखील योग महत्वाचा ठरतो. योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते. ग्रहण केलेल ज्ञान बुध्दीमध्ये परावर्तीत होतं आणि आवश्यकतेप्रमाणे त्याचा उपयोग होऊशकतो. अस्थिर मनाच संतुलन साधणं हे देखील योग साधनेमुळे शक्य आहे.


सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीनंही योग साधनेचं महत्व अनन्यसाधारण आहे. अनेकजण एकत्र येऊ ध्यान, प्रार्थना, प्राणायम, सूर्यनमस्कार करत असतील तर त्यातून सामाजिक सलोखा, सद्भावना वाढीस लागते. शंभर माणसं एकावेळी ओंकार म्हणतात तेव्हा होणारा परिणाम अद्भूत असतो. माणसानं एकटयाने शंभरवेळा ओंकार म्हणणं आणि शंभर जणांनी एकावेळी ओंकार म्हणणं यात महदअंतर आहे. म्हणूनच समाजानं एकत्र येज योगसाधना करायला हवी.सहिष्णुता, बंधुभाव, परस्परांना मदत करण्याची वृत्ती आणि एखादी वस्तु वाटून घेण्याची भावना वाढीस लागते. जीवनामध्ये रस उत्साह वाटण्यासाठी जीवनाबद्दल, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल प्रेम हवं. यश आणि अपयशाची पर्वा न करता जगण्याची हौस हवी, जगण्याचं साहस हवं.योगसाधनेमुळे हे सर्व साध्य होते. योगाभ्यास ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट होत आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्वही प्रर्कषाने जाणवणारे आहे.